डोळ्याखालील काळी वर्तुळे ः सौंदर्यात बाधा

0
1739

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

संतुलित आहाराला प्रथम प्राधान्य द्यावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असलेला आहार, त्याचबरोबर जास्त फायबरयुक्त आहार व आहारात पालेभाज्यांचा वापर करावा. दूध व तुपाचे रोज सेवन करावे. फलाहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये.

एखाद्या सुंदर युवतीच्या किंवा रूबाबदार पुरुषाच्या डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे दिसू लागली तर कसे दिसतील ते सांगा? डागरहित चेहरा कुणाला आवडत नाही? पाणीदार डोळे व सतेज त्वचा आरोग्याचे दर्शक आहेत. डोळ्याखालची काळी वर्तुळे फक्त सौंदर्याच्या दृष्टीनेच विचार करून ती वाईट दिसतात म्हणून ती लपविण्याचे उपाय करत बसू नये… तर ते अन्य एखाद्या आजाराचेही सूचक लक्षण असू शकते… ह् लक्षात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्या आजारावर उपचार करून घ्यावेत. फक्त टीव्ही जास्त बघितल्याने किंवा संगणकावर जास्त काम करत राहिल्याने ही डोळ्याखालची गडद मंडळे तयार होत नाहीत तर ते अनेक रोगांचे लक्षणही असू शकते.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे वात व पित्त दूषित होऊन स्थानसंश्रय भेदाने डोळ्याच्या त्वचेखाली वैवर्ण्य किंवा गडदपणा निर्माण होतो. आपल्या डोळ्यांच्या खाली व गालांच्या वर जी त्वचा असते, ती खूप नाजूक आणि कमालीची पातळ असते. त्या त्वचेला रक्तपुरवठा करणार्‍या खूप सूक्ष्म अशा केशवाहिन्यांचे एक जाळे त्यामध्ये असते. त्या केशवाहिन्यांमधून रक्त वाहताना त्यांच्या बाह्य आवरणातून काही लाल रक्तपेशी बाहेर पडतात आणि त्वचेखाली जमा होतात. केशवाहिनीच्या बाहेर पडलेल्या या पेशी मृत पावतात. त्या ठिकाणी काही किण्वक रस निर्माण होतात आणि रक्तपेशींचे विघटन होऊ लागते. विघटित होताना या लाल रक्तपेशीतून एक निळसर काळे रंगद्रव्य निर्माण होते. त्याच्या रंगामुळे ही नाजूक त्वचा काळी दिसू लागते.
डोळ्यांखालील काळ्या वर्तुळाची कारणे ः-
* ऍनिमिया/पाण्डूरोग – डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांचे मुख्य कारण म्हणजे पाण्डूरोग होय. लोहाची कमतरता असता अशा व्यक्तीच्या रक्तातील लाल पेशी आकाराने लहान असतात आणि म्हणून त्या रक्तवाहिन्यामधून सहज बाहेर पडतात. हा प्रकार डोळ्याखालील त्वचेत प्रकर्षाने घडतो आणि अशी काळी वर्तुळे तयार होतात.
* जीवनसत्वांचा अभाव (व्हिटामिन डेफिसियन्सी) –
आहारामधील जीवनसत्वांचा अभाव हेही काळ्या वर्तुळांचे एक प्रमुख कारण आहे. कुपोषित व्यक्तीच्या डोळ्यांखाली ही वर्तुळे हमखास दिसतात. अशा व्यक्तींना आहाराबरोबर ‘अ’, ‘क’, ‘ई’ आणि ‘के’ जीवनसत्वे योग्य प्रमाणात दिल्यास ही वर्तुळे दूर होऊ शकतात.
* पाण्याची कमतरता – ज्या व्यक्ती आवश्यक प्रमाणात पाणी पीत नाहीत, त्यांच्यामध्ये हे लक्षण सहज दिसते.
* पुरेशी झोप न मिळणे आणि थकवा असणे – अहोरात्र काम, जागरण किंवा अपुरी झोप या कारणाने शरीर कमालीचे थकते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांखालील त्वचेवर होतो. डोळ्यांना खाज सुटते. ते सारखे चोळण्याने डोळ्यांखालील रक्तवाहिन्या सारख्या फुटून रंग गडद बनतो.
* कडक ऊन – तप्त उन्हामुळे कातडी भाजून निघते. यात त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचे रंग द्रव्य तयार होते. हे रंगद्रव्य जर बाह्य त्वचेत जमा झाले तर तिथे पिवळसर रंग येतो. पण जेव्हा हा रंग आणखी खोलवर परिणाम करत अंतर्त्वचेत जमा होत जातो तेव्हा ती काळी पडते. डोळ्याखालील त्वचा अगदी पातळ असल्याने ती लवकर काळी पडते आणि शरीराच्या इतर भागातील त्वचेपेक्षा जास्त गडद बनते.
* संप्रेरकांचा परिणाम – शरीरातील संप्रेरकांच्या (हॉर्मोन्स) परिणामाने या डोळ्यांखालील त्वचेचा रंग काळा पडतो. विशेषतः स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या काळात, गरोदरपणात हा परिणाम जाणवतो.
* ऍलर्जी – एखाद्याला विशिष्ट गोष्टीची ऍलर्जी किंवा वावडे असेल तर ती गोष्ट डोळ्यांच्या संपर्कात आल्यास डोळ्यांच्या खोबणीभोवती खाज येते. असे अनेकदा सातत्याने होत राहिल्यास, डोळे चोळून त्वचा काळी पडून वर्तुळे दिसू लागतात.
* यकृताचे आजार (लिव्हर डिसिज) – काविळीमुळे यकृतातील रंगद्रव्ये जास्त प्रमाणात शरीरात उत्सर्जित होतात. त्यामुळे डोळ्याखाली काळसरपणा येतो.
* त्वचाविकार – इसब, ऍटोपिक डर्म्याटायटीस अशा आजारांमध्ये काळी वर्तुळे येतात.
* सतत सर्दी – सतत सर्दी होऊन नाक चोंदलेले असेल, तर त्या भागातील रक्तवाहिन्या प्रसरण पावून हे लक्षण दिसते.
* वाढते वयोमान – डोळ्यांखालची त्वचा तशी नाजूक असते. पण वृद्धापकाळात जरा जास्तच पातळ होते आणि खालच्या रक्तवाहिन्या आणखीनच ठसठशीत होतात. त्यामुळे उतार वयात अशी काळी वर्तुळे डोळ्यांखाली दिसतात.
* अनुवंशिकता – एखाद्या कुटुंबात अशी काळी वर्तुळे पिढ्यान् पिढ्या नजरेस येतात, त्यामुळे अगदी तरुण वयातही ही वर्तुळे दिसू लागतात.
डोळ्यांखालील गडदपणावर उपाय व उपचार ः-
– डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागल्यावर अनेकदा रंगभूषेचा वापर करून हा काळा रंग लपवण्याचा प्रयत्न सुरू होतो. ‘कन्सीलर’सारख्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून डोळ्यांखालची त्वचा इतर चेहर्‍याच्या त्वचेशी समरस करण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा असा तात्पुरता व वरवरचा इलाज झाला.
– या लक्षणात फक्त चिंता करत बसून, स्वतःच काहीतरी उपाय करण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे कधीही चांगलेच! प्रथम कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करावी. उदा. पाण्डूरोगामुळे हे लक्षण दिसत असल्यास, प्रथम पाण्डूरोगाची चिकित्सा करावी.
– संतुलित आहाराला प्रथम प्राधान्य द्यावे. कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असलेला आहार, त्याचबरोबर जास्त फायबरयुक्त आहार व आहारात पालेभाज्यांचा वापर करावा. दूध व तुपाचे रोज सेवन करावे. फलाहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ अतिप्रमाणात सेवन करू नये. शरीर रूक्ष होऊ नये म्हणून दर आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
– आहाराबरोबरच योगासने मुख्यतः प्राणायाम, भ्रामरी व ध्यान याचे आचरण केल्यास तारुण्य दीर्घकाळ टिकते व या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळते.
काही औषधी द्रव्यांचा उपयोग ः-
गुलाबजल – गुलाबपाण्यात कापसाचे बोळे बुडवून दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवर झोपताना नियमित ठेवावेत.
जायफळ – जायफळात व्हिटामिन ‘ई’ व ‘क’ जास्त प्रमाणात असल्याने जायफळ चांगले पाण्यात उगाळून काळ्या वर्तुळांना रात्री झोपताना लावावे व सकाळी चेहरा स्वच्छ थंड पाण्याचा भपका मारून धुवून घ्यावा.
बदाम – दुधामध्ये बदाम उगाळून वर्तुळांना लेपन करावे व त्यावर काकडीच्या चकत्या ठेवाव्या. डोळे मिटून पंधरा मिनिटे शांत रहावे व पंधरा मिनिटांनी हलकिशी मालीश करून डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावेत. बदामाच्या तेलानेसुद्धा मालीश केल्यास फायदा होतो.
पदिना – पदिना वाटून त्यामध्ये लिंबाचा रस टाकून काळ्या वर्तुळांना लावावा व पंधरा ते वीस मिनिटांनी पाण्याने धुवून टाकावे.
काकडी व बटाटा – काकडीच्या किंवा बटाट्याच्या चकत्या डोळ्यांच्या खोबणीत ठेवाव्या. किंवा बाटाटा व काकडीचा रस काढून.. त्या रसात कापसाचे डोळे बुडवून ते पंधरा मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवावेत.
* कोरफडीचा गर, काकडी, बटाटा, मध, लिंबू, पदिना, खोबरेल तेल, एरंड तेल, कुंकुमादि तेल, दूध, हळद, केशर, टोमॅटो, ग्रीन टी अशा विविध औषधी द्रव्यांचा वापर लेपनासाठी होऊ शकतो. वैद्याच्या सल्ल्याने इतर औषधी द्रव्यांबरोबर आपल्या त्वचेच्या पोतांवरून लेपन द्रव्यांचा वापर करावा.
* औषधांमध्ये गंधक रसायन, आमलकी रसायन, आवळा मुरब्बा, च्यवनप्राश, सारीवाद्यासव, खदीरारिष्ट, मंजिष्ठा, आरोग्यवर्धिनी.
डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांना लपविण्यासाठी मेक-अप करून लपविण्यापेक्षा किंवा इकडून-तिकडून वाचलेले, ऐकलेले घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.