डॉ. काकोडकरांचे विचार देश गांभीर्याने घेईल का?

0
99

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
स्वातंत्र्यसैनिक आणि नावाजलेले वकील कै. पांडुरंग मुळगांवकर यांची जयंती दरवर्षी एखाद्या सुप्रसिद्ध साहित्यिक, विद्वान, संशोधक अशा नामावलीतील व्यक्तीस पाचारण करून साजरी केली जाते व श्रोत्यांना बहुश्रृत करण्याचे काम केले जाते.
पांडुरंग मुळगांवकर स्मृती समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जी. डी. कामत व ऍड. अवधूत सलत्री यांनी यावेळी देशापुढील आव्हाने व तंत्रज्ञानाचे महत्त्व यांचा सांगोपांग विचार करून यावेळी गोमंतकीय सुपुत्र तथा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांचे ‘तंत्रज्ञान-२०३५ एक दृष्टीक्षेप’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. काकोडकर यांनी या संबंधाने मांडलेले विचार फक्त गोव्यासारख्या छोट्या राज्यात मांडले गेले, म्हणून त्याचे महत्त्व कमी होता कामा नये, तर आज आपला देश ज्या अवस्थेतून जात आहे, त्याचा विचार करता देशातील संबंधितांनी या विचारांवर गंभीरपणे विचार करून भारत हा जागतिक महासत्तेकडे कसा कूच करेल, या दृष्टीने पाहिले पाहिजे.डॉ. काकोडकर यांनी या संदर्भात विवेचन करताना, भारतातील तंत्रज्ञान हे चार वेगवेगळ्या विभागांत मांडण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, ‘पहिल्या विभागातील टप्प्यात टेलिकॉम, अग्निक्षेपणास्त्र व हवाई उड्डाण या क्षेत्रांत आपली प्रगती ही ‘घोडदौड’ सारखी आहे, तर सेवा क्षेत्रात आणि भू-वाहतूक, संगणकीय हार्ड व सॉफ्टवेअरमध्ये आपण साधे ‘धावत’ आहोत. उच्च दर्जाची आणि चांगली आरोग्य सेवा देता येणे शक्य असूनही ती सर्वसामान्यांना मिळत नसल्याने त्या क्षेत्रात ‘चालायला’ लागल्यासारखे वाटते. मात्र अन्न आणि कृषी क्षेत्रातील उत्पादने, तसेच तेलबियाणे आणि डाळ आजही आम्हाला आयात करण्याची नामुष्की पत्करावी लागत असल्याने त्यात आपला देश अजूनही ‘रांगत’ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. याबाबत सविस्तर विवेचन करताना ते म्हणाले, ‘उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत माफक दरात पोचविण्यासाठी सरकारी यंत्रणेवर अनेक मर्यादा असतात. त्यामुळे समस्या निर्माण होतात. त्यासाठी ‘वैद्यकीय तंत्रज्ञान’ विकसित करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे व हे तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी नवीन पिढीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
आपण हरितक्रांतीकडे आगेकूच करीत आहोत, ही गोष्ट स्तुत्य आहे, पण अन्नसाठा साठविण्यासाठी पुरेशी गोदामे नसल्यामुळे, उंदीर घुशींच्या आक्रमणामुळे हजारो टन धान्याची नासाडी झाल्याचे मागे एकदा वाचनात आले होते. एके ठिकाणी दुष्काळामुळे, अन्नधान्य, कडधान्ये, भाज्यांना योग्य भाव नसल्यामुळे कर्जबाजारी शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात, तर दुसरीकडे हजारो टन धान्याची नासाडी होते, हे चित्र आपल्या देशाला मुळीच भूषणावह नाही, याचाही गंभीरपणे विचार झाला पाहिजे.
डॉ. काकोडकर यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे, ते म्हणजे आपल्या देशाच्या बाजारपेठेची व्याप्ती पाहून देशातील अनेक प्रकारच्या उत्पादनांच्या कंपन्या भारतात आपली उत्पादने विकू लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे स्वप्न राहिले बाजूला, पण विदेशी कंपन्या मात्र आपल्या तिजोर्‍या भरत आहेत. आपण आजकाल फॅशनच्या नावाखाली विविध विदेशी वस्तूंचा सर्रास वापर करत आहोत, हेही लक्षण काही ठीक नसल्याचे ते म्हणाले. काय गंमत आहे बघा. आपला भारत देश पारतंत्र्यात असताना आपण विदेशी वस्तूंवर बहिष्कार तर घातलाच, पण विदेशी वस्तूंची होळीदेखील केली. आणि आता मध्यमवर्गीयांपासून तो श्रीमंतांपर्यंत कपडे, घड्याळ, पेन, पादत्राणांपासून घरातील नेहमीच्या वापरातील वस्तूही परदेशी बनावटीच्याच वापरीत आहोत. या आपल्या चैनीवरच विदेशी कंपन्या आपली पोळी भाजून घेत आहेत, याचा स्वाभिमानी नागरीकांनी आता विचार करायची वेळ आली आहे. यावर उपाय म्हणून आपण उत्कृष्ट उत्पादनांची निर्यात करतो व निकृष्ट दर्जाचा माल आपल्यासाठी ठेवतो यावरही विचार करता येईल.
डॉ. काकोडकर यांनी आणखी एका महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, ‘महिला व बाल सबलीकरण, सामाजिक विकास पर्यावरणाकडे संरक्षण या वरवर साध्या वाटणार्‍या गोष्टी आज मोठी आव्हाने बनून आपल्यासमोर उभ्या आहेत, पण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण ही सर्व आव्हाने पेलू शकू याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. तंत्रज्ञान विकसित करण्याची भारतीयांची क्षमता कदाचित आहे, पण आपणच त्याबाबतीत अनभिज्ञ आहोत, असेही प्रतिपादन त्यांनी केले. तंत्रज्ञानातील फायद्यांचा विचार आपण कमी करतो, तंत्रज्ञानातील तोट्यांनीच जणू आम्हाला ग्रासले आहे, असे सांगताना ते म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टींचे जसे फायदे-तोटे असतात, तसेच ते तंत्रज्ञानाचेही आहेत, याचा विसर आपण पडू देता कामा नये. परंतु थोड्या पद्धतीने वापर केल्यास तंत्रज्ञान मानवी आयुष्य समृद्ध करू शकले हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. तसेच स्वतः तयार केलेले तंत्रज्ञानच आपल्या देशाला पुढे नेऊ शकते. आज आपण स्वयंपूर्ततेकडे वाटचाल करीत आहोत. तांत्रिक स्वावलंबित्वाकडे भारताची वाटचाल सुरू असून त्यासाठी गरज आहे, ती दर्जात्मक शिक्षणाची. हे साध्य झाल्यास आपला भारत देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फार महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे डॉ. काकोडकर म्हणाले.
डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. अनिल काकोडकर हे दोघेही गोमंतकीय सुपुत्र यावेळी आपल्या देशातच नव्हे तर आपल्या कर्तृत्वाने जागतिक नकाशावर तळपत आहेत. त्यांचे विचार गंभीरपणे घेण्यात व तशी प्रत्यक्ष कृती करण्यातच देशाचे भले आहे.