ताणतणावाचे बळी

0
145

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना अचानक आलेला ब्रेन स्ट्रोक आणि माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे ध्यानीमनी नसताना झालेले निधन या दोन्ही घटनांनी गोमंतकीय समाजमानस हादरलेले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे असेच अचानक उद्भवलेले गंभीर आजारपणही गोमंतकीय जनतेला हादरवून गेले होते. आता अमेरिकेेतील प्रगत उपचारांनंतर यातून ते हळूहळू बाहेर पडतील आणि या महिन्याअखेर गोव्यात परततील अशी अपेक्षा आहे. शांताराम नाईकांना तर उपचारांची संधीही लाभली नाही. गोव्याच्या राजकीय क्षेत्राला सध्या अशा प्रकारची दुर्धर दुखणी ग्रासून राहिलेली दिसत आहेत. गेली दोन वर्षे आपले बौद्धिक चैतन्य हरवून बसलेला विष्णू सूर्या वाघांसारखा बुद्धिमान नेता, आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेले फ्रान्सिस डिसोझा, अलीकडेच इस्पितळात दाखल व्हावे लागलेले वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा आणि उपरोल्लेखीत घडामोडी पाहाता विशेषतः राजकीय क्षेत्रात वावरणारी मंडळी आपल्या आरोग्याविषयी धास्तावणे स्वाभाविक आहे. केवळ गोव्यातील राजकारण्यांच्याच मागे दुर्धर आजारांचे हे शुक्लकाष्ठ लागलेले आहे असे नव्हे. केंद्रीय राजकारणामध्येही हीच परिस्थिती दिसते आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मूत्रपिंड निकामी झाले, तेव्हा एका दात्याने त्यांच्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड दिले. अर्थमंत्री अरुण जेटलींवर गॅस्ट्रीक बायपास झाली आहे. सोनिया गांधींना वैद्यकीय समस्येमुळे वाराणसीतील रोड शो सोडून दिल्लीत परतावे लागले होते. त्यानंतरही त्यांना विदेशात उपचार घ्यावे लागले. शरद पवार कर्करोगावर मात करून सार्वजनिक जीवनात जिद्दीने वावरत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गेले एक दशक ऑस्टिओआथ्रायटिसने शरपंजरी आहेत. अन्य खासदार, आमदारांपैकी असंख्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत आणि यापैकी बहुतांशी आजार हे सततचा ताणतणाव, अस्थिर जीवनशैली, अवेळी खाणेपिणे यामुळे त्यांनी ओढवून घेतला आहे. आज जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये विलक्षण गती आलेली आहे. काळाशी स्पर्धा करीत माणसे धावत आहेत. त्यांना वेळ अपुरा पडतो आहे. पत्रकारितेपासून राजकारणापर्यंत आणि नोकरीपासून उद्योगधंद्यांपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये दैनंदिन जीवनामध्येच विलक्षण ताणतणावांना माणसांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे वेळ द्यायला त्यांना सवड नसते. त्याकडे दुर्लक्ष होत जाते आणि शेवटी एखादी घातवेळ येते जेव्हा सगळे होत्याचे नव्हते होऊन जाते. हे केवळ स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार्‍यांच्या बाबतीत घडते असेही नव्हे. स्वतःच्या फिटनेसची काळजी घेणार्‍या आणि वयाने तरुण आणि शिडशिडीत असलेल्या माणसांवरही जेव्हा अचानक एखादे दुर्धर आजाराचे संकट कोसळते तेव्हा दैवगतीला दोष देण्यावाचून दुसरे काही आपल्या हाती नसते. मात्र, आजकाल आजूबाजूला सर्रास दिसणार्‍या बहुतेक समस्यांमागे जीवनातील ताणतणाव हेच मूळ कारण असल्याचे प्रकर्षाने जाणवल्यावाचून राहात नाही. विशेषतः सार्वजनिक जीवनात वावरणार्‍यांना स्वतःसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. सतत जनतेच्या गराड्यात वावरणे, त्यांच्या सुख दुःखाशी, समस्यांशी समरस होणे, त्यातून येणार्‍या तणावाला सामोरे जाणे हे कधीकधी आवाक्याबाहेर जाते आणि मग त्यातून अनारोग्याच्या समस्या उद्भवतात. तणावामुळे डोकेदुखी, ह्रदयात जळजळ, वेगवान श्वसन, पचनक्रियेच्या समस्या इथपासून ते उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, ह्रदयविकार उद्भवणे, मेंदूत रक्तस्त्राव होणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. आजकाल कोणत्या वयात कोणता आजार उद्भवावा याचे काही प्रमाण उरलेले नाही. अत्यंत तरुण वयामध्ये देखील आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जाव्या लागलेल्या माणसांना आपण पाहतो. आज वैद्यकीय विज्ञान प्रगत झालेले आहे, सुविधाही निर्माण झालेल्या आहेत, परंतु अनारोग्याची कारणेही वाढली आहेत. पूर्वापार चालत आलेले निसर्गसन्मुख जीवन आज राहिलेले नाही. राजकारणामध्ये असणार्‍या मंडळींना अशावेळी किमान उपचारांसाठीचे आर्थिक बळ तरी उपलब्ध असते, त्यामुळे ते वाट्टेल तिथे जाऊन वाट्टेल ते महागडे उपचार घेऊ शकतात, परंतु सर्वसामान्यांचे काय? आरोग्यविम्याच्या भरवशावर शक्य तेवढे उपचार घेण्यावाचून त्यांच्या हाती काही नसते. अशा वेळी स्वानुभवाने तरी शहाणे होऊन राजकारण्यांनी सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी अधिक सेवासुविधा उपलब्ध करून देणारी, त्यांना आर्थिक बळ पुरवणारी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. काळाचा घाला कधी सांगून येत नाही. जीवनातील ही अशाश्‍वतीच जोवर आपण कार्यरत आहोत तोवर आपल्या हातून काही चांगले काम करण्याची सुबुद्धी माणसांना देऊ शकेल. जीवनाची नश्‍वरता आजवर भारतीय अध्यात्माने परोपरी समाजाला सांगितली. आजकाल अवतीभवती घडणार्‍या घटनांतून ती आपल्याला जाणवते आहे. अशा वेळी किमान या संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य जनतेला मिळावे यासाठी ज्यांच्या हाती सत्तेची दोरी आहे त्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.