डिचोली अपघातात युवकाचा मृत्यू

0
154

डिचोली ते मये रस्त्यावर शासकीय तंत्रनिकेतनजवळ चारचाकी कार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात धबधबा डिचोली येथील सिद्धकाम प्रभाकर राऊळ या १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती डिचोली पोलीस स्थानकातून देण्यात आली.
सिद्धकाम हा मोटरसायकलने मये येथून डिचोलीच्या बाजूने येत होता तर राजेंद्र परब हा कारने मये येथे जात असताना दोघांमध्ये समोरासमोर टक्कर झाली.
या धडकेत दुचाकीवरील सिद्धकाम हा रस्त्यावर फेकला गेला व त्याच्या डोक्याला मार बसला.
घटनेची माहिती डिचोली पोलीस तसेच १०८ रुग्णवाहिकेला देण्यात आली. १०८ ने त्याला डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला म्हापसा येथे आझिलो येथे पाठविण्यात आले. मात्र वाटेतच त्याच मृत्यू झाला. घटनेचा पंचनामा हवालदार विष्णू गावस यांनी केला तर पुढील तपास उपनिरीक्षक विठ्ठल माजिक करीत आहेत. मृतदेह सध्या बांबोळी येथे शवागरात ठेवण्यात आला आहे. तर उत्तरीय तपासणीअंती तो उद्या (रविवारी) नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलीस स्थानकातून सांगण्यात आले.