ड्रग्स प्रकरणी ४ वर्षांत ११४ स्थानिकांना अटक

0
99

राज्यात अमलीपदार्थ बेकायदा विक्री प्रकरणांमध्ये स्थानिकांचा सहभाग वाढत चालला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पोलिसांनी गेल्या चार वर्षांत ड्रग्ज व्यवसाय प्रकरणी एकूण ३७८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात ११४ स्थानिकांचा समावेश आहे. राज्यातील दोन कुटुंबेसुद्धा बेकायदा विक्री प्रकरणात गुंतल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

गत वर्षात अमलीपदार्थ विरोधी विभाग आणि पोलिसांनी अमलीपदार्थ बेकायदा विक्रीची १६५ प्रकरणे नोंद करून या प्रकरणी १८० जणांना अटक केली आहे. त्यात ५४ स्थानिक, ९४ बिगर गोमंतकीय, ३२ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आले. राज्यातील वाढत्या अमलीपदार्थाच्या बेकायदा प्रकरणाबाबत राज्य विधानसभेत हिवाळी अधिवेशनात चिंता व्यक्त करण्यात आली होती. अमलीपदार्थाच्या विरोधात कारवाई आणखीन कडक केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बेकायदा अमलीपदार्थ प्रकरणाच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना केली होती.

गतवर्षी २ कोटी ८८ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थ प्रकरणांत अटक करण्यात येणार्‍यांमध्ये नायजेरीयन नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. २०१४ मध्ये ५४ प्रकरणाची नोंद करून ५८ जणांना अटक करण्यात आली. त्यात स्थानिक १४, बिगर गोमंतकीय १६ आणि विदेशी २८ जणांना अटक केली. २.९७ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले. २०१५ मध्ये ६१ प्रकरणांची नोंद करून ७१ जणांना अटक केली. त्यात स्थानिक १८, बिगर गोमंतकीय २७ आणि विदेशी २९ नागरिकांचा समावेश आहे. १०.५९ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले. २०१६ मध्ये ६० प्रकरणांची नोंद करून ६९ जणांना अटक केली. त्यात स्थानिक २८, बिगर गोमंतकीय २७ आणि विदेशी १४ नागरिकांचा समावेश आहे. १.०२ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले.

राज्यातील बेकायदा अमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये स्थानिकांचा सहभाग वाढू लागला आहे. या बेकायदा धंद्यातून कोणत्याही प्रकारची कष्ट न करता भरपूर पैसा कमावता येत असल्याने स्थानिक या बेकायदा धंद्याकडे वळू लागले आहेत.
राज्यात अमलीपदार्थाचा व्यवहार करणार्‍या स्थानिकांना परराज्यांतील ड्रग्ज माफियांकडून अमलीपदार्थांचा पुरवठा केला जातो. अमली पदार्थांची बेकायदा विक्री करणार्‍यांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकात मर्यादित कर्मचारी असल्याने सर्वच ठिकाणी योग्य देखरेख ठेवू शकत नाही.