ढासळती कुटुंब-व्यवस्था सावरायला हवी..!

0
1223

– रमेश सावईकर

मुलं निर्धास्त, मुक्त जीवन जगायची. कसलीच चिंता नाही, मनावर ताण नाही, तणाव नाही. अगदी फुलांप्रमाणे रोज सकाळ झाली की प्रसन्न वातावरणात फुलायचं अन् अंधारल्या रात्री आईच्या ऊबदार कुशीत झोपी जायचं! किती सुंदर असं हे बालजीवन!! आजच्या मुलांना असं जीवन अनुभवण्याची संधी मिळते का?

एकत्र कुटुंबात रहायचे म्हटले तर बंधने आलीत, कर्तव्य-पालन आलं, शिस्त आली, जबाबदारी आली अन् कुटुंबाला अभिप्रेत असलेली मिळून-मिसळून-सर्वांशी जुळवून घेऊन वागण्याची स्वभाव प्रवृत्ती आली. आज अशी बंधनं माणसाला नको आहेत. 

आजच्या आधुनिक जीवनात माणसाला सुविधा सोयीची उपलब्धी झाली आहे. ऐषआरामी जीवन जगायला मिळावं, असं त्याला वाटतं. श्रीमंतीची स्वप्नं रंगवण्यात तो स्वतःला धन्य समजतो. त्याच्या विचारांचं विश्‍व अन् अनुभवाचं विश्‍व यात परस्पर विरोधाभासच दिसतो. मनुष्य सुशिक्षित बनला. त्यामुळे तो स्वतःला सुसंस्कृत, शहाणा समजून जगात वावरत आहे. आपल्याला जे ज्ञान आहे त्याचा त्याला अनाठायी गर्व आहे. स्वतःला सर्वज्ञानी समजून आपल्याच विश्‍वांत वावरण्याच्या हौसेमुळे तो खर्‍याखुर्‍या जीवनाला, त्यांतल्या आनंद, सौंदर्य अनुभवाला वंचित झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्याकडे ज्ञान आहे पण सुसंस्कृतपणा नाही; हुशारी- चलाखी आहे पण खरे शहाणपण नाही; अर्थ आहे पण त्याच्यासाठी भलताच ‘स्वार्थ’ आहे; सुख आहे पण ते वरवरचे आहे. बाह्यरूपाला भुलणे त्याच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे त्याचे सुख हे अळव्याच्या पानावरच्या थेंबासारखं आहे- चकाकणारं, मन काही काळ प्रफुल्लित, उल्हसित करणारं अन् क्षणभरात टपकन् खाली गळून पडणारं… म्हणून माणसाला खरे ‘सौख्यदान’ हवे असेल तर त्याने सावध होऊन शहाणं बनायला हवं!
प्रत्येक मनुष्य हा समाजाचा एक घटक आहे. हे प्रत्येकाने जाणून त्यानुसार सामाजिक बांधिलकी जपली नाही, जबाबदारी ओळखून वागले नाही तर सामाजिक प्रश्न निर्माण होऊन समाज व्यवस्था बिघडून जाते. आजचा समाज बर्‍याच अंशी भरकटत चालला आहे. याचे मूळ कारण म्हणजे समाज ज्यांच्या एकत्र येण्याने बनला आहे ती कुटुंबे योग्य मार्गावर नाहीत. कौटुंबिक व्यवस्था पार बिघडल्यामुळे अनेक कौटुंबिक प्रश्‍न, समस्या निर्माण झाल्या आहेत.
कुटुंबाचा घटक असलेल्या प्रत्येक माणसाला त्या समस्यायुक्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
कुटुंब व्यवस्थित चालणे – हे ते चालविणार्‍यावरती अवलंबून असते. जो कुटुंब चालवितो तो कुटुंब-प्रमुख मानला जातो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. अजूनही बर्‍याच समाजात एकत्र कुटुंब पद्धत आढळते. परंतु कालानुरूप झालेल्या परिस्थिती बदलामुळे, आचार-विचार यांमधील बदलांमुळे एकत्र कुटुंब पद्धतीला फाटा मिळून विभक्त कुटुंब पद्धत समाजात अधिक प्रमाणात रूढ झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र राहण्याच्या ईर्षेपायी, वेगळे राहण्याच्या विचारामुळे कुटुंबवत्सव घराण्यांतही एकत्र कुटुंब पद्धत क्वचितच पहायला मिळते.
एकत्र कुटुंब पद्धत समाजातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या कुटुंबपद्धतीत कर्त्या पुरुषाला कुटुंब प्रमुख मानून त्याच्या मतानुसार, निर्णयानुसार घर चालायचे. कुटुंबात त्याचा धाक-शिस्त असायची. त्याचबरोबर प्रत्येक माणसाचे वर्तन, आचरण, वागणूक आदी गोष्टी कुटुंबाचे सौख्य जपण्यास पूरक अशाच असायच्या.
दोन-तीन पिढ्या त्यात एकत्र नांदायच्या. त्यामुळे लहान मुलांना त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, आत्या-काका यांचं प्रेम, माया, आपुलकी मिळायची. आजी-आजोबांना आपल्या नातवंडांचा इतका लळा लागायचा की त्यांना कोणी बोललं, ओरडलं तरी त्याची खंत नसायची. मुलांना चांगले काय, वाईट काय.. या गोष्टीचे ज्ञानामृत त्यांच्या आई-वडलांशिवाय आजी-आजोबा, काकी-काका यांच्याकडूनच मिळायचं.
भावडांमध्ये प्रेमानं, मायेनं एकत्र नाचणं, बागडणं, जिवाला झेपेल तेवढं काम करणं या स्वभाव प्रवृत्ती निर्माण होऊन त्या जपल्या जायच्या. मुलं निर्धास्त, मुक्त जीवन जगायची. कसलीच चिंता नाही, मनावर ताण नाही, तणाव नाही. अगदी फुलांप्रमाणे रोज सकाळ झाली की प्रसन्न वातावरणात फुलायचं अन् अंधारल्या रात्री आईच्या ऊबदार कुशीत झोपी जायचं! किती सुंदर असं हे बालजीवन!! आजच्या मुलांना असं जीवन अनुभवण्याची संधी मिळते का? याचं उत्तर नकारार्थीच असेल.
कुटुंबातील कोणीही असो, त्याच्या गरजा भागवणं, त्याचे प्रश्न सोडवणं याची जबाबदारी कुटुंबप्रमुखाची. कुुंटुंबावर एखादी आपत्ती आली, गंभीर समस्या निर्माण झाली तर त्यावेळी कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येऊन परिस्थितीला सामोरं जाणं, हे एकत्र कुटुंबात प्रत्येकाचं कर्तव्य असायचं. त्यामुळे कुणा एकावरती ताण येत नव्हता. सगळी कशी मिळून-मिसळून रहायची. कौटुंबिक एकतेच्या परस्परांशी असलेल्या नात्याच्या अनुबंधानी घट्ट बांधलेली असायची. त्यामुळे एकमेकांप्रति प्रेम होतं, जिव्हाळा होता, माया होती, चिंता होती तशी सहृदयतेची भावनाही तेवढीच दृढ होती.
कुटुंबाचे व्यवहार अनेक असायचे. प्रत्येकाची जबाबदारी वेगळी. अशी पद्धतशीर व्यवस्था असल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत ही कुटुंबासाठी पौषकच ठरलेली आहे.
आज कालानुरूप परिस्थिती एवढी झपाट्याने बदलत चालली आहे की प्रत्येकाचे विचार वेगळे, आचार वेगळे, संस्कार वेगळे, वर्तणूक वेगळी, त्यामुळेही मतेही वेगळी. एकत्र कुटुंबात रहायचे म्हटले तर बंधने आलीत, कर्तव्य-पालन आलं, शिस्त आली, जबाबदारी आली अन् कुटुंबाला अभिप्रेत असलेली मिळून-मिसळून-सर्वांशी जुळवून घेऊन वागण्याची स्वभाव प्रवृत्ती आली. आज अशी बंधनं माणसाला नको आहेत. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धतीने समाजात घट्ट मूळ धरले आहे. हीच पद्धत सध्याच्या बदललेल्या काळात योग्य आहे… अनुरूप आहे… असेच या विभक्त कुटुंबातील प्रत्येक घटकाचे मत बनले आहे.
आपल्याला स्वातंत्र्य मिळायला हवं, असं प्रत्येकाला वाटतं. पण स्वातंत्र्य हे कोणी द्यायचं नसतं नि घ्यायचं नसतं. ते मुळात प्रत्येकाच्या ठायी असतंच. माणसाचं मन कोणी बदलू शकणार नाही. त्याच्या मनाला भावेल, जाणवेल, रुचेल, आवडेल त्याच प्रमाणं तो वागणार नि चालणार! हेच ते वैयक्तिक स्वातंत्र्य! आणखी वेगळं स्वातंत्र्य म्हणून काय आहे?
मन मानेल तसे स्वैर, स्वच्छंद, धुंद, मस्त जीवन जगण्यातच आज माणसाला विशेष रस आहे. किंबहुना तेच आपलं खरं जीवन आहे अशी त्याची धारणा बनली आहे. ‘स्वतंत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ असं विभक्त कुटुंबातील सदस्याला वाटतं. ते कितपत् खरं आहे हा वादाचा विषय आहे.
विभक्त कुटुंबात आई-वडील आणि मुले किंवा एक मूल, एवढेच घटक. वडील नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर. आई शिक्षित असल्यामुळे घरी कंटाळा येतो म्हणून नोकरी करते. आपल्या लहानग्या बाळाला- मुलाला ‘आया’च्या हवाली करते. त्यामुळे मुलावर जेमतेम संस्कार… नव्हे तर ते मूल रडू नये म्हणून गोष्टी सांगून, त्याला खाऊ देऊन त्याला गप्प करणं, भूक लागली की खायला देणं अन् मस्ती केली की दटावणं, त्याच्या आई-बाबांची भीति घालणं यापलीकडे ती आया त्या मुलावर काय संस्कार करणार?
तिन्ही सांज सरून गेली की पाखरं घरट्यात परततात त्याप्रमाणं आई-वडील घराकडे परततात. कामाच्या व्यापानं-तापानं थकून- भागून-दमून आल्यावर मुलाकडे मनापासून प्रेमाने-मायेने-ममतेने पाहण्यास, त्याला पुरेसा वेळ देण्याची त्यांची इच्छाही मरून जाते. तेवढे त्राणही त्यांच्यामध्ये नसतात.
मुलगा/मुलगी मोठी होऊन शाळेत जायला लागले, प्राथमिक शिक्षण झाले की माध्यमिक शिक्षणाच्या कालखंडात त्याला मुक्त जीवनाचा छंद जडतो. कारण आजच्या डिजिटल युगात मोबाइल, टीव्ही, संगणक, टॅब, लॅपटॉप इत्यादी उपकरणं त्यांना विनासायस मिळालेली असतात. पुढे कॉलेज जीवनात तर त्यांचं जीवन फुलपाखरासारखं सुगंधी-सुंदर फुलांचा शोध घेण्यात व्यस्त बनतं. त्यावेळी मित्र-मैत्रिणींच्या संगतीमुळे आईवडलांपासून नकळत ती दूर लोटली जातात.
आईवडलांना आपल्या मुलाची नाजूक जीवनावस्था संयमाने हाताळावी लागते. घरात आईवडील आणि मुलगा/मुलगी यांच्यामध्ये मतभिन्नता, वाद यामुळे कौटुंबिक अस्वस्थता अन् वेळप्रसंगी संघर्ष निर्माण होतो. आई-वडील यांच्यामधील वैचारिक मतभेद हे मुलांना कळतात. त्यांचीही मनःस्थिती बिघडते. त्यामुळे प्रत्येकाचा जीवनमार्ग वेगळा, स्वतंत्र बनतो.
पुढे मुलो लग्न झालं की तो आपला संसार थाटतो. सहचारिणी मिळाली की काही वर्षानंतर आई-वडील ज्येष्ठ नागरिक बनतात. तेव्हा काहींची रवानगी वृद्धाश्रमात करणे मुलं पसंत करतात. अशा पद्धतीने कौटुंबिक विभक्तपणाची ही साखळी वाढतच जाते.
विभक्त कुटुंब पद्धतीचे काही फायदेही असतील. पण कौटुंबिक नाती-गोती नष्ट होत चालली आहेत, नात्यांचे अनुबंध तुटत आहेत ही खंत करण्यासारखी, गंभीर बाब आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था आज कोलमडली आहे. ती वेळीच सावरायला हवी. नाहीतर सध्या असलेल्या कौटुंबिक समस्या आणखी वाढतील.
कुटुंबे सुखी झाली तर समाज सुखी होईल. कौटुंबिक व्यवस्था सुधारली तर सामाजिक व्यवस्था सुधारून समाज जीवन पोषक, हितकारक व सुखमय होईल!
माणसाचे संसारी जीवन सुखी, आनंदी होण्यासाठी कौटुंबिक प्रश्नांवर मात करायला हवी. त्यासाठी कोलमडत असलेली कुटुंब व्यवस्था… मग ती एकत्र असो वा विभक्त… ती सावरण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्या गरजा जर माणसाने कमी केल्या तर पैशांच्या मागे त्याला धावावे लागणार नाही. म्हणजे मग कुटुंबासाठी त्याच्याकडे वेळ राहील. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक घटकाने – ‘‘एकमेकांना जाणून घेऊ, एकमेकांशी जुळवून घेऊ, एकमेकांना साह्य करू, एकमेकांना सुखी-आनंदी करू’’… या मूलमंत्राचा ध्यास घेऊन तो आचरणात आणायला हवा. बदलत्या काळाची ती एक मोठी गरज आहे.