तमिळनाडूतील राजकारणाची नवी दिशा

0
143
  •  व्ही. त्यागराजन

तमिळनाडूतलं आजवरचं राजकारण व्यक्तिकेंद्रित राहिलं. अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन्, जयललिता आणि करुणानिधी यांचा जनमानसांवर मोठा प्रभाव होता. करुणानिधींच्या रूपाने यातील अखेरचा मोहराही काळाच्या पडद्याआड गेला. या पार्श्‍वभूमीवर अण्णाद्रमुकची भाजपाशी जवळीक वाढणार का, द्रमुकच्या स्टॅलिन यांचं नेतृत्व प्रभावी ठरणार का, कमल हसन- रजनीकांत काय करिष्मा दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तमिळनाडूचं राजकारण नेहमी व्यक्तिकेंद्रित राहत आलं आहे. पक्षापेक्षा नेत्यांवर अपार निष्ठा आणि त्यापोटी वाट्टेल ते करण्याची तयारी ही या राज्यातल्या कार्यकर्त्यांची तसंच जनमानसाचीही मानसिकता राहिली आहे. शिवाय तमिळ ङ्गिल्म इंडस्ट्री आणि तमिळनाडूतील राजकारण यांचाही ङ्गार जवळचा संबंध राहिला आहे.
राज्यातील विविध लोकप्रिय कलाकारांनी राजकीय क्षेत्रातही आपला प्रभाव कायम ठेवला. ही परंपरा आता कमल हसन, रजनीकांत यांच्यापर्यंत सुरू राहिली आहे. एके काळी एम. जी. रामचंद्रन् यांनी राज्यातील जनतेवर गारुड केलं होतं. पुढे हा वारसा जयललिता यांच्याकडे आला. दुसर्‍या बाजूला करुणानिधींचीही लोकप्रियता विचारात घेण्याजोगी राहिली. या नेत्यांनी आपल्या पक्षाचा प्रभाव केवळ तमिळनाडूपुरताच मर्यादित ठेवला नाही, तर केंद्रीय राजकारणानेही दखल घेण्याइतपत स्थान मिळवलं. विशेषत: आघाड्यांच्या राजकारणात अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना आपली दखल घेणं भाग पाडलं. हे करतानाच आपल्या पक्षाचा राज्यातला प्रभाव कमी होणार नाही, याकडेही जयललिता तसेच करुणानिधी यांनी विशेष लक्ष दिलं. हेसुद्धा तमिळनाडूतील राजकारणाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

अर्थात, एम. जी. रामचंद्रन् यांच्या निधनानंतर जयललिता यांनी अण्णाद्रमुकची सूत्रं हाती घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देतानाच एम. जी. रामचंद्रन् यांच्या आणि स्वत:च्या लोकप्रियतेचा पक्षाला लाभ मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याचे अपेक्षित परिणामही दिसून आले. या वाटचालीत अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यातील संघर्ष वेळोवेळी समोर आला.
खरं तर तमिळनाडूमधील राजकीय सुडाचा इतिहास संपूर्ण देशाला माहीत आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्यातील वाद कोणत्या थराला जाऊ शकतो हे संपूर्ण देशानं जवळून पाहिलं होतं. तमिळ अस्मितेचा आणि इथल्या राजकीय चढाओढीचा इतिहास तामिळनाडूमध्येच नाही तर संपूर्ण देशात बोलून दाखवला जातो. जयललिता यांचं चित्रसृष्टीतून राजकारणात झालेलं आगमन, राजकारणात त्यांनी घेतलेली एम. जी. रामचंद्रन् यांची जागा, व्यक्तिपूजेच्या माध्यमातून त्यांनी पक्षावर निर्माण केलेली पकड आदी मुद्दे कायम चर्चेत राहिले. दुसरीकडे द्रमुकचे नेते करुणानिधी यांचीही प्रदीर्घ खेळी राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय राहिली. जयललिता यांना धोबीपछाड देण्यासाठी ते नेहमीच मैदानात उभे असत. सत्तासंघर्षाला किंवा सुडाच्या राजकारणाला पाठ न दाखवता स्वतःचा वरचष्मा प्रस्थापित करण्याची लढाई लढत. म्हणून तर जयललितांचा पराभव करण्यासाठी एकेकाळचा वैरी असलेल्या कॉंग्रेसबरोबर युती करून का होईना, निवडणुकीच्या रणांगणात ते उभे ठाकत. केंद्रात कॉंग्रेस आघाडी सरकारमधील घटक पक्ष म्हणून द्रमुक सहभागी होता. मात्र, यूपीए-२ च्या काळात द्रमुकच्या ए. राजा आणि कनिमोळी या दोन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावेळी द्रमुकची स्थिती अडचणीची झाली होती. परंतु अलीकडेच सदर प्रकरणातून या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या पार्श्‍वभूमीवर द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या जाण्यानं तमिळनाडूच्या राजकारणावर होणारे परिणाम लक्षात घेणं गरजेचं ठरणार आहे. मुख्यत्वे जयललिता आणि त्यानंतर करुणानिधी या दोन दिग्गज नेत्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कोण आणि कशी भरून काढणार, हा प्रश्‍न आहे. अण्णाद्रमुकला बरोबर घेऊन राज्याच्या राजकारणात चांगला शिरकाव करता येईल, तसंच पक्षाचा प्रभाव वाढवता येईल, अशी आशा भाजपाचे नेते बाळगून आहेत. त्यामुळे भाजपाचे नेते अण्णाद्रमुकातील विविध गटांशी संपर्क ठेवून आहेत. केंद्र सरकारवरील अविश्‍वास ठरावावर अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. दुसरीकडे करुणानिधी यांनी मृत्यूपूर्वी पक्षाची सूत्रं एम. के. स्टॅलिन यांच्याकडे सोपवली आहेत.आता करुणानिधींच्या जाण्यानं निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ द्रमुकला होऊ शकतो. करुणानिधी हयात असताना पक्षनेतृत्वाबाबत दोन्ही मुलांमध्ये स्पर्धा होती. हे लक्षात घेऊन करुणानिधी यांनी हयात असतानाच पक्षाची सूत्रं स्टॅलिन यांच्याकडे दिली. त्यामुळे सध्यातरी स्टॅलिन हेच द्रमुकचं मुख्य नेतृत्व आहे. असं असलं तरी स्टॅलिन यांना स्वत:ची क्षमता सिध्द करावी लागणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणात चेहर्‍याला ङ्गार महत्त्व असतं. यापूर्वी एम. जी. रामचंद्रन, अण्णादुराई, जयललिता तसंच करुणानिधी यांच्यामुळे संबंधित पक्षांना मोठी लोकप्रियता लाभली. मात्र, आता तशी परिस्थिती असणार नाही. त्यामुळेच यापुढील काळात तमिळनाडूचं राजकारण कसं असणार, याविषयी उत्सुकता कायम राहणार आहे.

१९७० पासून २०१७-२०१८ पयर्र्ंतच्या देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा, त्यातही तमिळ अस्मिता आणि तमिळ हितसंबंध या संदर्भात सातत्याने दक्ष असलेला, तमिळ जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नेता अशी करुणानिधींची ख्याती होती. देशाच्या बदलत्या राजकारणाशी सातत्याने जुळवून घेऊन तमिळ हितसंबंधांचं राजकारण पुढे करण्यात करुणानिधींचा हातखंडा होता. श्रीलंकेतील तमिळींच्या प्रश्‍नावर त्यांची भूमिका वादग्रस्त आणि एलटीटीईला मदत करणारी ठरली. राजीव गांधींच्या हत्येनंतर त्या घटनेच्या चौकशीसाठी जैन आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या आयोगानं आपला अहवाल दिल्यानंतर कॉंग्रेसनं पाठिंबा काढून घेत तिसर्‍या आघाडीचं सरकार पाडलं होतं. त्यावेळी जैन आयोगाच्या अहवालात डीएमकेला जबाबदार धरण्यात आल्याचा आरोप झाला होता आणि तत्कालीन तिसर्‍या आघाडी सरकारला पाठिंबा देणार्‍या पक्षांमध्ये डीएमकेचा समावेश होता. त्यामुळे ते सरकार पाडण्यात आलं, असंही म्हटलं गेलं. त्यानंतर सत्तेत आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारशीही करुणानिधी यांनी जुळवून घेतलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाच्या सर्व भूमिका द्रमुकला मान्य नव्हत्या. त्यानंतर २००४ मध्ये केंद्रात सत्तेत आलेल्या कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारशीही करुणानिधी यांनी जमवून घेतलं. यावरून केंद्रात कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्याच्याशी जमवून घेण्यावर करुणानिधींचा भर राहिला, हे दिसून येतं.

तमिळ संस्कृतीला जागतिक दर्जा देण्यासाठी करुणानिधी यांनी अपार कष्ट घेतले. तमिळ साहित्य आणि संस्कृतीशी संबंधित महत्त्वपूर्ण जागतिक संमेलनं भरवण्यात त्यांचा पुढाकार असे. द्रमुकमध्ये ङ्गूट पडल्यानंतरही त्यांचा सातत्यानं अण्णाद्रमुकशी संघर्ष कायम राहिला. असं असलं तरी अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता आणि द्रमुकचे नेते करुणानिधी यांनी आपल्या राज्यात कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला ङ्गारसं स्थान मिळू दिलं नाही. परंतु आता जयललिता आणि करुणानिधी या जनमान्यता असलेल्या दोन्ही तमिळ नेत्यांच्या निधनानंतर तमिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याचा ङ्गायदा घेण्यासाठी कमल हसन, रजनीकांत यांच्यासारखे कलाकार राजकारणात उतरले आहेत. दुसरीकडे भाजपाच्या हिंदुत्ववादी राजकाराणाला यात संधी दिसत आहे. या राज्यात कॉंग्रेस संघटनात्मकरीत्या अत्यंत कमजोर झालेला पक्ष आहे. त्यामुळे द्रमुकला साथ देण्याशिवाय कॉंग्रेससमोर सध्या तरी पर्याय नाही.

प्रभावी नेत्यांअभावी रंगणार राजकारण 

१९८० पासून तमिळनाडूच्या राजकारणात एम. जी. रामचंद्रन्, करुणानिधी आणि जयललिता या तीन नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रामचंद्रन् यांच्यानंतर जयललिता यांनी अण्णाद्रमुकची धुरा समर्थपणे सांभाळली आणि विधानसभेच्या सहापैकी चार निवडणुका जिंकल्या. द्रमुक नेते करुणानिधी यांनी दोन निवडणुका जिंकून जयललिता यांना सातत्याने आव्हान दिले. आज तमिळनाडूच्या सामाजिक कल्याण, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत झालेल्या प्रगतीला या तीन नेत्यांची धोरणं कारणीभूत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेली २५ वर्षं संघर्ष करणारे जयललिता आणि करुणानिधी हे दोन्ही नेते आज आपल्यात नाहीत. ७० वर्षांनंतर प्रथमच तमिळनाडूचं राजकारण प्रभावी नेत्यांअभावी खेळलं जाणार आहे. द्रमुकचं नेतृत्व करुणानिधी यांनी दुसरे चिरंजीव एम. के. स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्त केलं. वडीलभावाचा विरोध असतानाही स्टॅलिन यांनी पक्षावर चांगलं नियंत्रण मिळवलं आहे. द्रमुक हा अत्यंत सुसंघटित, चांगल्या प्रकारे बांधणी केलेला इतर मागास जाती, मध्यम शेतकरी यांचा पक्ष आहे. जयललितांच्या काळात अण्णाद्रमुक हा पक्ष समाजातील वंचित घटक, दलित जाती, काही मागास जातींच्या पाठिंब्यावर काम करणारा पक्ष होता. मात्र, जयललितांच्या मृत्यूनंतर या पक्षात दोन गट झाले. सध्या राज्यात या पक्षाचं सरकार कार्यरत असून त्याचं विधानसभेत काठावर बहुमत आहे. पक्षातील १९ आमदारांचं नेतृत्व करणार्‍या दिनकरन् यांच्यामागे थोडी ताकद आहे. त्यांचं विधानसभा सदस्यत्व न्यायालयानं मान्य केलं तर पलानीस्वामी सरकार अल्पमतात येईल. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत दिनकरन् यांनी सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या उमेदवाराचा पराभव केला आणि द्रमुक उमेदवाराला तिसर्‍या क्रमांकाची मतं मिळाली. सध्या सत्ताधारी अण्णाद्रमुक भाजपाच्या जवळ आहे आणि केंद्र सरकारचा त्यांना पाठिंबा आहे. स्टॅलिन यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणून आघाडीचा प्रयत्न सुरू केला असून त्यात कॉंग्रेस, कम्युनिस्ट पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. दिनकरन् यांच्या पक्षालाही अशा प्रकारची आघाडी करावी लागणार आहे. त्यातच रजनीकांत आणि कमल हसन यांनी आपापले पक्ष स्थापन केले. त्यामुळे तमिळनाडूतील उद्याचं राजकारण गुंतागुंतीचं होण्याची शक्यता आहे. त्यात स्टॅलिन आणि दिनकरन् महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण पलानीस्वामींच्या पक्षाचा पराभव झाला तर स्टॅलिन दिनकरन् यांची साथ घेऊ शकतात. या परिस्थितीत कदाचित लोकसभा निवडणुकांसोबत तमिळनाडू विधानसभेची निवडणूक घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.