डीएसएस, गृहआधार, लाडली लक्ष्मी योजनांचे सरकारकडून सर्वेक्षण सुरू

0
115

गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (जीईएल) सरकारच्या दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार, लाडली लक्ष्मी या योजनांच्या परिणाम विवरण सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. सर्वेक्षक लाभार्थींच्या घरी भेट देऊन सर्वेक्षण करणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनांचे सर्वेक्षण करण्याची घोषणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या महिलांना गृह आधार योजनेचा लाभ दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

राज्यात २०१२ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर गृहआधार, लाडली लक्ष्मी या योजनांचा शुभारंभ करण्यात आला होता. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील लाभार्थींच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे १ लाख ५२ हजार महिलांना गृह आधार योजनेखाली मासिक मानधन दिले जाते. एक हजार रुपयांवरून सुरू केलेले मानधन १५०० रुपये करण्यात आले आहे. या गृहआधार योजनेसाठी अनेक महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्वेक्षणात उत्पन्न दाखल्याची खातरजमा केली जाणार आहे. मर्यादा ओलांडलेल्यांचे मानधन बंद करून नवीन लाभार्थींना मानधन सुरू करण्याची योजना आहे.

लाडली लक्ष्मी योजनेखाली पन्नास हजार पेक्षा जास्त मुलींना लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी अनेकांचे अर्ज प्रलंबित आहेत. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली काही बोगस लाभार्थी आढळून आलेले आहेत. या सर्वेक्षणामध्ये लाभार्थींना त्यांचे निरीक्षण नोंदविण्याची आणि योजना राबविण्यात सुधारणा करण्यासाठी सूचना करण्याची संधी उपलब्ध आहे. या सर्वेक्षणामुळे सरकारला योजनांचे परिणाम व सुधारणेचे क्षेत्र शोधण्यास मदत होणार आहे. तसेच योजना अधिक परिणामकारकपणे राबविण्यात मदत होणार आहे.