तटस्थ जीवनदृष्टी

0
183
  • माधव बोरकार

कवी हा जन्माला यावा लागतो ही जरी गोष्ट खरी असली तरी वाचन, चिंतन, मनन यातून तो खर्‍या अर्थानं घडतो असा त्यांचा अनुभव. वेगवेगळे कवी, नाटककार यांच्या डोळस वाचनातून त्यांचा भाषिक अवकाश विस्तारत गेला. या सगळ्याचं श्रेय ते आपल्या वडिलांना देतात.

हरिंद्रनाथांच्या बालपणीच्या आठवणी फार वेधक आहेत. आजच्या भाषेत सांगायचंं म्हणजे, ते सेक्युलर वातावरणात लहानाचे मोठे झाले. त्यांच्या वडिलांची मित्रमंडळी मुसलमान, शिख, पारसी या विविध धर्मांतली होती. या मित्रमंडळाची त्यांच्या घरी ऊठ-बस होती. त्यामुळे मुलांना धर्माधर्मांमधले भेद कधीच लक्षात आले नाहीत. एका निकोप धार्मिक आणि सामाजिक वातावरणात ती भावंडे वाढली. अन्य धर्मियांचे सण-उत्सव त्यांना आपलेच वाटायचे. मोहरमची तर ती मुलं वाटच बघायची. हरिंद्रनाथांच्या संवेदनशील मनावर या सण-उत्सवांच्या रंगांचा खोल परिणाम झाला. त्यांनी रंगवलेलं हे वातावरण आपल्याकडे आता आहे का, असा प्रश्‍न विचारावासा वाटतो. आत्मकथनाच्या या भागातून लेखक सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडवतो. खरं म्हणजे आत्मचरित्राचे ते एक व्यवच्छेदक लक्षण असते.

कवी हा जन्मावा लागतो, त्याला घडवता येत नसतं, अशी एक कल्पना किंवा समजूत जनमानसांत रुजलेली आहे. या कल्पनेला हरिंद्रनाथ छेद देतात. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली व ती आपल्या वडिलांना दाखवली. त्यांनी मोठ्या खुबीने त्या कवितेतले दोष दाखवून दिले. टेनिसनच्या एका कवितेचे ते आंधळे अनुकरण होते. नंतर त्यांच्या वाढदिवसाला बायरन, शेली, स्कॉट यांच्या कवितांचे संग्रह त्यांना भेट मिळाले व त्याचबरोबर नवीन कविता लिहिण्यासाठी कोरी पानं असलेली एक जाडजूड वही. एका ऊर्मीच्या झपाट्यात त्या वहीची पानं नव्या वेड्यावाकड्या कवितांनी भरून गेली. एक कविता खुदिराम बोसांच्या बलिदानावर होती. योगायोगानं ती गोपाळ कृष्ण गोखले यांच्या वाचनात आली व त्यांनी या बालकवीला शाबासकी दिली. कवी हा जन्माला यावा लागतो ही जरी गोष्ट खरी असली तरी वाचन, चिंतन, मनन यातून तो खर्‍या अर्थानं घडतो असा त्यांचा अनुभव. वेगवेगळे कवी, नाटककार यांच्या डोळस वाचनातून त्यांचा भाषिक अवकाश विस्तारत गेला. या सगळ्याचं श्रेय ते आपल्या वडिलांना देतात. आपल्या मुलामध्ये असलेले सुप्त गुण ओळखून त्यांची निगराणी करणारे वडील आपल्याला लाभले हे आपले परम भाग्य असं ते लिहितात. इंग्रजी साहित्याबरोबरच युरोपिअन साहित्याची आपल्याला गाढ ओळख झाली असं ते सांगतात.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना एका तामिळ बाईनं त्यांच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, हा अनुभव हरिंद्रनाथ खूप धीटपणे लिहितात. हा मोहाचा प्रसंग त्यांनी टाळला व अन्य स्त्रीचा स्पर्श व आपल्या आईचा स्पर्श यात काय फरक आहे याचा अनुभव त्यांना येतो.

अभ्यासाचा त्यांना मनापासून तिटकारा. सिनिअर परीक्षेत तर्कशास्त्र आणि गणित हे त्यांचे हाडवैरी. आवडणारा एकच विषय म्हणजे इंग्रजी. पहिल्या दोन विषयांची त्यांनी थातूर-मातूर तयारी केली आणि त्यांचा काय निकाल लागणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण आश्यर्च म्हणजे, गणित व तर्कशास्त्र या त्यांच्या नावडत्या विषयांत त्यांना उत्तम गुण मिळाले, तर इंग्रजीत खूपच कमी. कदाचित ‘हॅम्लेट’चा नवा अर्थ आपण लावल्याची शिक्षा आपल्याला मिळाली असं ते म्हणतात. या निकालानंतर अघोरीनाथांचं त्यांना उत्तेजन देणारं पत्र आलं. या निकालामुळे त्यांचा शिक्षण आणि परीक्षा यांवरचा विश्‍वास साफ उडाला.

त्यांचं प्रेमजीवनही फार मजेशीर आहे. ते सहजपणे प्रेमात पडायचे व त्या गुंत्यातून सहज बाहेर यायचे. तारुण्याच्या ऐन बहरात ते एका लग्न झालेल्या सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडले. एक अनोखी हुरहूर व बेचैनी या काळात त्यांनी अनुभवली. एका रात्री भाव अनावर होऊन ते सायकलने त्या बाईच्या बंगल्यापाशी पोहोचले. पण हे प्रेमप्रकरण फार पुढं जाऊ शकलं नाही. या प्रकरणाला ते ‘माय फर्स्ट रोमान्स’ असं म्हणतात. पण त्यांच्या भावजीवनावर त्याचा खोल परिणाम झाला. ती सुंदर दिसणारी बाई त्यांच्यापेक्षा वयाने मोठी होती. आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या स्त्रीच्या प्रेमात कधी पडू नये असं ते सांगतात. पण त्यांनी मात्र हा नियम काही पाळला नाही. आत्मकथनाचा हा भाग वाचताना गाब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांच्या ‘लिविंग टू टेल द टेल’ या आठवणींच्या पुस्तकाची आठवण होते.

हरिंद्रनाथांच्या जीवनात योगायोगाने मोठी खळबळ माजली. ‘अबू हसन’ या नाटकाच्या निमित्ताने त्यांची कमलादेवीशी ओळख झाली. त्या विधवा होत्या व दिसण्यास सुंदर. ते कमलादेवींच्या प्रेमात पडले व त्यांचे लग्नही झाले. लग्नानंतर ते लगेच इंग्लंडला गेले व तिथे कँब्रिजसारख्या विद्यापीठांचा त्यांनी अनुभव घेतला. जे साहित्य त्यांनी वाचले होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव ते आता घेत होते.
आपल्या जीवनात घडणार्‍या सगळ्याच गोष्टी, घटना आत्मचरित्रात येऊ शकत नाहीत. ज्या घटना आपले जीवन आमूलाग्र बदलून टाकतात, त्याच अशा प्रकारच्या लिखाणात समाविष्ट होतात. यासंदर्भात चिलीचे कवी पाब्लो निरुदा किंवा नगीन माफूज या इजिप्तच्या लेखकांची आठवणीवजा आत्मचरित्रे वाचून पाहावी. नेमक्या आठवणीतून ते जीवनाचा वेध घेतात. हा साहित्यप्रकार हाताळणे सोपे नाही. कारण त्यात स्वतःचे उदात्तीकरण होण्याची भीती असते किंवा आपल्या चुकांचे समर्थनही. आत्मचरित्र लिहिताना स्वतःकडे बघण्याची तटस्थ दृष्टी हवी.