डॉ. वसंतराव गोवारीकरः साधा माणूस, थोर संशोधक

0
1351

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
डॉ. वसंतराव गोवारीकर हे एक चालते बोलते ‘विज्ञान विद्यापीठ’, असे म्हटले जाई, ते तंतोतंत खरे आहे. सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचावे व त्यासाठी क्लिष्ट भाषा वगळून त्याचा बोध सर्वसामान्यांनाही व्हावा यासाठी अत्यंत साध्या राहणीचा हा मराठी वैज्ञानिक जीवनभर कार्यरत राहिला. आजची तरूण पिढी उच्चविद्याविभूषित होऊन भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून परदेशी जाते. अशावेळी इंग्लंडमध्ये रसायनशास्त्रात प्रावीण्य मिळवून मायदेशी परतून देशाच्या विज्ञानक्षेत्राचे नाव उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या डॉ. वसंतराव गोवारीकर यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राष्ट्राविषयी अपार श्रद्धा असल्याशिवाय हे शक्य नाही. उच्च विद्या संपादन करीत मायदेशीच स्थायिक होणार्‍या आजच्या तरुणाईला यातून धडा घेता येईल. त्या मानाने आपल्या देशातील विज्ञान, तंज्ञत्रान आज बरेच पुढे गेले आहे. अर्ध्या शतकापूर्वी ज्या सोयीसवलती नव्हत्या, त्या आज उपलब्ध आहेत, याचीही माहिती आमच्या तरूण संशोधकांनी करून घ्यायला हवी.डॉ. वसंतराव गोवारीकरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान, रसायनशास्त्र, अंतराळशास्त्र यामध्ये जीव ओतून काम करीत असतानाच त्यांनी भारताच्या लोकसंख्येविषयी खूप अभ्यास करून त्यासंबंधी लिहिले आहे. भारतात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंब नियोजनाचा एक कार्यक्रम राबविला गेला होता. या पार्श्‍वभूमीवर डॉ. गोवारीकर यांनी या समस्येच्या खोलात जाऊन अभ्यास करीत नव्वदीच्या दशकात आय प्रेडिक्ट नावाचा अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी पूर्ण अभ्यासाअंती एक सूत्र मांडले. त्यानुसार प्रगतीच्या टप्प्यावर प्रथम वेगाने मृत्यू दर कमी होतो, मग हळूहळू जन्म दर कमी होतो. तरीही मृत्यू दर कमी होतच असतो. जन्म दर कमी होण्याचे प्रमाण हळू असते. पर्यायी लोकसंख्या वाढीचा दर वाढतच असतो. त्यानंतरची पायरी म्हणजे मृत्यू दर खूप कमी कमी झाल्यामुळे तो अजून फारसा कमी होत नाही किंवा हळूहळू कमी होतो. मात्र जनता आता पूर्वीपेक्षा सुजाण झाल्याने नियमनाची साधने व ती वापरण्याचे ज्ञान माहीत झाल्यामुळे जन्मदर वेगाने कमी व्हायला लागतो. ही सारी माहिती सूत्रबद्धपणे या ग्रंथात मांडल्यामुळे जिज्ञासूंना त्याच्या अभ्यासासाठी बरीच मदत तर झाली आहेच. पण आमच्या देशाच्या लोकसंख्यावाढीचे, घटनेचे संपूर्ण ज्ञान आपणास याद्वारे मिळू शकते.
आज हवामानशास्त्र प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. परंतु साधारण २० वर्षांपूर्वी डॉ. गोवारीकरांनी हवामानशास्त्राच्या क्षेत्रातही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली. भारताच्या एकूण मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्याचे व त्याची दिशा अभ्यासण्यासाठीचे त्यांनी एक मॉडेल विकसित केले. ते ‘गोवारीकर मॉडेल’ या नावाने ओळखले जाते. या मॉडेलमध्ये १६ परिमाणांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. अर्थात हे मॉडेल आत्ताच्या नवीन मॉडेलशी जुळणारे नसले तरी वीस वर्षांपूर्वी त्याची उपयुक्तता मोठी होती, हे विसरता येणार नाही.
वसंत रणछोड गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी पुणे येथे झाला. एस.एस.सी. पूर्ण करून व पुणे येथील महाविद्यालयातून बी.एस्‌सी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांनी पीएच.डी. करण्यासाठी बर्मिंगहॅम गाठले. तेथे त्यांनी डॉ. गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांत प्रबंध पूर्ण करून रसायनातले अग्रगण्य संशोधक म्हणून लौकीक मिळविला. वयाच्या केवळ अठ्ठाविसाव्या वर्षी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड या दोन्ही मान्यवर विद्यापीठांनी त्यांना विद्यावाचस्पती बनण्यासाठी जे प्रबंध सादर केले जातात, त्यांचे प्रशिक्षण करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली, आणि त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या विद्वत्तेवर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडमध्ये काही काळ अध्यापन केल्यानंतर ते अमेरिकेतील समरफिल्ड संशोधन केंद्रात अणुऊर्जेवरील संशोधक म्हणून काम करू लागले. तिथेही त्यांच्या संशोधनाची वाहवा झाली. त्यानंतर ते मायदेशी परतले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेत डॉ. विक्रम साराभाईंच्या समवेत काम करू लागले. ‘इस्रो’ (इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन) च्या स्थानेत आणि उभारणीत डॉ. गोवारीकर यांचा फार मोठा वाटा होता. साराभाईंच्या काळातले ‘घनइंधन निर्मिती’ विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करीत होते. नंतर साराभाईंच्या अकाली निधनानंतर ते आधी थुंबाच्या अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे प्रमुख झाले. त्यानंतर त्यांनी ‘उपग्रह वाहक अग्निबाण’ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आणि ते श्रीहरिकोटा इथल्या अग्निबाण आणि उपग्रह वाहक यानांच्या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम करू लागले. ज्यावेळी श्रीहरिकोटा येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र हलवले गेले, तेव्हा त्या बेटावर काही आदिवासी, त्यांची गुरे, हरणे, कोल्हे आणि साप याचीच प्रामुख्याने वस्ती होती. त्रिवेंद्रम आणि श्रीहरिकोटा या दोन्ही ठिकाणांचा भार सांभाळत त्यांनी भारताचा पहिला उपग्रह प्रक्षेपक ‘एस.एल.व्ही,ई.’ यशस्वीरित्या प्रक्षेपित करून भारतीय शास्त्रज्ञ अवकाश संशोधनात पाश्‍चात्य प्रगत देशांच्या मागे नाही, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले. या यशानंतर आपल्या देशाला त्यांची महानता कळली व नंतर ते देशाच्या पंतप्रधानांचे विज्ञान, तंत्रज्ञानविषयक सल्लागार बनले.
गोमंतक मराठी अकादमीचे दिवंगत अध्यक्ष (कै.) शशिकांत नार्वेकर आणि मी उपाध्यक्ष असताना त्यांना गोव्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचारण करण्यात आले होते. प्रगल्भ बुद्धिमत्तेचा हा थोर संशोधक किती साधा व सरळ माणूस आहे, याचे प्रत्यंतर त्यावेळी आले. अकादमीच्या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीनंतर आभार प्रदर्शनाच्यावेळी मी म्हटले, ‘‘वसंतरावांच्या आडनावातच ‘गोवा’ आहे, त्यामुळे परत आम्ही त्यांना गोव्यात येण्याची विनंती केली तर ते नक्की त्याचा स्वीकार करतील.’’ डॉ. गोवारीकर स्मितहास्य करीत म्हणाले,‘‘जरूर येऊ. जरूर येऊ.’’ नंतर समोर असलेले ‘नवप्रभा’चे तत्कालीन संपादक सुरेश वाळवे मला म्हणाले, ‘एका मोठ्या संशोधकाला आमंत्रण देण्याची तुमची खुबी आवडली.’ दुर्दैवाने त्यांना परत निमंत्रण काही देता आले नाही. त्यांच्या महान कार्याला त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही आदरपूर्वक शब्दांजली.