तणातणी

0
93

महाराष्ट्रातील शिवसेना आणि भाजपामधील गेले काही आठवडे सुरू असलेली तणातणी मिटण्याचे नाव घेताना दिसत नाही. मतदार मुकाट्याने हा तमाशा पाहात आहेत. येणार्‍या विधानसभा निवडणुकीनंतर आपले सरकार येणार आहे याची जणू या मंडळींना पुरेपूर खात्रीच दिसते. पण नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल लक्षात घेतले, तर केवळ मोदी लाटेच्या आधारे निवडणूक जिंकण्याचे दिवस राहिलेले नाहीत. ती लाट ओसरली की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता स्थानिक विषयांवरच ही निवडणूक लढवावी लागेल आणि त्यासाठी मतदारांमध्ये स्वतःप्रती विश्वास जागवावा लागेल. खरे तर जेव्हा शिवसेना – भाजप – रिपाईं – स्वाभिमानी संघटना आदींची ‘महायुती’ अस्तित्वात आली, राज्यात पुन्हा शिवशाही आणण्याच्या गर्जना महायुतीच्या व्यासपीठावर झाल्या, तेव्हा एक परिवर्तनाभिमुख वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले. सिंचन घोटाळा, आदर्श प्रकरण, केंद्रातील संपुआ सरकारचे अपयश असे अनेक तापलेले मुद्दे हाताशी होते. लोकसभेच्या निवडणुका जोमदारपणे या महायुतीने लढल्या आणि त्याचे फळही चांगले मिळाले. परंतु त्यानंतर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून जे काही चालले आहे, ते मतदारांचा या दोन्ही पक्षांबाबत भ्रमनिरास करणारे आहे. विशेषतः शिवसेनेची भूमिका सरळसरळ आडमुठेपणाची आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये केवढे मोठे अंतर आहे. पुलाखालून पाणी नव्हे, पाण्याचे लोटच्या लोट वाहून गेले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आज उरलेली नाही. अलीकडच्या निवडणुकांमधूनही हे वास्तव ठळकपणे समोर आलेले आहे. परंतु असे असूनही स्वतःला भाजपाहून वरचढ मानत त्यांनी जागांसाठी आपली मिनतवारी करीत राहावे अशी अपेक्षा ठेवून ज्या प्रकारे उद्धव ठाकरे जागांचे भाकरतुकडे फेकत राहिले आहेत, ते पाहिले, तर मोदींच्या प्रचंड विजयाने आधीच फुफ्फुसे फुगवून राहिलेल्या भारतीय जनता पक्षाला ते सहन होणे कदापि शक्य नाही. पंचवीस वर्षे असलेल्या नैसर्गिक युतीमध्ये मिठाचा खडा पडू नये असे एकीकडे म्हणायचे, आधी सत्ता येऊ द्या, मग सत्तेचे वाटप कसे करायचे ते बघू असा विवेक एकीकडे दाखवायचा आणि दुसरीकडे आम्ही म्हणू त्या आणि तेवढ्याच जागा मिळतील अशी टर्रेबाजी करीत मुख्यमंत्रिपदासाठीही स्वतःची दावेदारी आधीच पुढे करून मोकळे व्हायचे याला बालीशपणा म्हणायचे की स्वतःविषयीचा भलता भ्रम? शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पायांत पाय अडकवण्याच्या ज्या काही खेळ्या गेल्या काही दिवसांमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, त्याचा परिणाम म्हणून दोघेही पायांत पाय अडकून पडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. २००९ च्या निवडणुकीत भाजपाने ११९ आणि शिवसेनेने १६९ जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आता महायुतीतील इतर घटक पक्षांसाठी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी नऊ जागा सोडायला हव्या होत्या, परंतु आम्ही आमच्या नऊ जागांबरोबरच भाजपाने सोडायच्या नऊ जागाही मित्रपक्षांना द्यायला तयार आहोत. म्हणजे आमच्या वाट्याच्या १८ जागा कमी करायला तयार आहोत असे सांगून शिवसेनेने १५१ ः ११९ चा फॉर्म्युला रविवारी समोर ठेवला. दुसरीकडे आपले बळ राज्यात वाढलेले असल्याने आणखी जागा मिळायला हव्यात असे भाजपाला वाटते. ०९ च्या निवडणुकीत कमी जागा लढवूनही आपल्याला शिवसेनेपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या होत्या आणि गेल्या लोकसभा निवडणुकीतही सेनेपेक्षा आपल्याला पाच जागा जास्त मिळालेल्या आहेत, त्यामुळे आपल्या या वाढत्या बळाच्या प्रमाणात वाढीव जागा मिळायला हव्यात असा भाजपाचा आग्रह आहे. शिवसेनेने भाजपाशी जागांसाठी संघर्ष चालवलेला असताना मित्रपक्षांसाठी अठराही जागा सोडण्याची तयारी दाखवून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याची चतुर खेळी खेळलेली आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या गर्जना दोन्ही पक्ष करीत असले, तरी तसे करणे म्हणजे शिवशाहीचे ते पाहात असलेले स्वप्न उद्ध्वस्त होणे याचे भान या मंडळींना कसे नाही? सेना – भाजपाची ही युती सांभाळण्यासाठी मुत्सद्देगिरीची शिकस्त करणार्‍या महाजन – मुंडेंसारख्या व्यापक हिताचा विचार करीत आलेल्या नेत्यांची उणीव आज प्रकर्षाने भासते आहे हे मात्र खरे!