डायोसेसनच्या शाळांनी प्राथमिक शिक्षण कोकणी – मराठीत द्यावे

0
107

>> माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरोंचा सल्ला

राज्यातील चर्च संस्थेशी निगडीत डायोसेसन सोसायटीच्या विद्यालयांतून प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यमातून दिले जाणारे शिक्षण बंद करून कोकणी व मराठी माध्यमातून द्यावेे, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी कॉँग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिला.

राज्यात माध्यम प्रश्‍न प्रलंबित असून सरकारने नियुक्त केलेल्या समितीने माध्यम प्रश्‍नी आपला अहवाल अद्याप सादर केलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री फालेरो यांनी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. मुलांना कोकणी भाषा देवनागरी लिपीतून शिकवावी. तसेच रोमी लिपीचे शिक्षण इंग्रजी विषय शिकविण्यास सुरुवात केल्यावरच द्यावे, असेही फालेरो यांनी सांगितले.

प्राथमिक स्तरावरील शिक्षण मातृभाषेतून हा जागतिक सिद्धांत आहे. प्राथमिक स्तरावरील शिक्षण कोकणी, मराठी या मातृ भाषांतून झाले पाहिजे. गोव्यातील लोकांची कोकणी ही मातृभाषा आहे. तसेच मराठी भाषेचासुद्धा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना स्थान नाही. इंग्रजी हा विषय द्वितीय भाषा म्हणून तिसरी इयत्तेपासून शिकविला जाऊ शकतो, असेही फालेरो यांनी सांगितले. सरकारकडून मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति विद्यार्थी ४०० रुपये अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या माध्यमातून मुलांना दर्जात्मक शिक्षण दिले जाऊ शकते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ही भाषा इयत्ता तिसरीपासून शिकविण्यास हरकत नाही. तरीही मुलांच्या शिक्षण माध्यमाचा निर्णय घेण्याचा पालकांना अधिकार आहे, असेही फालेरो म्हणाले.

मातृभाषेतून शिक्षण घेणारी मुले शिक्षणात मागे असतात हा गैरसमज आहे. पूर्वीच्या काळात मुले मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेत होती. मातृभाषेतून शिक्षण घेऊन अनेक जण उच्च पातळीवर पोहोचले आहेत.
विद्यालयात प्रशिक्षित शिक्षक असले पाहिजेत. कोकणी, मराठी शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असेही फालेरो यांनी सांगितले. सरकारने पालकांमध्ये मातृभाषेतून शिक्षणाबाबत जागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

ते फालेरोंचे वैयक्तिक मत : कॉंग्रेस
माजी मंत्री एदुआर्द फालेरो यांचे प्राथमिक शिक्षणाबाबतचे मत वैयक्तिक असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. कॉँग्रेस पक्षाचा माध्यम प्रश्‍नाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. शिक्षण माध्यमाची निवड करण्याची पालकांना मोकळीक दिली पाहिजे, असे प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.