तरुणाईवर श्रमसंस्कार

0
81

युवाशक्तीच्या मनातील अस्वस्थतेला रचनात्मक अभिव्यक्ती देणारी सोमनाथची ‘श्रमसंस्कार छावणी’ यंदाच्या मे
महिन्यात भरेल आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेला हा सेवायज्ञ पुन्हा धगधगेल. गेली ४८ वर्षे अखंड सुरू असलेल्या या मोहिमेचा हा आढावा.
बाबा आमटे यांनी अमर्याद श्रमातून जीवनात काहीही आशा शिल्लक नसलेल्या कुष्ठरुग्णांसमवेत काटेरी झाडाझुडपांनी भरलेल्या माळरानावर ‘आनंदवन’ उभारले. एकेकाळी निराशेच्या गर्तेत स्वतःचा गळा घोटून घेणारे हात समाजासाठी लाखोंचे अन्नधान्य पिकवू लागले, तेव्हा आयुष्याचे न सुटलेले कोडे बाबांना उलगडू लागले. ‘श्रमात’ त्यांना व इतरांचा त्यांचा ‘श्रीराम’ गवसला मात्र, काही प्रश्‍नांनी बाबा अगतिक होत. वैराण माळरानावर समाजाने झिडकारलेला, हातापायांना बोटे नसलेला कुष्ठरोगी जर नवजीवन साकारू शकतो, आनंदवन उभारू शकतो, तर धट्टेकट्टे तरुण हात असे का करू शकत नाहीत? का म्हणून कणखर शरीराच्या आत ‘रोगी’ मन वास करतं? काय करावं ज्याने ‘युवाकंप’ होईल आणि ही युवाशक्ती रचनात्मक कार्यासाठी वापरता येईल?
युवाशक्तीच्या क्षमतांवर बाबांचा दुर्दम्य विश्‍वास. मात्र, जीवनाचा खरा अर्थ शोधताना अख्खी तरुण पिढी चाचपडते आहे हे पाहून युवाशक्तीच्या अंतरात्म्याला साद घालण्यासाठी बाबांनी १९६७ साली मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल या तालुक्याच्या ठिकाणापासून १३ किलोमीटर अंतरावरील निबीड अरण्यात सोमनाथ प्रकल्पावर एका छावणीची नीव रचली. तिचे नाव ‘श्रम-संस्कार छावणी’. पहिल्याच छावणीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत देशभरातील सुमारे १५०० उत्स्फूर्त तरुण-तरुणींचा जत्था सोमनाथला दाखल झाला. पहाटे ठीक चार वाजता बहुभाषिक गीतांच्या गजराने उठून, शूचिर्भूत होऊन, रोज सकाळी साडेपाचला हा जत्था जंगल साफ करणे, जमीन समतल करणे, बांध घालणे, विहीर खणणे, तलाव खोदणे, इत्यादी कामे करायला जाई. चार तास श्रमदान केल्यावर दुपारच्या सत्रात समकालीन सामाजिक विषयांवर भाषणे, गहन चर्चा घडत. सोमनाथच्या झाडांखाली झडणार्‍या या चर्चांतून जे मुद्दे निघत, त्यावर भारतभर विविध ठिकाणी चर्चासत्रे घडत, त्यातून नव्या संकल्पना जन्माला येत, त्यासाठी कार्यकर्ते उभे ठाकत आणि संस्था आकाराला येत. ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ’, ‘लोकविज्ञान चळवळ’, ‘भारत जोडो अभियान’, पंजाबमधील ‘पीस बाय पीस मिशन’, ‘राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)’ … एक नव्हे कित्येक समाज परिवर्तनाला कारणीभूत अशा चळवळींची पायाभरणी छावणीत झाली. स्नेहालयसारख्या अनेक सामाजिक संस्थाही सुरू झाल्या.
ही छावणी गेले ४८ वर्षे अशीच अव्याहत सुरू आहे. छावणीचा मंत्र एकच- ‘श्रम ही है श्रीराम हमारा’! छावणी दरवर्षी १५ ते २२ मे या कालावधीत भरते. पहाटे ४ ते रात्री १० अशा वेळात कार्यक्रमांनी गच्च भरलेली छावणी कुठलाही कागद देत नाही; पण ‘मणभर बाष्कळ गप्पांपेक्षा लहानशा अर्थपूर्ण कृतीतून मानव्य साकारते’ हे जीवनविषयक तत्त्वज्ञान आतवर भिनवायला जागा बनवते, आत्मभानाचे अंकुर रुजवायला ‘स्व’ला प्रवृत्त करते, प्रेरणा समजून घेऊन साथ देणारे साथी देते, मनातील अस्वस्थतेला रचनात्मक अभिव्यक्ती देते.
आज प्रश्‍नांचे स्वरूप बदलले आहे. देश संक्रमणावस्थेतून चालला आहे. अस्वस्थ करणारे समाजातील अनेक नवे बदल आणि प्रवाह आपल्याला दिसतात. अजूनही वयात न आलेल्या ‘सोशल मिडिया’मध्ये आजची तरुणाई दंग आहे. कधी धर्माच्या तर कधी जातीच्या नावाने चुकीच्या मार्गाने लागताना दिसत आहे. त्यामुळे आज श्रमसंस्कार छावणीची कधी नव्हे इतकी गरज आहे. कालावधी १५ ते २२ मे २०१६. संपर्क ः ९६८९८८८३८१.