डेन्मार्क ओपनवर श्रीकांतची मोहोर

0
63

किदांबी श्रीकांतने काल डेन्मार्क ओपन सुपर सीरिज प्रीमियरवर विजयाची मोहोर उमटवली. श्रीकांतने अंतिम सामन्यात कोरियाच्या ली ह्यूनचा सरळ गेममध्ये २१-१० आणि २१-५ असा पराभव करत ७ लाख ५० हजार डॉलर बक्षीस रकमेची ही स्पर्धा आपल्या नावे केली. श्रीकांतने पहिल्यांदाच डेन्मार्क ओपनवर विजयाचा झेंडा रोवला आहे, तर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. १९७९-८० मोसमात प्रकाश पदुकोण यांनी ही स्पर्धा जिंकली होती. श्रीकांतचे हे तिसरे सुपर सीरिज विजेतेपद आहे.

अंतिम सामन्यात श्रीकांतच्या झंजावाती खेळापुढे ह्यूनची डाळ शिजली नाही. आपल्यापेक्षा १२ वर्षे जास्त अनुभव असलेल्या ह्यूनवर श्रीकांतने पहिल्या गेमपासून दबाव निर्माण केला. ह्यून याने उपांत्य फेरीत द्वितीय स्थानावरील सोन वान हो याला अस्मान दाखविले होते. परंतु, श्रीकांतसमोर त्याला लय सापडली नाही. पहिल्या गेममध्ये एकवेळ सामना ४-४ असा बरोबरीत होता. परंतु, श्रीकांतने मध्यंतरापर्यंत ११-६ अशी आघाडी घेत ह्यूनवर दबाव टाकला. त्यानंतरही त्याने जोरदार स्मॅशचा मारा करत ह्यूनला चुका करण्यास भाग पाडले आणि गेम २१-१० असा सहज जिंकला. दुसर्‍या गेममध्ये श्रीकांतने आणखी आक्रमक खेळ करत ह्यूनला सामन्यात परत येण्याची कोणतीही संधी दिली नाही. २४ वर्षीय श्रीकांतने दुसर्‍या गेमच्या मध्यंतरापर्यंत ११-१ अशी आघाडी घेतली होती. यावेळीच त्याला विजयाची चाहुल लागली होती. त्यानंतर श्रीकांतने दुसरा गेम २१-५ असा जिंकला आणि डेन्मार्क ओपन विजेतेपदावर नाव कोरले. श्रीकांतने ङ्गक्त २५ मिनिटात अंतिम सामना जिंकला.

स्पर्धेच्या अन्य विभातील अंतिम सामन्यांत महिला एकेरीत रात्चानोक इंतोनोन हिने पाचव्या मानांकित अकाने यामागुची हिचा १४-२१, २१-१५, २१-१९ असा पराभव करत यंदाच्या मोसमातील पहिला किताब पटकावला. मिश्र दुहेरीत हॉंगकॉंगच्या तांग चून मान व त्झे यी सुएत जोडीने थरारक लढतीत चीनच्या अव्वल मानांकित झेंग सिवेई व चेन क्विंगचेन यांचा २४-२२, १९-२१, २३-२१ असा पाडाव केला. महिला दुहेरीत कोरियाच्या ली सो ही व शिन सियुंग चान यांनी जपानच्या सहाव्या मानांकित शिहो तनाका व कोहारू योनेमोटो यांना २१-१३, २१-१६ असे सहज पराजित केले. पुरुष दुहेरीत लियू चेंग व झांग ना या चीनी जोडीने इंडोनेशियाच्या मार्कुस फर्नाल्डी गिडियोन व केव्हिन संजया सुकामुलजो यांना २१-१६, २२-२४, २१-१९ असे हरवून किताब पटकावला.