डयुरप्पांना लिहिलेल्या पत्रात गोव्याचे हित जपले ः पर्रीकर

0
112

म्हादईप्रश्‍नी मी कर्नाटकमधील भाजप नेते बी. येडियुरप्पा यांना जे पत्र लिहिले आहे त्या पत्रातून मी गोव्याचे हितच जपले असून गोव्याचे नुकसान होईल असे काहीही त्या पत्रात नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या पत्रावरून जे लोक सध्या गदारोळ करीत आहेत त्यांनी प्रथम हे पत्र काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे, असे पर्रीकर म्हणाले.
म्हादई लवादाच्या कक्षेबाहेर जाऊन गोव्यातून म्हादई पात्रातील पाणी कर्नाटकला वळवण्याची कोणतीही तयारी आपण येडियुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रातून दाखवलेली नाही, असे पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कर्नाटकचे नेते अनंतकुमार यांनी म्हादईचा प्रश्‍न संसदेत काढल्याचे पत्रकारांनी पर्रीकर यांच्या नजरेस आणून दिले असता त्यांनी संसदेत प्रश्‍न उपस्थित केला त्याला मी काय करू शकतो, असे ते म्हणाले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पत्रात काय लिहिले आहे, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांना म्हादई प्रश्‍नी त्रिपक्षीय बोलणी हवी आहेत. त्यांना म्हादईच्या पात्रातील पाणी कर्नाटकला न्यायचे आहे असे सांगून ते मान्य करण्यासारखे नसल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले. लोक वेगवेगळ्या रंगाच्या चष्म्यातून आपणाकडे पाहत असतात. त्यामुळे त्यांना मी लिहिलेल्या पत्राचा अर्थही वेगळा लागत असल्याचे ते म्हणाले. गोव्याच्या हिताशी मी कोणतीही तडजोड करण्याची तयारी येडियुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रातून दाखवलेली नाही. आतापर्यंत राज्यातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आपणच केली असल्याचे सांगताना आपण नद्यांवर बंधारे बांधले तसेच पंपिंग स्टेशन्सही आपणच उभारल्याचे ते म्हणाले.

एकही एनजीओने
भेट घेतली नाही
म्हादई प्रश्‍नी आंदोलन करू पाहणार्‍या एनजीओंपैकी एकाही एनजीओच्या प्रतिनिधीने सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपली भेट घेतली नसल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. म्हादई बचाव अभियानच्या सदस्यांनीही भेट घेतली नाही. मात्र, आपण या प्रकरणी निर्मला सावंत व राजेंद्र केरकर यांच्याशी बोललो असल्याचे ते म्हणाले.

कर्नाटकलाही म्हादईचे
पाणी मिळणार
म्हादईचे पाणी कर्नाटकला मिळणार नाही असे समजणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे असल्याचे पर्रीकर म्हणाले. म्हादई ही ५२ टक्के गोव्यात, ३५ टक्के कर्नाटकात व १३ टक्के महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या नदीचे पाणी तिन्ही राज्यांना मिळणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोळसा हाताळणीत वाढ नाही
मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीत वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे पर्रीकर यांनी यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले. मात्र, कोळसा हाताळणी बर्थचा विस्तार करण्यात येत आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र, हा विस्तार कोळशासाठी नसून तेथे पोलाद अथवा अन्य वस्तूंची हाताळणी करण्यासाठी असल्याचे पर्रीकर म्हणाले.

उघड्यावर स्वयंपाक करणार्‍या
पर्यटकांना शुल्क लावणार
परराज्यातून येणार्‍या गरीब पर्यटकांपासून राज्याला महसूल प्राप्त होत नाही ही गोष्ट खरी असली तरी अशा पर्यटकांना राज्यात येण्यापासून आम्ही अडवू शकत नाहीत. मात्र, गोव्यात आल्यानंतर रेस्टॉरन्टमध्ये न जाता उघड्यावर स्वयंपाक करणार्‍या पर्यटकांसाठी राखीव जागा ठेवून त्यांना त्यासाठी शुल्क लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.

मद्य प्राशनासंबंधी
अर्थसंकल्पात नियम
गोव्यात येणारे पर्यटक कुठे मद्य प्राशन करू शकतील व कुठे नाही हे ठरवणारे नियम येणार्‍या अर्थसंकल्पात असतील, अशी माहितीही पर्रीकर यांनी यावेळी दिली. गोव्यात येणारे काही देशी पर्यटक मद्यधुंद होऊन धिंगाणा घालीत असतात त्यावरही उपाययोजना करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.