डबल डेकर रेल्वे सुरू

0
119
करमळी रेल्वे स्थानकावर काल दाखल झालेली ‘डबल डेकर’ रेल्वे. (छाया : नंदेश कांबळी)

मुंबईहून काल कोंकण रेल्वे मार्गावरून पहिली डबल डेकर रेल्वे गोव्यात दाखल झाली. या रेल्वेतून ४० प्रवासी आल्याचे कोकण रेल्वेसूत्रांनी सांगितले.
चतुर्थी सणानिमित्त ही विशेष रेल्वेगाडी एका दिवसाआड मुंबईहून गोव्यात दाखल होणार आहे. तसेच नंतर गोव्याहून परत मुंबईला जाणार आहे. आता २४, २५, २८, ३० ऑगस्ट तसेच १, ३, ५, ७, ९ व ११ सप्टेंबरपर्यंत डबल डेकर रेल्वे गोव्यात येणार आहे. लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकावरून ५ वा. ही गाडी सुटेल व संध्याकाळी ४.३० वा. करमळी स्थानकावर पोचणार आहे. करमळी स्थानकावरून २४, २६, २८, ३० ऑगस्ट व १, ३, ५, ७, ९ व ११ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा. सुटेल व संध्याकाळी ४.३० वा. मुंबईला पोचेल.
‘वालंकिणी’साठी २७ रोजी विशेष गाडी
दरम्यान, केंद्रीय पर्यटन व संस्कृती खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन त्यांना गोव्यातील ख्रिस्ती भाविकांना वालंकिणी येथे यात्रेला जाणे सुलभ व्हावे यासाठी या भाविकांसाठी एक विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी केली होती. सदर मागणी पूर्ण करण्यात आलेली असून ही रेल्वेगाडी २७ रोजी वास्को येथून दुपारी १२ वा. वालंकिणीला जाण्यासाठी निघणार आहे. २८ रोजी दुपारी १२ वा. ती वालंकिणी येथे पोचणार आहे. २८ रोजी रात्रौ ९.४५ वा. ती वालंकिणी येथून सुटणार असून २९ रोजी सकाळी ९.३० वा. वास्को येथे पोचणार आहे.