तांत्रिक शिक्षण आणि रोजगार

0
797
  • नागेश सु. सरदेसाई

बेकारीच्या भस्मासुराला नामशेष करण्यात आपल्या नागरिकांना जरूर यश संपादन होईल, यात शंका नाही. आज आमच्या देशाची तरुणाई या अनुषंगाने काम करून तांत्रिक क्षेत्रात मजल मारीत नोकर्‍यांची समस्या दूर करील आणि जॉब सिकर्स दूर होऊन जॉब गिव्हर्स किंवा जॉब क्रियेटर्स बनले अशी आशा आहे.

 

२१व्या शतकामध्ये शिक्षण आणि गुणात्मक दर्जा ही बाब एक आव्हान बनून उभी आहे. आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने बेकारीचा भस्मासुर अक्राळविक्राळ स्वरूपात उभा आहे. आपल्या देशात आज वेगवेगळ्या प्रकारचे स्नातक उपलब्ध आहेत. परंतु कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये पदवी प्राप्त केलेली तरुणमंडळीही छोटी-छोटी कामे करताना दिसतात. आजच्या विज्ञान युगात आम्ही स्वयंरोजगार आणि मानव संसाधन या विषयांवर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज बनली आहे.
आपल्या देशात तांत्रिक शिक्षणपद्धती विकसित झालेली दिसते. आय.टी.आय., तंंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, त्याचप्रमाणे वास्तुविशारद अशा विविध प्रकारांनी नटलेले तांत्रिक शिक्षणाचे जाळे चांगल्या प्रकारे विणलेले दिसते. ‘मेक इन इंडिया’च्या मंत्रानुसार आपल्या देशात ‘सॅमसंग’सारख्या जागतिक दर्जाच्या आस्थापनाने नोयडा शहरात जगातली सर्वात मोठी मोबाईल कंपनी स्थापन केली आहे. त्यात हजारोंच्या संख्येने तरुणांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

‘टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर’च्या माध्यमातून आज विश्‍व जवळजवळ एक गाव बनला आहे. ‘कौशल्य विकास’ हे सरकारचे ब्रीदवाक्यच बनले आहे. आज आपल्याला कला किंवा वाणिज्य शाखेचे तरुण भेटतील, पण तांत्रिक गुण असलेले तरुण मिळणे कठीण आहे. कारपेंटर, फिटर, फ्लंबर इत्यादी मिळणे मुश्किल झाले आहे. आजच्या तरुणांमध्ये ‘व्हाईट कॉलर’ नोकरीसंबंधाने ही कामे करणे यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे. ‘ब्ल्यू कॉलर’ नोकरीत तांत्रिक शिक्षणाचा जादातर उपयोग होतो. आज समाजामध्ये त्यासंबंधी प्रसार व्हायला पाहिजे. तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व आजच्या तरुणमंडळीमध्ये शाळा-कॉलेज स्तरावरच समजून देण्याची गरज आहे. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ असा निर्धार करून आम्ही पुढचं पाऊल उलण्याची गरज आहे. तरुणमंडळी आज पैशांच्या हव्यासापायी गैरजबाबदार पद्धतीने वागताना दिसत आहेत.

‘व्यवसाय मार्गदर्शन’ ही आज काळाची गरज बनली आहे. त्यासाठी तरुणांना योग्य पद्धतीने व्यवसाय मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जीवनामध्ये यश संपादन करणे ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्यानुसार आनंद मिळवून शिक्षण घेणे आणि जीवनात ‘इमोशनल कोशंट’ सांभाळणे आवश्यक आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ ही बाबही दुर्लक्षून चालणार नाही. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आपण वेगवेगळ्या क्षेत्रांनी त्रस्त झालो आहोत. तांत्रिक शिक्षण योग्य प्रकारे समजून घेऊन, काम हे सर्वातोपरी समजून त्याला श्रद्धेचं रूप देऊन, ते काम योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. आजच्या तरुणाने व्यवसाय आणि व्यवस्थापन समजून घ्यावे व व्यवसाय निश्‍चित करून बेकारीचा भस्मासुर नष्ट करावा. त्यासाठी आजच्या तरुणाईमध्ये स्थिरता आणून त्यांना योग्य शिक्षण निवडून व्यवसायासाठी पात्र करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आजची शिक्षणप्रणाली तरुणांना सक्षम बनवण्यात कमी पडत आहे असे दिसून येते. ‘मार्केट फोर्सर्स’ त्यांना हवे तसे तरुण मिळत नाहीत म्हणून विद्यापीठ प्रणालीवर टीका करत आहेत. विश्‍वविद्यालय अनुदान आयोग (युनिव्हर्सिटी ग्रॅण्डस् कमिशन- यूजीसी) आपल्या पद्धतीने या दिशेने बदल करीत आहे. पण त्यात फार कमी बदल दिसल्याने अजीम प्रेमजीसारखे उद्योजक आज आपल्या स्वायत्त संस्था तयार करून तरुणांना मार्गदर्शन देत आहेत. त्यांना विशेष तांत्रिक शिक्षण देऊन, उद्योग जगतासाठी तयार करत आहेत. आज उद्योग क्षेत्र झपाट्याने प्रगत होत आहे आणि आपली तरुणमंडळी या बदलत्या प्रवाहात सामील व्हावी म्हणून सरकार दरबारी प्रयत्न चालू आहेत. नीती आयोग आपल्या वेगवेगळ्या संशोधनांतून कौशल्य शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आज आपण एक धावती नजर टाकली तर आपल्याला दिसेल की शिक्षणप्रणालीमध्ये बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे. वेगवेगळ्या शाळांमधून अटल टिंकरिंग लॅब्स सुरू करून शाळकरी मुलांना तंत्रज्ञानाची जाण लहान वयात करून देणे ही त्यामागची कल्पना आहे. त्याचप्रमाणे आज आपण हॅकॅथॉन म्हणून वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्टार्टअप हा प्रकार बघत असतो. या अनुशंगाने प्रधानमंत्री स्वतः लक्ष घालून त्या तरुणमंडळीशी संपर्क साधून त्यांची ऊर्जा वाढवताना दिसत आहेत. ऍप्सच्या माध्यमाने वेगवेगळ्या समस्यांवर मात करून, एक सकारात्मक निर्णयाने ‘नवीन युगाची’ संकल्पना घडताना दिसत आहे. ‘स्टार्टअप’च्या दिशेने प्रवास करून, ऍप्सची निर्मिती होऊन, आपल्या देशाच्या समस्यांकडे लक्ष दिल्यास प्रगतीचा आलेख उंचावत जाईल यात शंका नाही.
याच अनुषंगाने तांत्रिक शिक्षणाची गरज आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. भारताची तरुणमंडळी ही या देशाच्या ६५ टक्के लोकसंख्येचा भाग आहे. ती या दिशेनं गरुडझेप घेऊन वेगवेगळे तांत्रिक उपक्रम करून टेक्नॉक्रेट्‌स किंवा तंत्रज्ञ म्हणून काम करायला सज्ज होत आहेत. हातात हात घालून वाट चालताना आज आयटीआयएस, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, तसेच आयआयटी या उच्च शिक्षणाच्या संस्थांमधून आज तरुणमंडळी मोठ्या उमेदीने आणि आशेने बाहेर पडून भारताला २०२२ मध्ये पाच ट्रिलियन आर्थिक महासत्ता बनवण्यात हातभार लावील अशी आशा आहे.

आज भारत हा जगातला सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो आणि भारताचं हे विशेष यू.एस.पी. म्हणून विश्‍वात वाटचाल करायला सज्ज आहे. आपल्या देशाची बेकारी, आणि बेकारीच्या भस्मासुराला नामशेष करण्यात आपल्या नागरिकांना जरूर यश संपादन होईल, यात शंका नाही. आज आमच्या देशाची तरुणाई या अनुषंगाने काम करून तांत्रिक क्षेत्रात मजल मारीत नोकर्‍यांची समस्या दूर करील आणि जॉब सिकर्स दूर होऊन जॉब गिव्हर्स किंवा जॉब क्रियेटर्स बनले अशी आशा आहे. तरुणांना या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्या प्रकारची मदत मिळून, या क्रांतीला आधार देऊन, भारत औद्योगिक क्रांती घडवून आणेल आणि नोकरीची समस्या दूर होईल यात शंका नाही.