‘डिजिटल क्रांती..’वर ओपन फोरममध्ये चर्चा

0
137

इफ्फीमधील ओपन फोरममध्ये काल शेवटचे सत्र पार पडले. ‘डिजिटल क्रांती…चित्रपटाचे बदलते स्वरुप’ हा यावेळी चर्चेचा विषय होता. उज्ज्वल निरगुडकर, सभासद- अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेस, संजय चांदेकर, प्रमुख, रेडिओ एफटीटीआई पुणे, राजेंद्र तालक, उपाध्यक्ष, गोवा मनोरंजन संस्था, एम. ए. राघवेंद्रन, चित्रपट संशोधक आणि समीक्षक यांनी चर्चेत भाग घेतला. इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष माईक पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

श्री. निरगुडकर यांनी डिजिटल तंत्राविषयी आपले मत मांडले. ते म्हणाले की, भारतात २००८ पासून चित्रपटांमध्येडिजिटल तंत्राचा वापर होण्यास सुरुवात झाली. सध्या दर तीन महिन्यांनी डिजिटल तंत्रात सुधारणा होत आहे. त्यामुळे अमेरिका आणि जपान या देशांप्रमाणेच भारतताही लवकरत ‘हाय अल्ट्रा डेफिनेशन’ चे युग अवतरेल. संजय चांदेकर यांनी साऊंड ट्रॅकविषयी आपले मत मांडले. डिजिटल तंत्रज्ञानामुळे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण खरी समस्या हीच आहे की, यामधून चांगला पर्याय निवडणे कठीण जात आहे. साऊंड इंजिनिअरसुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गोंधळलेले दिसत असल्याचे ते म्हणाले.

राजेंद्र तालक यांनी तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापरावर भर देण्यास सांगितले. तसेच गोवा मनोरंजन संस्था आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अधिक तंत्रज्ञानाभिमुख आणि सुविधाजनक करण्यासाठी २०१९ मध्ये नवीन जागेत स्थलांतरित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधक आणि चित्रपट समीक्षक एम ए राघवेंद्रन यांनीही चर्चेत सहभाग घेत आपली मते नोंदवली. प्रत्येकालाच दरवेळी काहीतरी नवे तंत्रज्ञान पाहण्याची आणि त्यामाध्यमातून काम करण्याची इच्छा असते. म्हणूनच तंत्रज्ञानावर आधारीत चित्रपटांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत आयडीपीए अध्यक्ष माईक पांडे यांनी चर्चासत्राचा समारोप केला.