तर भारत सिडनी कसोटी जिंकला असता

0
154

>> इरफानची स्टीव बकनर यांच्यावर खरमरीत टीका

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने आयसीसीचे माजी पंच स्टीव बकनर यांच्यावर सडकून टीका केली आहे. तब्बल १२ वर्षांचा कालावधी घेतल्यानंतरही केवळ दोनच चूका मान्य केल्याबद्दल त्याने आश्‍चर्यदेखील व्यक्त केले आहे. अँड्र्‌यू सायमंंडस् ज्यावेळी फलंदाजी करत होता, तेव्हा तो ३ वेळा बाद झाला होता. परंतु पंचाने एकदाही त्याला बाद घोषित केले नाही, असे पठाण म्हणाला.
‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना इरफान याने बकनर यांचा खरपूर समाचार घेताना त्यांनी २००८च्या सिडनी कसोटीत दोन नव्हे तर तब्बल सात चूका केल्या होत्या, असे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच बकनर यांनी जाहीररित्या आपल्या दोन चुकांची कबुली दिली होती.

एक क्रिकेटपटू म्हणून आम्ही त्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही वेळी वाईट पंचगिरीचा सामना केला. त्या सामन्यात पंचाकडून केवळ एक नाही तर तब्बल ७ चुका झाल्या होत्या. तुम्ही किती चुका मान्य करता, याचा काही फरक पडत नाही. जे व्हायचे होते, ते झाले. आम्ही तो सामना गमावला. मला आठवते की मी माझा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडिलेड येथे खेळला होता तसेच तो सामना आम्ही जिंकलो होतो. आणि फक्त पंचांच्या चुकीमुळे आम्ही सिडनी कसोटी सामना गमावला? पंच आता काय बोलतात याने काहीही फरक पडणार नाही, असेही तो पुढे म्हणाला. सायमंडस् सामनावीर होता, आम्ही सिडनी कसोटीत १२२ धावांनी पराभूत झालो होतो. सायमंडस्‌विरुद्ध फक्त एक जरी निर्णय योग्य ठरला असता, तर आम्ही तो सामना सहज जिंकला असता, असे पठाण म्हणाला.

याव्यतिरिक्त भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू सायमंडस्‌मध्ये झालेल्या मंकी गेट प्रकरणामुळेदेखील तो सामना वादग्रस्त राहिला होता. हा वाद इतका वाढला होता की, आयसीसीला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला होता. सिडनी कसोटी क्रिकेटला क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त सामना म्हटले जाते.