‘तारिणी’च्या महिला अधिकार्‍यांनी घडवला इतिहास

0
180

>> संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते गोव्यात गौरव

आयएनएसव्ही ‘तारिणी’ या भारतीय बनावटीच्या नौकेद्वारे ‘नाविका सागर परिक्रमा’ या मोहिमेंतर्गत जगभ्रमंतीवर गेलेल्या नौदलाच्या सहा धैर्यवान महिला अधिकार्‍यांच्या चमूने भारतीय नौदलात इतिहास घडवला आहे. समुद्रमार्गे जगभ्रमंतीवर गेलेल्या ह्या महिला अधिकार्‍यांनी तब्बल १९४ दिवस समुद्रात राहून विक्रम घडवलेला असून त्यांचे शौर्य व धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी काल उद्गार काढले.

‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत जगभ्रमंतीवर गेलेल्या नौदलाच्या सहा साहसी महिला चमूचे काल बेती वेरे येथील आयएनएस मांडवी येथे स्वागत केल्यानंतर त्या बोलत होत्या.
या महिला नौदल अधिकार्‍यांचा आपणाला सार्थ अभिमान वाटत आहे. आपल्या यशाने, साहसाने व निर्भय वृत्तीने ह्या महिला अधिकार्‍यांना भारतातील युवावर्गाला एक धडाच घालून दिला आहे. त्यांच्या साहसाचे व धाडसी वृत्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अशा शब्दात सीतारमण यानी या चमुच्या कार्याचा गौरव केला.
आव्हानांना सामोरे जा, निर्भय बना, असा धडा ह्या धाडसी अधिकार्‍यांनी सगळ्यांना घालून दिला असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांचे हे धाडस पाहून नौदलाने आता दरवर्षी अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावेत, अशी सूचनाही सीतारमण यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ह्या मोहिमेत खूपच रस घेतला होता. त्यांच्या सरकार्यामुळेच ही मोहीम यशस्वी होऊ शकल्याचे त्या म्हणाल्या.
‘नाविका सागर परिक्रमा’ ही नौदलाची ‘नू भूतो’ अशी मोहीम असल्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यानी यावेळी सांगितले.
ह्या मोहिमेवर गेलेल्या नौदलाच्या सहा साहसी महिला अधिकार्‍यांनी ‘तारिणी’ ह्या नौकेतून तब्बल २१६०० समुद्री मैल एवढे अंतर कापले. त्यांच्या पाच टप्प्यातील प्रवासात त्यानी गोवा ते फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया), फ्रेमेंटल ते लेटलटन (न्यूझीलंड), लेटलटन ते पोर्ट स्टॅन्ले (फॉकलंड्‌स), पोर्ट स्टॅन्ले ते केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) असा प्रवास केला. त्यानंतर केप टाऊन येथून गोव्याकडे प्रयाण केले, असे लांबा म्हणाले.

महिला सशक्तीकरणाचा भाग
ही मोहीम म्हणजे महिला सशक्तीकरणाचा एक भाग होता, असेही यावेळी लांबा यानी सांगितले. सर्वप्रथम ह्या मोहिमेत सहभागी झालेल्या चमूतील एक नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यानी १९४ दिवसांच्या ह्या मोहिमेविषयीची माहिती दिली. मोहिमेच्या वेळी आलेले अनुभव, समस्या व मोहीम कशी साकार झाली याची त्यानी थोडक्यात माहिती दिली. यावेळी सीतारमण यांच्या हस्ते चमुतील सर्व महिला नौदल अधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला.