तरुणाईच्या प्रतिभेचा ‘सृजनसंगम’!

0
97
  • समृद्धी केरकर

आज काहीजण असेही आहेत ज्यांना समाजातील या समस्यांचे भान असते व ते सतत समाजासाठी काही ना काही करावे या भावनेने भारलेले असतात. मग त्यांच्याच मनातील तीव्र इच्छेमुळे जन्म घेतात तरुणाईच्या प्रतिभेचा शोध घेणारे कार्यक्रम… जसे की ‘सृजनसंगम’!

तारुण्य, किशोरवय ही एक आपल्या प्रत्येकाच्या जीवनप्रवासातील अतिशय महत्त्वाची अशी पायरी. या पायरीवर उभे असताना आपण काही अगदीच लहान-निरागस बाळ असत नाही ना आपण पूर्णपणे विकसित असतो! मग यामुळे अनेकदा आपल्या बालीश वा अविकसित विचारांमध्ये काय चांगलं, काय वाईट हे ठरवताना आपला बराच गोंधळ उडतो. अशा या गोंधळलेल्या स्थितीत, आपल्याला समजून घेणारं, मदत करून- काय आपल्यासाठी खरंच चांगलं आहे.. हे सांगणारं जर कोणी मिळालं नाही, तर बरेच जण विक्षिप्त रीतीने कुठेही भरकटून तर काही ती पायरी चढून.. वर जाऊन.. पुढचं आयुष्य बघण्याची आशाच सोडून देतात. त्यामुळेच तर सध्या आपल्याला लागोपाठ आत्महत्या, ड्रग्जचे व्यसन, बलात्कार, खून, बदल्याची भावना, दारू, उद्धटपणा या सगळ्या घटनांना ऊत आलेला दिसतो… या सगळ्यामुळे ‘तारुण्य’ ही पायरी जणु समाजमनात, उंचावरची भयानक कडाच असल्यासारखी झालेली आहे. ‘आजचे तरुण पूर्णपणे वाया गेलेले आहेत…’ हे वाक्यही आपल्याला जिथे बघावे तिथे सर्रासपणे ऐकायला येते. पण खरंच हे असं आहे का??
खरं म्हणजे हे वय फार चित्तवेधक आहे, जिज्ञासू आहे आणि तेवढंच उत्साही… पण आपल्या प्रत्येकाकडे एक कला असते, एक छंद असतो. या कलेशिवाय तर जगणं निरर्थकच.. त्यासोबतच या वयात आपल्या अनेक आशा-आकांक्षा असतात, निरनिराळी स्वप्न असतात आणि ती स्वप्न साकारण्याची क्षमताही.

पण मग कुठेतरी काहीतरी आडवं येतं, नाहीतर ओढथं तरी… आणि मग यालाच म्हटलं जातं भरकटणं!! पण याच वेळी जर आपल्या कलागुणांना चांगला वाव मिळाला, सुदृढ वातावरण मिळालं तर आपल्या मनातील कलेच्या बीजाला अंकूर फुटून तिचाच एक छंद बनून हळुहळू तिचंच एक सुंदर मोठ्ठं बहारदार झाड बनू शकतं. पण दुर्दैव म्हणजे हे कलेचे बीज आपल्या प्रत्येकाच्या अंगी असूनसुद्धा त्याला सुदृढ वातावरणाची कुठेतरी कमतरता भासते आहे ज्यामुळे ती अशीच मनामध्ये दडून राहते.

परंतु आज काहीजण असेही आहेत ज्यांना समाजातील या समस्यांचे भान असते व ते सतत समाजासाठी काही ना काही करावे या भावनेने भारले असतात. मग त्यांच्याच मनातील तीव्र इच्छेमुळे जन्म घेतात तरुणाईच्या प्रतिभेचा शोध घेणारे कार्यक्रम… जसे की ‘सृजनसंगम’.
हे प्रतिभेचे तेज अनुपम
हा प्रज्ञेचा साक्षात्कार
चला घडवू या तरुणाईच्या
कलागुणांचा आविष्कार..
सृजनसंगम… सृजनसंगम…

या सुंदर गाण्याने संगीतमय झालेल्या राजीव गांधी कलामंदिरात आम्ही पोहचताच पाहिलं की सर्वत्र प्रसन्न वातावरणाची एक अनोखी छटा उमटली होती.
‘सृजनसंगम’ हे नावच नुसतं ऐकल्यावर किती प्रसन्न भावना निर्माण होते ना मनात!! मलाही या सुंदर भावनेने गुरफटलं होतं. सूर्यकांत भैय्याने बाहेर प्रवेशद्वाराची सुंदर.. निसर्गप्रेमी.. केलेली सजावट, परंतु आत कार्यक्रम नक्की काय असेल हे मात्र मला माहीत नव्हतं. पण ते जाणून घेण्याची मनात तेवढीच उत्सुकता होती. आम्ही तिथे पोहचताच सर्वप्रथम मला कुठेतरी वेगळ्याच वातावरणात आल्यासारखं वाटलं. एरवी मीही अनेक कार्यक्रमांत भाग घेत असते, परंतु यावेळी मला संयोजक बनण्याची एक नवीन संधी प्राप्त झाली होती. मी व उत्कर्षा रांगोळी स्पर्धेचे संयोजक व कार्यकर्त्या होतो. त्याबरोबरच तिथे आणखीही बरेच ओळखीचे चेहरे होते, तसेच अनोळखीही होते. पण काही वेळातच आम्ही तिथल्या त्या वातावरणात एवढे रुळलो की तो कार्यक्रम म्हणजे आपलेच घर असल्यासारखे वाटू लागले आणि खरंच! तसाही तो कार्यक्रमही आपलाच होता…!

तिथे काम करताना वेगवेगळ्या मुलांच्या कला पारखताना खरंच खूप मजा आली. त्याचबरोबर काही जणांशी नवी मैत्रीही जुळली.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत नृत्य, गायन, वादन, पथनाट्य, ग्रुपी, छायाचित्र, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, चित्रकाव्य, सवेश प्रवेश अशा विविध कलांच्या मैफिलींनी कार्यक्रम अगदी रंगून गेला होता. त्या कलात्मक वातावरणात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी फार सुंदर व वेगळा होता.

आमची ही रांगोळीस्पर्धा आटोपल्यावर आम्ही सभागृहाच्या आतबाहेर सर्वत्र एक फेरफटका मारून आलो. त्यामध्ये अनेक मुलांच्या वेगवेगळ्या अप्रतिम कलाविष्कारांचे आम्ही दर्शन घेतले. तिथे अनेक स्पर्धा चालू होत्या. ठिकठिकाणी सगळे युवा कलाकार आपापल्या कलेत मग्न दिसत होते.

पण या कार्यक्रमाची एक खासीयत म्हणजे इथे आरडाओरडा, गोंगाट, किंकाळ्या असे काहीही नव्हते तर शेवटपर्यंत वातावरणात एक प्रसन्नता जाणवत होती.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, सृन संगमचे मुख्य आयोजक प्रा. वल्लभ केळकर आणि पदाधिकार्‍यांनी ज्या कल्पकतेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या नाविन्याबरोबरच तरुणाईच्या स्पंदनांच्या कलाविष्काराला व्यासपीठ देण्याचा हेतू होता आणि तो साध्यही झाला. सृजनसंगमच्या संकल्पनेचे दर्शन घडवणारे ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभु यांचे सुंदर आणि लोभस गीत आणि ते तितक्याच तन्मयतेनं सुमधुर आवाजात पेश करणारी तरुणाई हे सारे स्मृतीच्या कप्प्यात ठेवण्यासारखे होते!!