डॉक्टरांनी परवानगी दिल्यास पर्रीकर विधानसभेत येतील

0
85

>> खासदार नरेंद्र सावईकर यांची माहिती

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर लीलावती इस्पितळात उपचार चालू आहेत. गोव्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यासाठी येण्यास ते उत्सुक आहेत. मात्र, त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली तरच ते येणार असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार व भाजप नेते नरेंद्र सावईकर यांनी काल सांगितले.

आज त्यांच्या प्रकृतीत किती सुधारणा होते त्यावर सगळे काही अवलंबून असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले. विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गोव्यात येण्यास ते स्वतः खूप इच्छुक आहेत. मात्र, डॉक्टरांनी परवानगी दिली तरच ते येऊ शकणार असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.

उद्या गुरुवार दि. २२ रोजी गोवा विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून पर्रीकर यांनी काल इस्पितळात ह्या अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थसंकल्पात कोणत्याही त्रुटी राहून जाऊ नयेत यासाठी त्यांनी इस्पितळातच अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला, असे सूत्रांनी नमूद केले.
विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यास जर आपण येऊ शकलो नाही तर तो सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मांडावा, अशी सूचना पर्रीकर यांनी यापूर्वीच केलेली आहे. ढवळीकर हे हा अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवतील की त्याचे वाचन करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी ते तो सभागृहाच्या पटलावरच ठेवतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पर्रीकर यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्र्याचे कामकाज हाताळण्याची जबाबदारी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर सोपण्यात आलेली आहे.