ट्रेलब्लेझर्सची सुपरनोव्हाजवर मात

0
128

वूमन टी-ट्वेंटी चॅलेंज स्पर्धेतील काल सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्स संघाने सुपरनोव्हाज संघाचा २ धावांनी पराभव केला. ट्रेलब्लेझर्सने विजयासाठी ठेवलेल्या १४१ धावांचा पाठलाग करताना सुपरनोव्हाजचा डाव १३८ धावांपर्यंत मर्यादित राहिला.

सुपरनोव्हाज संघाची कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मंधानाने शानदार फलंदाजी करताना ६७ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ९० धावांची शानदार खेळी साकारली. हरलिन देओल (३६) हिच्यासह दुसर्‍या गड्यासाठी मंधानाने ११९ धावांची भागीदारी रचली. या दोघांव्यतिरिक्त त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. सुपरनोव्हाजकडून राधा यादवने २ तर सोफी डिव्हाईन व अनुजा पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. धावांची पाठलाग करताना चामरी अटापटू (२६) व जेमिमा रॉड्रिगीस (२४) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ४९ धावा जोडल्या. सोफी डिव्हाईन (३२) व हरमनप्रीत (नाबाद ४६) यांनी यानंतर अर्धशतकी भागीदारी केली. शेवटच्या षटकात सुपरनोव्हाज संघाला १९ धावांची आवश्यकता होती. पहिल्या चार चेंडूंत हरमनप्रीतने १२ धावा केल्या. पाचव्या चेंडूवर चौकार लगावून तिने रंगत वाढवली. शेवटच्या चेंडूवर मात्र चेंडू व बॅटचा स्पर्श न झाल्याने सुपरनोव्हाजला पराभवाचा सामना करावा लागला.

धावफलक
ट्रेलब्लेझर्स ः सुझी बेट्‌स झे. रॉड्रिगीस गो. पाटील १, स्मृती मंधाना झे. अटापटू गो. यादव ९०, हरलीन देओल झे. यादव गो. डिव्हाईन ३६, स्टेफनी टेलर धावबाद २, दीप्ती शर्मा त्रि. गो. यादव ०, दयालन हेमलता नाबाद २, अवांतर ९, एकूण २० षटकांत ५ बाद १४०
गोलंदाजी ः नॅट सीवर ४-०-२९-०, अनुजा पाटील ४-१-१२-१, राधा यादव ४-०-२८-२, पूनम यादव ३-०-२५-०, सोफी डिव्हाईन ४-०-२७-१, ली ताहुहू १-०-१०-०
सुपरनोव्हाज ः प्रिया पूनिया झे. कल्पना गो. एकलस्टन १, चामरी अटापटू झे. देओल गो. गायकवाड २६, जेमिमा रॉड्रिगीस धावबाद २४, हरमनप्रीत कौर नाबाद ४६, नॅट सीवर झे. एकलस्टन गो. गायकवाड १, सोफी डिव्हाईन पायचीत गो. एकलस्टन ३२, ली ताहुहू धावबाद ०,अवांतर ८,एकूण २० षटकांत ६ बाद १३८
गोलंदाजी ः झुलन गोस्वामी ३-०-३१-०, सोफी एकलस्टन ४-०-११-२, दीप्ती शर्मा ४-०-२७-०, शकिरा सेलमन ३-०-२८-०, राजेश्‍वरी गायकवाड ४-०-१७-२, हरलीन देओल १-०-१०-०, स्टेफनी टेलर १-०-९-०