डॉ. बाबासाहेब झाले नसते तर…

0
1912

– दादू मांद्रेकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासूर्य, एक ज्वालामुखी, एक झंझावात, एक महावादळ, एक महाप्रलय, एक आकाश, एक शीतल चांदण्याचे झाड, एक अमृत, एक हिमालय या देशात झाला नसता तर या देशाची अवस्था आज काय झाली असती? या जगात आज भारताचे स्थान काय असले असते? भारताची कोणती पत आणि प्रतिष्ठा आज जगामध्ये असली असती? डॉ. बाबासाहेबांनी हयातभर आपल्याच बांधवांबरोबर केलेल्या संघर्षाचे आणि पेरलेल्या प्रज्ञामय विचारधारेचे हे अमृतफळ आहे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली तर १५ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणजे अगदी दुसर्‍या दिवशी भारत राष्ट्राची निर्मिती झाली. म्हणजे कागदोपत्री ब्रिटिशांनी भारत देशाचे सार्वभौमत्व आणि सर्वंकष स्वातंत्र्य घोषित केले. तेव्हापासून हे ८० टक्के निरक्षर असलेले आणि जवळ जवळ सहा हजार जातींत, अनेक धर्म व पंथ यात विभागले गेलेले हे राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणूनच मानले जाऊ लागले. आपले षंढत्व आणि आपली धर्मांधता लपवण्यासाठी ब्रिटिशांनी ‘तोडा आणि झोडा’ धोरण अवलंबिल्याचे सांगितले जाते हे पूर्णांशानी खरे नाही. ब्रिटिश व्यापारासाठी या देशात आले आणि त्यांनी या देशाचा ताबा घेतला. वसाहतवादी प्रशासन आमच्यावर लादले. या सर्व गोष्टी खर्‍या असल्या तरी सम्राट अशोकाने कन्याकुमारीपासून अफगाणिस्तानपर्यंत (तेव्हाचे गांधार) उभे केलेले हे अखंड महान राष्ट्र आम्ही ब्रिटिश येईपर्यंत टिकवून ठेवले होते का? ब्रिटिशांनी सत्ता सोडीपर्यंत म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत एकूण ५६३ स्वतंत्र संस्थाने या देशात अस्तित्वात होती आणि ब्रिटिशांनी १ जानेवारी १८१८ मध्ये ५०० महार शूरवीरांच्या मदतीने कोरेगाव पुणे येथे पूर्ण पेशवाईचा पाडाव करून पूर्ण भारत ताब्यात येईपर्यंत यातील सर्व संस्थाने ही अखंड भारताचा आपण भाग आहोत असे मानत नव्हती, तर याच्यातले प्रत्येक संस्थानिक हे स्वतःला सार्वभौम समजत होते. सगळ्यांच्या पदरी सेना होती आणि शेजारच्या कोणत्याही राज्यावर म्हणजेच संस्थानावर केव्हाही चढाई करण्याची त्यांची तयारी होती. या सर्वांना सम्राट अशोकाने उभारलेल्या म्हणजेच आजच्या कन्याकुमारीपासून अफगाणपर्यंत (प्राचीन गांधारपर्यंत) राष्ट्रालाच एकसूत्राने बांधण्याचे काम ब्रिटिशांनी केले. त्यांना मांडलिक केले. त्या त्या संस्थानिकांना आपल्या संस्थानापुरती अंतर्गत स्वायत्तता दिली. मानसन्मान दिला. काहीना ठरवून त्या त्या संस्थेचा मान म्हणून विशिष्ट संख्येच्या तोफांची सलामी दिली. पण कन्याकुमारी ते अफगाणपर्यंत ‘एक राष्ट्र, एक सरकार’ सूत्र राबवून अशा खंडप्राय राष्ट्राचे सार्वभौमत्व ब्रिटिशांनी आपल्या शासनाकडे घेतले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये यासाठी स्वतंत्र मंत्रालय होते आणि त्याचे सर्व निर्णय हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पूर्ण लोकशाही पद्धतीने घेतले जात. त्या निर्णयाची अंमलबजावणी जशीच्या तशी भारतातील महाराज्यपालांना करावी लागे. कायदा-सुव्यवस्था तोडणार्‍यांना अटक केली जाई व त्यांच्यावर न्यायालयात खटले चालत. त्यामुळे ब्रिटिश शासन येथे हुकूमशाही पद्धतीने आपला राज्यकारभार चालवीत अशी माहिती आम्हाला पुरवली जाते ती चूक आहे.
येथील ब्रिटिश शासन पूर्ण हुकूमशाही असते तर गांधीजी ऊठसूट ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन करूच शकले नसते. आज ब्रिटिश मुत्सद्यांनी, विचारवंतांनी हा देश म्हणून जे काय पेरले आहे, ज्या काय सुधारणा केल्या आहेत, राज्यशासनाची जी एक प्रणाली उभी केली आहे, जी शिक्षणप्रणाली दिली आहे, धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा विचार करायला शिकवले आहे, तेथील साधनसंपत्तीचा योग्य विनियोग करावयाला शिकवले आहे, इतिहासाकडे निरपेक्षपणे पाहायला शिकवले आहे, इतकेच नव्हे तर रेल्वेचे जाळे, शासन-प्रशासनाचे खेड्यांपर्यंत पसरलेले जाळे, राष्ट्रपतीभवन, लोकसभा आदीसहीत या देशातील लोकनिर्माण हे ब्रिटिशांच्या कालावधीत झालेले तर आहेच, पण ते ब्रिटिश स्थापत्त्याच्या अंगाने झालेले नाही. त्याला या मातीचा, या सांस्कृतिक संचिताचा बाज आहे. नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू, गांधीजी, पंडित नेहरूंसहीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्यांनी ज्यांनी या देशाला आणि नीतितत्त्वांना उजागर केले आहे ते सर्व ब्रिटिशांच्या शैक्षणिक धोरणातून तयार झालेले आहेत. खास करून आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्यांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे ते ज्योतिबा, सावित्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विशेष करून राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड या महान रत्नांचे! ही सर्व माणसे ब्रिटिशांच्या पुरोगामी विचारातून, शैक्षणिक धोरणातून तयार झालेली आहेत. याचा अर्थ या नररत्नांची अमूल्य देणगीच ब्रिटिशांनी भारताला दिली.
आज जे काही भारतात दिसते आहे ते ब्रिटिश येथे येण्यापूर्वी होते काय? एक एकसंघ राष्ट्र होते काय? ५६३ संस्थानिकांनी भारताचे सार्वभौमत्व जपले होते काय? दलित, शोषित, वंचित, अस्पृश्य, कामगार यांना माणुसकीने वागवले होते काय? मग ब्रिटिशांपेक्षा कुठल्याबाबतीत भारतीय राजेराजवाड्यांनी, भट-ब्राह्मणांनी, सरदार-दरकदारांनी या देशात आधुनिक महत्तेचे माहात्म्य लोकाभिमुख ठेवून काम केले होते? देशाच्या सार्वभौमतेला सुरुंग लावणारी, माणूसपणाला कलंक लावणारी, जात, धर्म, अस्पृश्यता, अगतिकता, कर्मकांड, ईश्‍वरवादाचे प्रस्थ माजवून पुर्‍या मानवी ऊर्जेचा नरक करणारी, भारतीय विषमतेचा प्याला प्रत्येकाच्या तोंडी लावणारी एतद्देशीयांची सत्ता हवीच कशाला होती? ‘झोडा आणि तोडा’ नीती राबवणारी ब्रिटिश सत्ता असे ज्याचे इथले कथाकथित विद्वान आणि पत्रपंडित व इतिहासकार पुन्हा पुन्हा वर्णन करतात त्यांना मी विचारतो, स्वतःला सार्वभौम समजणारी ५६५ संस्थाने या देशात ब्रिटिशांनी निर्माण केलीत काय?
साप, बेडूक, उंदीर, घुशी पुजणार्‍या, ६०० हजार जातींच्या नरकात लोळणार्‍या धर्मांध समाजाला माणूसपण, प्रज्ञा, प्रतिभा यांचे रीतीरिवाज जर कोणी शिकवले असतील तर ते ब्रिटिशांनी! डॉ. बाबासाहेबांनी या सर्व ब्रिटिशांनी पेरलेल्या माणुसकीच्या, संस्कृतीच्या अवधारणावर आपल्या उत्तुंग प्रज्ञा आणि प्रतिभेने कळस चढवलाच; पण हातात संधी आल्यानंतर त्याला संवैधानिक दर्जाही दिला. भारतीय समाज आज देव-धर्माच्या, कर्मकांडांच्या मागे न लागता तो एक जागतिक मानव्याची संस्कृती पाळतो आहे, जगतो आहे. राष्ट्राला पर्यायाने जगालाही एका निश्‍चित विधायक भवितव्याच्या दिशेने घेऊन जातो आहे ही खरी येथील धर्मवाद्यांची पोटदुखी आहे! ज्यांना आंबेडकरांनी रचलेले संविधान आज नको आहे, त्यांचे मनुस्मृतीवर भारी प्रेम. संविधानाऐवजी त्यांना मनुस्मृतीचे कायदे हवे आहेत. सार्वभौम भारताची शान, मान, सन्मान असलेला अशोकचक्रांकित सर्व अर्थ, अन्वयार्थ भरलेला तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून नको आहे. त्यांना हिंदू धर्माची पताका असलेला भगवा राष्ट्रध्वज हवा आहे. याची कारणे दोन. आधुनिक राष्ट्रउभारणीत हिंदू धर्माने अस्पृश्य ठेवलेल्या एका माणसाचा सतत उदोउदो होतो आहे हे पोटदुखीचे एक कारण आणि दुसरे कारण, केवळ या संवैधानिक अधिकारापायी भारताला हजारो वर्षे धर्मग्रंथांनी फसवलेला माणूस ब्राह्मण्यवादाच्या पाशातून निरंतर मुक्त होतो आहे. ब्राह्मणवादाची कवचकुंडले आज तोच ओरबाडून, हिसकावून घेत आहे.
डॉ. बाबासाहेब केवळ दलितांचे, अस्पृश्यांचे नेते म्हणून हिणवणार्‍या राव, उमरावांच्या बायका संविधान स्वीकारल्यानंतर केवळ ६० वर्षांत आज विमान चालवताहेत. राष्ट्रपती झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, कुलगुरू, अभियंत्या, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार झाल्या आहेत त्या केवळ डॉ. बाबासाहेबांमुळे! आणि आज याच बायकांना त्यांचे धर्मपुरुष मंदिरात जायला बंदी घालताहेत. हे धर्मपुुरुषच आज या सर्व महिलांचे आदर्श. या उच्चवर्णीय महिलांच्या हृदयात बुद्ध, ज्योतीबा, सावित्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी किंचितही स्थान नाही. डॉ. बाबासाहेबांनी संविधानात दिलेले सर्व अधिकार तर ही उच्चवर्णीय स्त्री आज उपभोगते आहेच; पण डॉ. बाबासाहेबांनी १९५१ मध्ये लोकसभेत खास हिंदू स्त्रियांसाठी मांडलेल्या ‘हिंदू कोड बिला’चे सर्व अधिकार ती भोगते आहे. यात नवर्‍याबरोबर संपत्तीत अर्धा वाटा, कोणतेही मूल दत्तक घेण्याचा अधिकार, नवर्‍याला स्वतःच्या मताने घटस्फोट देण्याचा अधिकार आदी इतर हक्कांबरोबर हे महत्त्वाचे अधिकार आहेत. याचे सर्व फायदे आज उच्चवर्णीय स्त्री बिनबोभाट भोगते आहे आणि आपल्या धर्मपुरुषांच्या हातात आंबेडकरी चळवळीचा, विचारांचा, माणसांचा गळा कापण्यासाठी बिनदिक्कत सुरा देते आहे. त्यातूनच दलितांची हत्याकांडे या देशात घडताहेत. आजची भारतातील स्त्री विवाहाशिवाय आपल्या आवडत्या पुरुषाबरोबर नवरा-बायकोसारखी राहते, राहू शकते. इतकेच नव्हे तर आपल्या आवडत्या पुुरुषापासून विवाह न होताही अपत्यप्राप्ती करू शकते. करते. त्याचे संगोपन, सांभाळ हक्काने करू शकते. सर्व संपत्तीचेही अधिकार ती त्या अपत्त्याला देऊ शकते. हे सर्व घडू शकते, घडते आहे ते केवळ महाप्रज्ञावान डॉ. बाबासाहेबांमुळे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला पुुरुषाने शाप द्यावा आणि ती शीळा होऊन पडावे असा रीतीरिवाज आहे. पुरुषाच्या अनैतिक आचरणासाठी स्त्रीने एखाद्या पुुरुषाला शाप द्यावा आणि तो पुरुष शीळा होऊ पडावा, त्या शीळेला स्त्रीचा पदस्पर्श होताच तो परत पुरुषामध्ये पुनर्जीवित व्हावा असा दंडक नाही. रिवाज नाही. त्यामुळे शापाने शीळा होऊन पडलेली अहिल्या रामाच्या पदस्पर्शाने शीळेची पुन्हा स्त्री होते आणि विषम सांस्कृतिक गुलामीच्या झोपाळ्यावर बसून हिंदोळा घेऊ लागते!
समग्र क्रांतीचा प्रणेता असलेल्या डॉ. बाबासाहेबांनी बुद्ध, कबीर आणि ज्योतिबा या तीन महान विभुतींना आपले गुरू मानले. त्यांपैकी बुद्ध-ज्योतिबा-सावित्री आणि दस्तुरखुद्द बाबासाहेबांनी कुठल्याच स्त्रीला कधी शाप तर दिला नाहीच, पण ज्या हिंदू संस्कृतीने कोट्यवधी स्त्रियांना शाप देऊन त्यांना घर-कोनाड्यात बसवले, त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेचा खिमा केला, अक्षरशः दलित, अस्पृश्य लोकांबरोबर त्यांच्यावरही अनन्वीत अत्याचार केले. त्या अत्याचारग्रस्त, शापदग्ध तमाम महिलांना बुद्ध, ज्योतिबा, सावित्री आणि डॉ. बाबासाहेबांनी अक्षरशः स्त्रीला पदस्पर्शच नव्हे तर कोणताही स्पर्श न करता आपल्या महान अलौकिक कर्तबगारीने शापमुक्त केले. गुलामीच्या बेड्या कचाकच तोडल्या. सांस्कृतिक गुलामीही नष्ट केली. आज त्या पंख लावून विमानाची कप्तान बनून हवेत सूर मारत आहेत, तर दुसरीकडे कल्पना चावलाच्या रूपाने अंग्निपंख लावून अंतराळात पृथ्वीलाच प्रदक्षिणा घालत आहेत, तर जमिनीवर भारतीय स्त्री गळ्याला स्टेथस्कोप अडकवून मारुतीला प्रदक्षिणा घालते आहे. सूक्ष्म जीवशास्त्र विभागाची गाईड आणि प्रमुख असूनही महिन्याला एक लाखापेक्षा जास्त पगार घेणारी एक महिला कॅबिनमध्ये बसून आरामशीरपणे हनुमान चालिसाच पठण करते आहे. बाबासाहेबांमुळे कोट्यवधी स्त्रियांचा उद्धार झाला खरा; पण तिने आपल्या मनाचा उंबरठाच अजून ओलांडलेला नाही. केवळ स्त्रिया आणि बहुजनांसाठी आपल्या कायदेमंत्रिपदाचा हिंदू कोड बिलासंबंधी आणि आरक्षणासंबंधी राजीनामा देणारे डॉ. बाबासाहेब हे जगातील पहिलेच शूर सेनापती आहेत! झुंजार सेनानी आहेत.
संविधानात स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने सर्व अधिकार दिल्यानंतर खरे तर आणखी स्त्रियांसाठी काही करण्याची गरजच नव्हती, पण हजारो वर्षांपासून हिंदू स्त्रीला सर्वंकष अधिकार, संपत्ती, अधिकार यापासून वंचित ठेवल्याने हिंदू धर्मांतर्गत तिला अधिक सबल, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करणे आवश्यक होते हे पाहून बाबासाहेबांनी १९५१ मध्ये हिंदू कोड बील लोकसभेत ठेवले. याच कोड बिलामुळे हिंदू स्त्रियांना आज नवर्‍याच्या संपत्तीत समान अधिकार मिळालेले आहेत आणि नवर्‍याच्या निधनानंतर त्या संपत्तीचे पूर्ण स्वामित्व त्या विधवा स्त्रीकडे येते आहे.
ब्रिटिशांनी हातात सत्ता घेतल्यापासून एका क्षणाचाही अवकाश भारतीय प्रशासनात राहिला नाही. जे काही झाले आहे ते लिखित आदेशाने. भारताचे सत्तांतर होतानाही हे सर्व सोपस्कार पार पाडलेले आहेत. १९३५ च्या कायद्यान्वये ब्रिटिशांनी सत्ता, प्रशासनावरील अधिकार काढून घेतल्यानंतर या अखंड भारताची पुढील प्रशासनप्रक्रिया, व्यवस्था, प्रशासन नियंत्रण यांचीही तरतूद केलेली आहे. त्यालाच १९३५ चा कायदा म्हणतात. यान्वये भारताच्या लोकांना आपले भाग्य ठरविण्याची संधी दिली गेलेली आहे. त्याचेच फलस्वरूप म्हणजे आपले जगातले महान संविधान. कोणत्याही परमेश्‍वर, धर्म, धर्मग्रंथ यांच्यापेक्षाही त्याचे स्थान अढळ, अतूट आणि अनिर्वचनीय आहे. जगामध्ये आज आपल्याला जी किंमत, मान-सन्मान मिळतो आहे, जगातल्या आधुनिक राष्ट्रांच्या पंक्तीत आज आपल्याला
जे स्थान मिळते आहे ते या संविधानाने स्वीकारलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जीवनप्रणालीमुळे. आपल्या संविधान निर्देशाप्रमाणे आपण अनेक जातीत आणि धर्मांत विभागलेले लोक एक, धर्मनिरपेक्ष आणि एकात्म आहोत. आपल्या घरात आपण धर्माने, विचाराने वा जातीने कोणीही असू; पण आपल्या राष्ट्रीय जीवनप्रणालीत कोणताही ईश्‍वर, धर्म डोकावणार नाही किंवा कोणताही धर्म अधिक्षेप करणार नाही, म्हणूनच ‘आम्ही ईश्‍वराचे लोक’ अशा पद्धतीचे इतर राष्ट्रांच्या संविधानात शब्द असताना आपल्या संविधान सरनाम्यामध्ये ‘आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभोम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस’- अशी शब्दरचना आहे आणि ती सार्वभौम आहे. याचा अर्थ पूर्ण विश्‍व परमेश्‍वर आपल्या इशार्‍यावरती चालवतो अशी जगातल्या अनेक लोकांची श्रद्धा, विश्‍वास आणि धारणा असलेला कोणताही ईश्‍वर, धर्म किंवा अन्य शक्ती या खंडप्राय देशाचे प्राक्तन ठरवीत नाही, तर ते आम्हीच भारताचे लोक ठरवतो. आपल्या संविधानाचे हे फार मोठे वैशिष्ट्य आहे आणि ते केवळ डॉ. बाबासाहेबांच्या हातात संविधान निर्मितीचे अलौकिक कार्य आल्यामुळेच शक्य झाले!
बाबासाहेब संविधान सभेवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसे गेले, हा फार मोठा इतिहास आहे, पण बाबासाहेबांना गवतातला साप, देशद्रोही ब्रिटिशांचा चमचा अशा विशेषणांनी हेटाळणी आणि छळवाद भोगलेले बाबासाहेब संविधान सभेत पोहोचलेच नसते किंवा त्यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली नसती तर काय झाले असते? आपल्या अगोदर फक्त एक दिवस फुटून १४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेला, आजचा धर्माच्या नावावर शासन हाकणारा, अतिरेकी जन्माला घालणारा आमच्या राष्ट्राचाही पाकिस्तान झाला असता. आजही भारताचा हिंदुत्ववाद्यांचा, हिंदुत्वाच्या नावावर असा पाकिस्तान करण्याची कुटील कारस्थाने चालू आहेत.
डॉ. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माऐवजी इतर धर्माची वाट दाखवली असती तर कोट्यवधी लोक त्या धर्मात गेले असते. पण आज जे धर्मनिरपेक्ष वातावरण या देशात आणि पर्यायाने जगात निर्माण झाले आहे, जागतिक शांतता निर्माण झाली आहे ती कदापि झाली नसती. भारत देश त्या त्या धर्मग्रंथांच्या तालावरच चालला असता आणि भारतात दरदिवशी कुठे ना कुठे धर्माच्या नावाने रक्ताचे पाट वाहत राहिले असते. डॉ. बाबासाहेबांनी १९३५ साली येवले मुक्कामी- ‘मी हिंदू धर्मात जन्मलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही!’ अशी घोषणा केली तरी हिंदूचे मत आणि मनपरिवर्तन पाहण्यासाठी त्यानंतर ते जवळ जवळ वीस वर्षे थांबले आणि त्यानंतरच त्यांनी आपल्या सुमारे पाच लाख अनुयायांसोबत १४ ऑक्टोबर १९५६ रोजी कधीकाळी या देशातील भूमिपुत्र असलेल्या नागवंशीय भूमीवर म्हणजे मध्य भारतातील नागपूर भूमीवर बौद्ध आचार-विचारांची, नीतीची दीक्षा घेतली आणि विषमतावादी हिंदू धर्म सोडला. तेव्हापासून या लोकांच्या हातात, मनात तलवार, भाला, पिस्तुले, बंदुकांऐवजी बुद्धाची अहिंसा, शांती, बंधुत्व, समता, न्याय, प्रज्ञा, शील, करुणा ही नीतितत्त्वे सांगणारी संहिता बाबासाहेबांनी पेरली. हातात बुद्धशील, शालीनतेचा सम्राट अशोकानेच फिरवलेल्या अशोकचक्रातील तिरंगा दिला. दीक्षा देताना बुद्ध नीतितत्त्वांबरोबर अतिरिक्त माणुसकीच्या बावीस प्रतिज्ञा वदवून घेतल्या. त्यानंतर आपल्या महापरिनिर्वाणापूर्वीच्या आदल्या रात्री संपवलेला ‘बुद्ध ऍण्ड हिज धम्म’ हा जाडजूड बुद्ध चरित्रात्मक ग्रंथ त्यांनी आपल्या अनुयायांच्या हाती सुपूर्द केला आणि बुद्ध आणि त्यानंतर तीनशे वर्षांनी सम्राट अशोकाने फिरवलेले संपूर्ण मानवी क्रांतीचे अशोकचक्र पुन्हा एकदा आपल्या मृत्यूपूर्वी फक्त दोन महिने अगोदर फिरवून बुद्धानंतर अडीच हजार वर्षांनंतर ‘धम्मचक्र परिवर्तन’ घडवून आणले. आज या भारतभूमीवर देव-धर्म, चमत्कार, कर्मकांड लाथाडलेले कोट्यवधी बाबासाहेबांचे अनुयायी धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा नवभारत घडविण्यासाठी प्रचंड प्रमाणात आपले योगदान देत आहेत. हाच कोट्यवधी लोकांचा घटक आज भारतात, पर्यायाने जगात शांतता नांदण्यासाठी कार्यरत आहे. बाबासाहेबांनी स्वातंत्र्यानंतरच्या भारताचे प्राक्तन तर घडवलेच, पण आपल्या कोट्यवधी अनुयायांना राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर जागतिक स्तरावरची एक देव- धर्मापलीकडील जीवनशैली प्रदान केली. परिस्थितीने गांजलेला हा समाज आज आपल्या दैनंदिन जीवनात कुठलाच देवधर्म, कर्मकांड, दैववाद आणि चमत्कार न मानणारा तरीही आधुनिक राष्ट्रउभारणीसाठी योगदान देणारा जगातला एक मोठा समुदाय आहे!
डॉ. बाबासाहेब या देशात जन्मले नसते तर आपला हा देश एक आधुनिक चेहरा घेऊन जगात कधीच वावरला नसता! हिंदू धर्माने सर्व साधनसुविधांपासून वंचित ठेवलेल्या कोट्यवधी लोकांचा एक शोषित, अस्पृश्य, दलित, पीडित जनसमुदाय कधीच राष्ट्रीय प्रवाहात तर आला नसताच; पण तो माणूसही झाला नसता. कोट्यवधी महिलावर्ग धर्माच्या वरवंट्याखाली आजही भरडून निघाला असता आणि सौदी, अरब, पाकिस्तान व इतर मध्यपूर्वे अनेक इस्लामी राष्ट्रांसारखी इथल्या महिलांची अवस्था झाली असती. कदाचित संविधानात पेरलेली समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय ही मूलभूत तत्त्वे व त्यानुषांगाने भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मिळालेले लाखमोलाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही मिळाले नसते!
बाबासाहेबांच्या शतकोत्तर १२५ व्या रजतजयंती सोहळ्यानिमित्त या देशातील सर्व महिलावर्ग आणि उच्चवर्णीय आता डॉ. बाबासाहेबांचे हे अनंत उपकार आपल्या हृदयात तेवत ठेवणार आहेत काय? आपल्या घरात बाबासाहेबांची तसबीर लावून आम्ही जातीयवादी नाही हे सिद्ध करणार आहेत काय?