तरुण तुर्काचा वेधक राजकीय प्रवास चंद्रशेखर ः द लास्ट आयकॉन ऑफ आयडियॉलॉजीकल पॉलिटिक्स

0
213

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

 

त्यांच्यातल्या बंडखोराला त्यांना दूर सारता आले नाही. ‘तरुण तुर्क’ ही त्यांची ओळखही त्यांच्या सोबत कायम राहिली. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे या आठवड्यात हाती आलेले श्री. चंद्रशेखर यांचे सुंदर, विस्तृत चरित्र. हा केवळ चंद्रशेखर यांच्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा नाही. एका परीने भारताचाच हा सारा राजकीय इतिहास आहे!

 

 

भारताचे आठवे पंतप्रधान श्री. चंद्रशेखर यांची सगळी राजकीय कारकीर्द बंडखोर म्हणूनच गेली. प्रजा समाजवादी पक्ष असो, कॉंग्रेस असो अथवा नंतरचा समाजवादी जनता दल; चंद्रशेखर नेहमी बंडखोर म्हणूनच वावरले आणि या बंडखोरीवरच त्यांची अवघी राजकीय कारकीर्द उभी राहिली. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून ते अगदी जुलै २००७ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंतचा त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास अगदी पं. नेहरूंपासून इंदिरा गांधी, राजीव गांधींपर्यंत चालत आला, परंतु त्यांच्यातल्या बंडखोराला त्यांना दूर सारता आले नाही. ‘तरुण तुर्क’ ही त्यांची ओळखही त्यांच्या सोबत कायम राहिली. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे या आठवड्यात हाती आलेले श्री. चंद्रशेखर यांचे सुंदर, विस्तृत चरित्र. हा केवळ चंद्रशेखर यांच्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा नाही. एका परीने भारताचाच हा सारा राजकीय इतिहास आहे आणि म्हणूनच अत्यंत वाचनीय आहे.

चंद्रशेखर यांचा राजकीय प्रवास प्रजासमाजवादी पक्षातून सुरू झाला. परंतु जेव्हा त्या पक्षामध्ये १९५५ साली डॉ. राममनोहर लोहिया आणि आचार्य नरेंद्र देव असे दोन गट पडले, तेव्हा चंद्रशेखर आचार्य नरेंद्र देवांसमवेत ओढले गेले. लोहियांसारख्या बड्या नेत्याशीही त्यांनी तेव्हा पंगा घेण्याचे धैर्य दाखवले. ६३ साली प्रजा समाजवादी पक्षाचे नेते अशोक मेहता यांनी ‘कम्पल्शन ऑफ बॅकवर्ड इकॉनॉमी’ हा सिद्धान्त मांडून मागास अर्थव्यवस्था असलेल्या देशांतील विरोधी पक्षीयांनी राष्ट्रविकासासाठी सरकारला साथ दिली पाहिजे असा आग्रह धरला तेव्हा ते विदेश दौर्‍यावर असताना पक्षातून मेहतांची हकालपट्टी करण्यात आली. तेव्हा मेहतांच्या या भूमिकेला जाहीरपणे पाठिंबा देत स्वतःही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा देणारे बंडखोर होते चंद्रशेखर. प्रजा समाजवादी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांना कॉंग्रेसने जवळ केले. इंदिरा गांधींशी तेव्हा त्यांची झालेली पहिली भेटही सांगण्यासारखी आहे. इंदिरा गांधींनी त्यांना विचारले की कॉंग्रेस समाजवादी विचारांच्या वाटेवरून चालते आहे असे नाही का तुम्हाला वाटत? तेव्हा चंद्रशेखरांनी स्पष्टपणे नकारार्थी उत्तर दिले. आपण कॉंग्रेसमध्ये समाजवाद रुजवेन असेही त्यांनी इंदिराजींना सांगितले. त्यावर इंदिराजींनी त्यांना प्रतिप्रश्न केला की, ‘हे तुम्हाला जमले नाही तर?’ चंद्रशेखर यांनी त्यावर काय उत्तर द्यावे! ते उत्तरले, ‘नाही जमले तर पक्ष फोडेन!’ असा हा स्पष्टवक्ता, परखड विचारांचा धगधगता नेता. त्याचे व्यक्तिमत्त्व या चरित्रातून लेखक हरिवंश आणि रविदत्त वाजपेयी यांनी फार सुंदररीत्या साकारले आहे.

इंदिराजींशी बेबनाव झालेला असताना त्यांचा विरोध असूनही तीन वेळा कॉंग्रेस कार्यकारिणीवर निवडून येण्याचा चमत्कार करून दाखवणारे नेते म्हणजे चंद्रशेखर. कॉंग्रेसच्या अध्यक्षांचा विरोध असतानाही निवडून येण्याची अशी किमया तत्पूर्वी केवळ एकाच व्यक्तीने केली होती ते होते डॉ. सुभाषचंद्र बोस. १९३९ च्या कॉंग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनात महात्मा गांधींचा पाठिंबा पट्टभि सीतारामय्या यांना असतानाही नेताजी निवडून आले होते.

चंद्रशेखर तरुणपणी राजकारणात सक्रिय झाले त्याला आचार्य नरेंद्र देव कारणीभूत ठरले. पीएच. डी. करायला निघालेल्या चंद्रशेखरांना नरेंद्र देवांनी सवाल केला की, ‘देशच राहिला नाही तर तुमचा प्रबंध कोण वाचेल?’ आणि चंद्रशेखर यांनी राष्ट्रकारणाच्या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली. बलियापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आचार्य नरेंद्र देवांच्या आग्रहापोटी लखनौमध्ये पक्षाचे काम पाहू लागताच खर्‍या अर्थाने बहरली. त्यांनी त्यांना केवळ एका वर्षासाठी लखनौला बोलावले होते, पण चंद्रशेखर त्यात एवढे रुळले की नऊ वर्षे ते लखनौत राहिले. पक्ष संघटना बांधली. तत्कालीन समाजवादी नेत्यांचा दुटप्पीपणाही त्यांना या काळात जवळून अनुभवायला मिळाला. पक्षाच्या एका तत्कालीन खासदारांसमवेत प्रवास करण्याची वेळ आली तेव्हा सगळा खर्च त्या महाशयानी तरुण चंद्रशेखरांना कसा करायला लावला होता हा किस्सा मुळातून वाचण्यासारखा आहे.

६२ साली प्रजासमाजवादी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. संसदेमध्ये आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी चंद्रशेखर यांनी छाप उठवली. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरों यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण संसदेत उपस्थित करून त्यांनी त्यांचा चौकशी अहवाल संसदेत मांडण्याची मागणी लावून धरली तेव्हा पंतप्रधान नेहरूंनी सदर अहवाल गोपनीय असल्याची भूमिका घेत चर्चेस नकार देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर चंद्रशेखर यांनी सदर अहवाल गोपनीय नसून तत्पूर्वी झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनात त्यावर चर्चाही झाली असल्याचे वृत्तपत्रीय कात्रणांच्या आधारे सिद्ध करताच नेहरूंना देखील दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. तेव्हाच्या बिर्लांसारख्या बड्या भांडवलदारांच्या विरोधात चंद्रशेखरांनी रान पेटवले. त्यामुळे पुढे कॉंग्रेसवासी असताना चंद्रशेखर यांची राज्यसभेची उमेदवारी डावलण्याचा प्रयत्न होताच स्वतः इंदिरा गांधींनी हस्तक्षेप करून ती कायम ठेवली होती. इंदिरा गांधींच्या धूर्त, धोरणी राजकारणाला चंद्रशेखर आणि त्यांच्या सोबतच्या ‘तरुण तुर्कां’नी साथ दिली. कॉंग्रेसमधील हा अनौपचारिक गट महत्त्वाच्या आर्थिक व राजकीय विषयांवरील आपली प्रागतिक धोरणे पक्षाला स्वीकारण्यास भाग पाडायचा. दहा कलमी आर्थिक कार्यक्रम स्वीकारायला त्यांनी पक्षाला भाग पाडले. बँक राष्ट्रीयीकरण, तनखा बंदी आदी विषयांमध्ये चंद्रशेखरांनी इंदिरा गांधींना भक्कम साथ दिली. त्यामुळे कॉंग्रेसमधील एका गटाची नाराजी त्यांना ओढवून घ्यावी लागली. पक्षाच्या फरिदाबाद अधिवेशनात निजलिंगाप्पा यांनी इंदिरा गांधी या तरुण तुर्कांना पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेवला होता. पण जेव्हा देशात आणीबाणी लावली गेली तेव्हा त्याच इंदिराजींनी चंद्रशेखरांनाही तुरुंगात पाठवायला कमी केले नाही. रोहतकच्या तुरुंगात त्याना १९ महिने कारावास घडला. त्यानंतर एच. एन. बहुगुणा आणि चंद्रशेखर यांची गुप्त भेट झाली आणि इंदिरा गांधींविरुद्ध बंडाची तयारी झाली. त्यांना चौधरी चरणसिंगही येऊन मिळाले. जगजीवनराम हेही आपल्याला सामील होण्यास तयार असल्याचा निरोप मिळताच चंद्रशेखर शाल लपेटून रिक्षाने त्यांना भेटायला गेले. यातून ‘कॉंग्रेस फॉर डेमोक्रसी’पक्षाची स्थापना झाली. खरे तर इंदिरा गांधी व जयप्रकाश यांच्यात समझोता जवळजवळ झाला असता, परंतु त्यात जगजीवनराम यांनी खो घातला होता असे चंद्रशेखर यांनी लिहून ठेवले असल्याची माहिती लेखकाने दिली आहे.

आणीबाणीनंतर कॉंग्रेसेतर पक्षांचे एकत्रीकरण झाले व जनता पक्षाचे सरकार घडले तेव्हा मोरारजींच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखरांचा समावेश होणार होता, परंतु मोहन धारिया चंद्रशेखरांना भेटले व मंत्रिमंडळात त्यांच्या ऐवजी आपला समावेश व्हावा अशी गळ घातली असेही लेखकाचे म्हणणे आहे. मोरारजींऐवजी जगजीवनराम यांना पंतप्रधान करावे असा आग्रह चंद्रशेखर यांनी धरला होता. त्यासाठी जयप्रकाश नारायण यांची त्यांनी भेटही घेतली होती, परंतु जयप्रकाश नारायणांनी आचार्य कृपलानी, राधाकृष्ण, नारायण देसाई आदींचा सल्ला घेतला तेव्हा त्या सर्वांनी मोरारजींच्या नावाला कौल दिला. जगजीवनराम यांनी सुरवातीला आणीबाणीला पाठिंबा दिला होता व आणीबाणीचा प्रस्ताव संसदेपुढे तेच घेऊन गेले होते असा मुद्दा चौधरी चरणसिंग यांनी उपस्थित केल्याने जगजीवनराम यांचे पंतप्रधानपद हुकले असे लेखक म्हणतात. पुढे जनता पक्षात उफाळलेले मतभेद, चंद्रशेखर यांची पदयात्रा, पुढे राजीव गांधींच्या मदतीने कॉंग्रेसच्या बाहेरील पाठिंब्यावर त्यांनी स्थापन केलेले अल्पमतातील सरकार हा सारा इतिहास सर्वज्ञात आहे. राजीव गांधींच्या घरावर दोघा पोलिसांकरवी पाळत ठेवल्याचा आरोप झाला आणि चंद्रशेखरांनी राजीनामा दिला आणि त्यांचे ते लुटुपुटूचे सरकार कोसळले.

पंजाबमधील ऑपरेशन ब्ल्यू स्टार, बोफोर्स आदींबाबत चंद्रशेखर यांची परखड मते होती. त्यामुळे त्यांच्यावरचा बंडखोराचा शिक्का कधी पुसला गेला नाही.
चरित्रलेखक शेवटी समापन करताना म्हणतात, ‘कोणत्याही नेत्याचा वारसा तीन निकषांवर ठरवता येतो. १. जात, धर्माच्या पलीकडे त्या नेत्याला किती स्वीकारार्हता होती, २. त्या नेत्याने मागे ठेवलेला वैचारिक वारसा काय आहे, आणि ३. त्याचे कुटुंब त्याच्या पश्‍चात् कोणत्या स्वरूपात जीवन कंठते आहे. चंद्रशेखर यांचे नेतृत्व आणि त्याचा वारसा वरील तिन्ही निकष लावले तरी झळाळून उठतो असे चरित्रकारांचे प्रतिपादन आहे. देशाला फारसे जवळून परिचित नसलेले चंद्रशेखर यांचे राजकीय जीवन समजून घेण्यासाठी हे महत्त्वपूर्ण माहितीने खच्चून भरलेले चरित्र आवर्जून वाचण्याजोगे आहे. पुस्तकाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रस्तावनाही आहे.