ढवळीकरांकडून बांधकाम खाते काढून घ्यावे : कॉंग्रेस

0
107

भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप
सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचार चालू असून या खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून हे खाते काढून घ्यावे, अशी मागणी काल कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
यावेळी कामत म्हणाले की, आधी केलेलीच कामे करण्यासाठी पुन्हा निविदा काढण्याचे प्रकार खात्यात चालू असून हे घोटाळे रोखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. एक उदाहरण देताना त्यांनी सांगितले की बांदोडा गावात काशीमठ येथे न झालेल्याच मैदान प्रकल्पाची दुरुस्ती करण्यासाठी निविदा काढण्यात आलेली असून तेथे कामही सुरू झाले असल्याचे ते म्हणाले.
२०१० साली सदर ठिकाणी मैदान तयार करण्यासाठी ६८ लाख रु. चा अंदाज खर्च तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर १ कोटी ४८ हजार रु. ची निविदा काढण्यात आली होती. यात भ्रष्टाचार असल्याच्या संशयाने तेव्हा तेथील जनजागृती मंचने आवाज उठवल्यानंतर हा प्रकल्प शीतपेटीत टाकण्यात आला होता. या मैदानाच्या दुरुस्तीसाठी आता जी निविदा काढण्यात आलेली आहे ती परवा उघडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अस्तित्वात नसलेल्या मैदानाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढणे हा एक घोटाळा असून असे आणखी किती घोटाळे सार्वजनिक बांधकाम खात्यात झाले आहेत त्याचा शोध कॉंग्रेस घेत असल्याचे कामत म्हणाले. ही सरकारी पैशांची लूट असून या पार्श्‍वभूमीवर ढवळीकर यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम खाते काढून घ्यावे अशी मागणी कामत यांनी यावेळी केली.