डॉक्टरांवर पेशंटचा विश्वास…!

0
148

– डॉ. राजेंद्र साखरदांडे (साखळी – गोवा)
खरेच! आजकाल डॉक्टर या मंडळींवर लोकांचा विश्‍वासआहे का? मी स्वतः डॉक्टर असल्याने गेली पस्तीस वर्षे जी गोष्ट अनुभवली… स्वतः रुग्णांशी बोललो… इतर डॉक्टरांशीही बोललो… त्यावरून शेवटी या निष्कर्षापर्यंत जरी पोहोचलो नसेन तरीही आजही लोकांचा डॉक्टरांवरचा विश्‍वास पूर्णपणे उडाला नाही. किंबहुना गोव्यातील कित्येक डॉक्टर आणखीच विश्वासपात्र ठरलेले आहेत.
हे सदर लिहिताना कुणाची प्रशंसा वा टीका करणे माझे काम नाही. तरीदेखील या कार्याशी प्रतारणा न करता लोकांची सेवा करण्यात दंग असणार्‍या कैक डॉक्टरांना माझा नमस्कार! पूर्वी प्रत्येक कुटुंबाचे डॉक्टर हे ठरलेले…! त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची पुरेपूर माहिती डॉक्टरांकडे असायची. त्यांनी केव्हाच आपली फी सांगितली नाही.. ते जास्त काही बोलत नव्हते. रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांच्या खिशांत पैसे घालायचे. बदलत्या काळानुसार बदल आवश्यक आहे. थोडेफार अजूनही ‘फॅमिली फिजिशियन’ आहेत व ते आपले काम काटेकोरपणे करतात.
डॉक्टरांवरचा विश्वास अजूनपर्यंत आहे कां याचा विचार करता मी या विषयावर कितीतरी लोकांशी बोललो. त्यांचे असे मत होते की या व्यवसायात संधिसाधू लोक शिरलेत. त्यांना मार्केटिंग करायला आवडते. आपला धंदा कसा वाढवावा यावर ते फार विचार करतात. अगदी अत्याधुनिक मशिनरी त्यांनी आणलेली आहेत. व त्यांचा वापर करणारे पण तुमची सेवा करण्यास तयार आहे.
१० वर्षांपूर्वी एका हॉस्पिटलच्या खोलीत सर्वकाही होते. नेट, टीव्ही, केबल, टेलिफोन सर्वकाही ए-वन आणि वर सेवा करण्यास लोकं होतीच. पैशांप्रमाणे सेवा उपलब्ध तिथे देशी पेशंट चालत नव्हते. सेवा फक्त विदेशी लोकांनीच… पैसे डॉलर या युरोने मोजायचे!
घाम आला, छातीत दुखायला लागले.. लगेच पेशंटची रवानगी आयसीयुमध्ये… चोवीस तास मशीनवर.. मशीनवरचे ठोके ऐकता ऐकता… रोग्याचे ठोके जोरात वाजायचे. मग तर विचारायलाच नको.. डॉक्टरांची गडबड, नर्सेसची गडबड… रोग्यास हृदयविकार झाला नसेल तर आता मात्र होणार! लगेच डॉक्टरांनी ठरवले, पेशंटला घाम येतोय, छातीत दुखतंय.. मोठ्या डॉक्टरांना फोन लावून लगेचच तयारी. अँजिओ काढायलाच हवा. तयारी झाली. अँजिओमध्ये नक्कीच काहीतरी असणारच. ‘बाय-पास’ही करावी लागेल. पेशंट म्हणतोय, चिकन थोडे जास्तच खाल्ले होते… पोटात गॅस झालाय..! तयारी झाली. पेशंटच्या नातेवाइकांनीही तयारी केली. पेशंट अपोलोत न जाता जीएमसीत गेला. तिथे सगळ्या टेस्ट झाल्या. निदान- ‘‘ऑल वेल’’. थोडी ऍसिडिटी झाली. या गोष्टी ऐकून वाचाच बसते!
केस नं. २ ः पेशंटला ऍटॅक… अँजिओमध्ये ब्लॉक सापडला… प्लास्टी केली. चांगला विदेशी स्टंट बसवला. जो जीवनात केव्हाच ब्लॉक होत नाही. तीन महिन्यांनंतर तोच स्टंट ब्लॉक… पेशंट मरता मरता वाचला.. बाय-पास करावी लागली.
आमच्यात थोडे महाभाग आहेत.. पोट कापतात परत शिवून टाकतात…! ऍपेन्डिक्स किती मोठाली झाली होती… फुटता फुटता उरली, कुठलीतरी बाटलीत भरलेली ऍपेंडिक्स फुटायची पाळी- परत ऑपरेशन. ती ऍपेंडिक्स आता फारच मोठी झाली होती. मेलेल्या मढ्यावरच्या टकल्यावरचे लोणी खायचे कमी करणार नाहीत.
खरे म्हणजे यात – १५-२० टक्के डॉक्टरांनी या नोबेल प्रोफेशनची नुसती वाट लावली आहे… हे माझे मत नाही… लोकांचे आहे! अशी कितीतरी जागती उदाहरणे आधुनिक जगतात सापडतात.
आज सर्रास गुडघ्यावरची ऑपरेशन्स चालूच असतात. याची खरेच गरज आहे का? यावर मी डॉक्टर लोकांकडे चर्चा केली. ते म्हणाले…
वयोमानाप्रमाणे गुडघ्याची झीज होते… हाडावर हाड फिरते व त्यात जीवघेणी कळ येते… चालता येत नाही…!
आज सर्वकाही मिळते; फक्त पैसे हवेत. गुडघे बदलतात. १५ ते २० वर्षे पायांना काही होत नाही. वेडेवाकडे चालणे नाही. म्हातारपणातील शेवटची शेवटची वर्षे वेदनारहित होतात. कुणी डॉक्टर म्हणतात विदेशी गुडघे चांगले असतात, पण किंमत ज्यादा. खरे तर डॉक्टर साहेबांनी कुठले गुडघे बसवलेत डॉक्टरांनाच माहीत.. तेवढा विश्‍वास ठेवावाच लागणार. जर का कुणा डॉक्टरनी मोठे काहीतरी सांगितले तर दुसर्‍या डॉक्टरचा सल्ला(सेकंड ओपिनियन) घेणे जरुरीचे! याचा अर्थ पहिल्या डॉक्टरवर आपण विश्‍वास ठेवत नाही, असा होत नाही. तरीदेखील खातरजमा केल्याशिवाय, डॉक्टर सांगतात म्हणून ते हो म्हणणे किती बरोबर व किती खोटे आहे हे काळाने ठरवण्याअगोदर आपणच आपली शंका दूर केली म्हणजे झाले.
हल्लीच एका होतकरू प्रसिद्ध डॉक्टरनी मोठाले हॉस्पिटल सुरू केलेत. त्यात सगळ्या सुविधा चिक्कार भरलेल्या. हे बडे डॉक्टर झोपतच नाहीत. रात्री दोनला सगळ्या वॉर्डच्या नर्सेसना फोन करतात.. चौकशी करतात.. किती खाटा रिकाम्या आहेत.. व कां? जर रिकाम्या खाटांची संख्या जास्त असेल तर मग रात्रभर ते झोपतच नाहीत, कारण बँकेचे कर्ज काढलेय.. हप्ता भरतील ना… ते भरायलाच हवेत!
एक तर आसामी अशी आहे… कुठलाही पेशंट येऊ दे.. त्याचे रक्त तपासायचे, एक्स-रे काढायचा, पोटात दुखतेय.. अल्ट्रासाउंड काढायचा! नाडी चुकते… आय.व्ही. लावा… मशिने छातीला लावा… अगदी जखडून टाका..! हॉस्पिटलच्या कॉट्‌स रिकाम्या ठेवता कामा नये! एका पेशंटला तर सांगितले, ‘तुझा रोग जुनाट झालाय. घरच्यांना फोन करून बोलवा.. ऑपरेशन करावे लागेल..! पेशंट कशीबशी रडत घरी गेली. दुसरे दिवस घरची लोकं तिला दुसर्‍या डॉक्टरांकडे घेऊन गेली.. कालची हकिकत काही डॉक्टरांना सांगितली नाही. डॉक्टरांच्या औषधांनी पेशंट बरा झाला. रोग जुनाट झाला नव्हता तर हॉस्पिटलची मशिनरी न वापरल्याने गंजत चालली होती.
आजचा रुग्ण रोगाविषयी जाणतो. काहीही सांगितलेले ते ऐकत नाहीत. त्याचा डॉक्टरांवर विश्‍वास आहे.. त्याकरता डॉक्टरांची ते ‘लिटमस टेस्ट’ घेतात. एखादा रोगी एकदाच फसू शकतो. परत नाही. आजकाल ते हॉस्पिटल व ते डॉक्टर बेकार झालेत. रुग्ण त्या दवाखान्यांची पायरी चढत नाहीत.
माणसाला रोग हा होणारच. रोग झाल्यावर रोग्याला डॉक्टरांकडे जाणे भाग आहे. मग विश्वास हा ठेवावाच लागणार. कुणी डॉक्टर पैशाकरता काहीही करील म्हणून त्याचा दोष संपूर्ण डॉक्टरी व्यवसाय करणार्‍यांवर घ्यावा, हे काही योग्य नाही. प्रत्येक व्यवसायामध्ये भ्रष्टाचार अगदी भरून ओततोय.. तेव्हा त्या व्यवसायांना आम्ही सुळावर चढवतो का?
कालच कुणी सोशियल मिडियावर मेसेज पाठवला-
‘कुणी जज्जनी (न्यायाधीश) खालच्या कोर्टात दिलेला निकाल वरच्या कोर्टात फेटाळला व खालच्या कोर्टवर चांगले ताशेरे ओढले तर कुणी खालच्या कोर्टच्या न्यायाधीशाला सुळावर चळवले कां?’
कुणी नेत्याने किंवा मंत्र्याने चार्‍याचे पैसे खाल्ले… खाल्ले ते किती खायचे?.. चांगले हजारों कोटी – कुणी त्या मंत्र्यांना सजा केली का?.. सुळावर चढवले कां?
मग सगळे जण डॉक्टराच्या जिवावर का उठलेत? त्यांना त्यांचे जीवन जगू द्या की! जे काही चूक करतात त्यांना सुळावर चढवणारे कुणीच नाही कारण त्यांचे हात बांधलेले आहेत.. अगदी वरच्या माणसापर्यंत ते पोहोचलेत… तेव्हा मला मात्र तुम्ही माफ कराच!
मी काही कुणा डॉक्टरांना दोष देत नाही. शेवट लक्ष्मी ही प्रत्येकाला आवडते. पण हात कसा मारावा… व ते कितपत योग्य आहे, हा विचार जरूर करावा. आमच्या कैक डॉक्टरांना ‘हॅट्‌स ऑफ’ जे आजवर आपल्या पेशाबद्दल इमान राखून आहेत, भले त्यांनी पैसे नाही जमवले.. त्यांच्यापाशी नवीन होंडाची लेटेस्ट गाडी नसेल.. पण त्यांच्या छातीत केव्हाच कळ येणार नाही.. शिवाय जेवलेले खरेच पचेल..!
योग्य तो मोबदला जरूर घ्यावा. पण रुग्णाला सांभाळा, त्यावर योग्य तो उपचार करा..!
करणार ना! रोगी तुम्हाला आशीर्वाद देतील! रात्री जागणारे डॉक्टर जागत राहतील..! आम्ही मात्र झोपायला जाऊ!