डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौर्‍यावर

0
146
Agra: Security Forces patrol the premises of Taj Mahal ahead of US President Donald Trump’s maiden visit to India, in Agra, Sunday, Feb. 23, 2020. President Trump will pay a state visit to India on February 24 and 25 at the invitation of Prime Minister Narendra Modi. (PTI Photo/Kamal Kishore) (PTI2_22_2020_000080B)(PTI2_23_2020_000081B)

गेल्या काही दिवसांपासून भारत दौर्‍याविषयी गाजावाजा सुरू असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांचे आज सोमवार दि. २४ रोजी येथे सपत्नीक पहिल्याच भारत भेटीवर आगमन होत असून त्यांच्यासाठी गुजरातमधील जगातील सर्वात मोठ्या मोतेरा क्रिकेट स्टेडियमवरील भव्य स्वागत सोहळ्याची सज्जता झाली आहे. दरम्यान ट्रम्प यांची साबरमती आश्रमाला व्हावयाची बहुचर्चित भेटही निश्‍चित झाली आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त आशिष भाटिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांचे अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज थेट वॉशिंग्टन येथून सकाळी ११.३० वा. आगमन होणार आहे.

महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अशा साबरमती आश्रम भेटीवेळी ट्रम्प यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अशी माहितीही भाटिया यांनी दिली. त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ट्रम्प यांच्या साबरमती आश्रम भेटीविषयी व्हाईट हाऊसकडून निर्णय घेतला जाणार असल्याचे वक्तव्य केल्याने या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प यांना मानवंदना दिली जाणार असल्याचे भाटिया यांनी सांगितले.

ट्रम्प १५ मिनिटे
साबरमती आश्रमात
मोतेरा स्टेडियमवरील सोहळ्यानंतर दु. ३.३० वा. ट्रम्प आग्रा येथे ताज महल दर्शनासाठी प्रयाण करणार आहेत. दरम्यान साबरमती आश्रम व मोतेरा स्टेडियमवरील कार्यक्रमांसाठीच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात येत असल्याचे भाटिया यांनी सांगितले. साबरमती आश्रमाचे सचिव अमृत मोदी यांनी सांगितले की ट्रम्प आश्रमात १५ मिनिटे घालवतील. यावेळी ते चरखाही चालवतील असे ते म्हणाले.

मौर्य हॉटेलात ट्रम्प
दांपत्याचे पारंपरीक स्वागत
दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये सोमवारी रात्री निवासासाठी दाखल झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलनिया यांचे तेथे पारंपरीक भारतीय पध्दतीने तिलक लावून व पुष्पहार घालून स्वागत केले जाणार आहे. यानिमित्त हे संपूर्ण हॉटेल ‘नमस्ते’ आशयाखाली सजविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या हॉटेलमध्ये ‘चाणक्य’ नामक ग्रँड प्रेसिडेंशियल सूटमध्ये ट्रम्प दाम्पत्य राहणार आहे. याआधी बराक ओबामा, जिमी कार्टर, बिल क्लिंटन व जॉर्ज बुश हे माजी अमेरिकी अध्यक्ष येथे राहिले होते.

मोतेरा स्टेडियमवर होणार
‘नमस्ते ट्रम्प’ सोहळा
एका सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर ट्रम्प रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. तेथून साबरमती आश्रमाकडे जाणार आहेत. तेथे ते थोडा वेळ थांबणार असून तेथून ते पुन्हा रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. इंदिरा पुलावरून ते मोतेरा स्टेडियमवर दाखल होणार आहेत. या स्टेडियमवर सुमारे लाखभर लोकांच्या उपस्थितीत ‘नमस्ते ट्रम्प’ हा सोहळा होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांच्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आज दि. २४ व उद्या दि. २५ अशा दोन दिवसीय भारत भेटीच्या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लष्कर, निमलष्करी, पोलीस यांच्या तुकड्यांमध्ये दहशतवादविरोधी पथकांच्या हजारो जवानांना जागोजागी तैनात करण्यात आले आहे.

ट्रम्प भारतात दाखल झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य राहणार असलेले येथील आयटीसी मौर्य हॉटेलास कडेकोट सुरक्षा व्यवस्थेने वेढले आहे. इराण व अमेरिका यांच्यातील संबंध अलिकडील काळात बरेच तणावपूर्ण बनले असल्याने ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अधिक कसून काळजी घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ट्रम्प गुजरेतील साबरमती आश्रमाला भेट देतील की नाही याविषयी साशंकता असली तरी देशाचे एक वैभव असलेल्या आग्रातील ताज महल परिसराचे सौंदर्य आणखी वाढविण्यात आले असून तेथेही प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या बरोबरीने अमेरिकी गुप्तचर यंत्रणांचे अधिकारीही परस्परांशी समन्वय साधून आहेत.

गुजरातमधील ६ जिल्ह्यांमधील पोलीस अधिकार्‍यांच्या अनेक तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ४० पलटणी तैनात केल्या आहेत.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍यावेळी दिल्ली पोलिसांनी ६०५ सीसीटीव्ही कॅमेरे भाडेपट्टीवर घेऊन विविध ठिकाणी लावण्यावर एक कोटी रूपये खर्च केले होते. नंतर ते कॅमेरे काढण्यात आले होते.

अहमदाबादेत १० हजार
पोलीस तैनात
अहमदाबाद शहरातील अनेक मोक्याच्या ठिकाणांवर एकूण १० हजार पोलिसांना सज्ज ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेच्या सिक्रेट सर्विसेस, भारताच्या नॅशनल सिक्युरिटी गार्डस व स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) या यंत्रणांचीही पोलिसांना साथ देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सिक्रेट सर्विसेस व सुरक्षा पथके अहमदाबादेत याआधीच दाखल झालेली आहेत. गेल्या आठवड्यात चार विमाने त्यांच्या तुकड्या घेऊन येथे पोचली आहेत.

मौर्य हॉटेल परिसरात
शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे
एनएसजीची ड्रोनविरोधी पथके, स्नायपर्स, स्वॅट कमांडोज, काईट कॅचर्स, श्‍वान पथके, शार्प शूटर्स (गगनचुंबी इमारतींवर तैनात), पराक्रम व्हॅन्स यांचे ताफे ट्रम्प यांचे वास्तव्य असणार्‍या हॉटेल सभोवती शेकडो नाईट व्हिजनयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.