डिचोलीची केंद्र शाळा इमारत धोकादायक

0
78
डिचोली सरकारी केंद्र शाळेची जर्जर झाल्यामुळे धोकादायक बनलेली इमारत.

डिचोली (न. प्र.)
डिचोली येथील राज्यातील सर्वात आदर्श प्राथमिक शाळा अशी ख्याती असलेल्या डिचोली सरकारी केंद्र शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. या इमारीतीच्या भिंतीला विविध ठिकाणी तडे गेल्याने व नियमित सिमेंटचे तुकडे वर्गात पडत असल्यामुळे शाळेत शिकणार्‍या ३८५ मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. गेले सुमारे दोन वर्षे सतत पाठपुरावा करूनही सरकारकडून जी तातडीची कार्यवाही अपेक्षित होती ती झालेली नाही. परिणामी आता व्यवस्थापन समितीने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण धोंड यांनी दिली.
दरम्यान, या याबाबत डिचोलीचे आमदार राजेश पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सदर इमारतीचे काम करण्यासाठी दोन बिल्डर आले असून दि. १५ रोजी पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. मात्र अद्याप वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश आपण गोवा राज्य साधन सुविधा मंडळाला दिली असून काम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे अशी माहिती त्यांनी दिली.
बस्थानकाप्रमाणे स्थिती
ज्या पद्धतीने डिचोलीच्या कदंब बसस्थानकाची परिस्थिती बिकट झाली होती. त्या ठिकाणी एका महिलेला दोन्ही पाय गमवावे लागले होते. तशीच परिस्थिती या केंद्र शाळा इमारतीची झालेली असून सर्वच ठिकाणी भेगा व तडे गेलेले आहेत. सिमेंटचे तुकडे नियमित पडत आहेत. त्यामुळे मुलांच्या जिवाला धोका पोचण्याची भीती असून तातडीने काम सुरू करावे अशी आग्रहाची मागणी यावेळी पालक व नागरिकांनी केली आहे.
दरम्यान सरकारने तातडीने काम करण्याची आश्वासने यापूर्वी अनेकवेळा दिलेली आहेत. त्यामुळे आताही दिलेल्या आश्‍वासनावर किती विश्वास ठेवावा असा सवाल करत आता न्यायालायत जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे श्रीकृष्ण धोंड यांनी सांगितले.
नूतन इमारतीची पायाभरणी
दरम्यान, या शाळेच्या नूतन इमारत उभारणीसाठीची पायाभरणी निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १० कोटी रुपये खर्चून या इमारतीचे काम तातडीने हाती घेण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. त्यावेळी अगदी निवडणूक केंद्रही इतर ठिकाणी हलवून दुरुस्ती काम सुरू करणार अशी आश्वासनेही देण्यात आली होती. मात्र आता वारंवार हेलपाटे घातले, मुलांचा जीव धोक्यात आहे याची कल्पना देऊनही हवी तशी दखल घेतली जात नाही. यामुळे पालक व विद्यार्थी वर्गही चिंतेत आहेत. इमारतीच्या सिमेंटचे तुकडे वर्गात पडत असून अनेक ठिकाणी भेगा गेल्याने धोका निर्माण झालेला आहे अशी माहिती श्री. धोंड व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रघुनाथ परब यांनी यावेळी दिली.
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार खात्याने सदर इमारतीच्या बांधकासाठी निविदा काढली होती. एका कंत्राटदाराने निविदा स्वीकरली होती. मात्र ती पुन्हा रद्द केली. त्यामुळे काम रखडले. मात्र यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून तातडीने उपाययोजना करण्यास यंत्रणेने दिरंगाई केली असून मुलांचे पालक व नागरिक चिंतेत असल्याची माहिती श्री. धोंड यांनी दिली.
काम तातडीने सुरू करण्याची मागणी
दरम्यान, सदर कामासाठी दि. १५ ऑक्टोबर रोजी पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. दोन कंत्राटदारांनी ती स्वीकारलेली असल्यामुळे आता तातडीने हे काम करण्यास मान्यता देऊन त्वरित काम पूर्ण करण्यात यावे व तातडीन शाळेचे तत्परतेने दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी पालकांनी केली आहे.