ट्रम्प येत आहेत

0
199

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज २४ आणि उद्या २५ रोजी आपल्या पहिल्यावहिल्या भारत भेटीवर येत आहेत. अहमदाबाद हे या भेटीचे केंद्र असल्याने तेेथे जोरदार तयारी चालली आहे. या भेटीला उभय देशांच्या दृष्टीने निश्‍चितच अतिशय महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळामध्ये भारत अमेरिकेच्या बाजूने अधिक झुकला. आज अमेरिका हा संरक्षण, ऊर्जा आदी क्षेत्रांतील भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यातही व्यक्तिशः मोदी आणि ओबामा व आता मोदी आणि ट्रम्प यांच्यामधील समपातळीवरील मैत्रीसंबंध या आंतरराष्ट्रीय नात्याला अधिक मोठे परिमाण देणारे राहिले आहेत. भारताकडे बघण्याचा अमेरिकी दृष्टिकोन आता अपरिमित बदललेला आहे. एक विकसनशील देश म्हणून नव्हे, तर बुद्धिमान मनुष्यसंसाधन असलेला एक देश व एक फार मोठी बाजारपेठ म्हणून अमेरिका आज भारताकडे पाहते आहे. एकेकाळी भारताचा कल सोव्हिएत रशियाकडे असल्याने पाकिस्तानचा वापर अमेरिका भारताविरुद्धचे हत्यार म्हणून करीत आली होती. परंतु सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर हे चित्र बदलत गेले. भारताने नव्वदच्या दशकामध्ये नवी उदारीकरणाची नीती स्वीकारली तेव्हापासून या देशाच्या आंतरिक शक्तीचा प्रत्यय जगाला येत गेला. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यापासून तर भारताची जागतिक प्रतिमा प्रचंड प्रमाणात सुधारली. एक उभरती महासत्ता म्हणून भारताचा विचार करणे जगाला अपरिहार्य ठरले. अमेरिकाही त्याला अपवाद राहिली नाही. त्याचाच फायदा घेत भारताने कुरापतखोर पाकिस्तानला शह देण्यासाठी अमेरिकेशी जवळीक साधली आणि त्याची फळेही नंतरच्या काळात आपल्याला मिळाली. विशेषतः काश्मीरच्या संदर्भात अमेरिकेने स्वीकारलेली तटस्थ नीतीच कलम बालाकोट कारवाईसारखे किंवा ३७० हटवण्यासारखे धाडसी पाऊल उचलण्याची ताकद भारताला देऊन गेली. बराक ओबामांच्या जागी ट्रम्प आल्यापासून त्यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ चा नारा देत स्वदेश हित सांभाळण्याला प्राधान्य दिले आहे, त्यामुळे मध्यंतरी भारताशी त्यांचा खटकाही उडाला. भारताला व्यापारातील विशेष दर्जा हटवण्याचे पाऊल त्यांच्या सरकारने उचलताच भारताने तात्काळ अमेरिकेच्या इतराजीची तमा न बाळगता त्यांच्या २८ वस्तूंवरील कर वाढवून सणसणीत प्रत्युत्तर दिले. मात्र, भारत हा संरक्षण व इतर क्षेत्रांतील अमेरिकेचा फार मोठा ग्राहक असल्याने त्याबाबत फार अकांडतांडव न करता ही चपराक त्यांनी निमूट सहन केली. आता भारत भेटीवर आले असताना ट्रम्प भारताशी चाललेल्या व्यापारी वाटाघाटींना विराम देत एक मोठा व्यापारी करार करतील अशी अटकळ व्यक्त होत होती, परंतु नुकतीच त्यांनी आपण हा करार पुढील काळासाठी ठेवत आहोत अशी घोषणा केली आहे. भारतभेट तोंडावर आलेली असूनही ‘भारत आम्हाला चांगली वागणूक देत नाही’ असे सांगण्याचा अशिष्टपणा त्यांनी केला तो त्यांच्या एकूण लहरी कार्यशैलीचाच भाग म्हणावा लागेल. व्यापारी करार लांबणीवर टाकला असला तरी ट्रम्प यांच्यासाठीही ही भारतभेट महत्त्वाची आहे, कारण यंदा ते राष्ट्राध्यक्षपदाच्या फेरनिवडणुकीसाठी बोहल्यावर उभे राहणार आहेत. गेल्या वर्षी ह्युस्टनमध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमामध्ये उपस्थित पन्नास हजार भारतीयांच्या उपस्थितीमध्ये मोदींनी ‘फिर एक बार ट्रम्प सरकार’ ची घोषणा करून त्यांना गुदगुल्या केल्या होत्या. आता भारतभेटीवर ट्रम्प येतील तेव्हा त्याच्या दुप्पट संख्येने लोक त्यांचा जयजयकार करण्यासाठी तयार ठेवले गेले आहेत. अहमदाबादेतील मोधेरामध्ये जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन ट्रम्प करणार आहेत, जे मेलबर्नचा विक्रम मोडेल. त्या स्टेडियमची क्षमता एक लाख दहा हजारांची आहे. विमानतळापासून स्टेडियमपर्यंत रांगेत लाखो लोक ट्रम्प यांच्या स्वागतार्थ उभे असतील तो भाग वेगळाच. त्यामुळे लाखो लोकांकडून होणार असलेल्या या जयजयकाराच्या कल्पनेनेच ट्रम्प सुखावले आहेत. शेवटी अमेरिकेतही इंडियन अमेरिकन मतदार आपल्याला पाठिंबा देतील अशा अपेक्षेत ते आहेत. राजकीयदृष्ट्या म्हणूनच ही भारतभेट त्यांच्यासाठी मोलाची आहे. पंतप्रधान मोदींसाठी देखील ट्रम्प यांची भारतभेट हा नेहमीप्रमाणे मोठा झगमगाटी ‘इव्हेंट’ असेल. या ऐतिहासिक भेटीसाठी गुजरातची त्यांनी केलेली निवडही बोलकी आहे. जणू त्यांनी त्यांना आपल्या घरचा पाहुणचार देण्याचे ठरवले आहे. जलेबी – फाफडा, खमन – ढोकला, थेपला, खांडवी, खाकराच्या प्रेमात ट्रम्प किती पडतात आणि भारताच्या झोळीत काय टाकतात हे पाहावे लागेल. भारतात येऊन ते पुन्हा एकवार काश्मीरप्रश्‍नी मध्यस्थीचा बेसुर आळवणार नाहीत अशी आशा करूया. ट्रम्प यांची ऐतिहासिक भारतभेट उभय देशांचे संबंध एका नव्या सहकार्याच्या व सौहार्दाच्या पातळीवर घेऊन जाऊ शकली तरच या भेटीतून काही ठोस निष्पन्न झाले असे म्हणता येईल, अन्यथा केवळ मोदी आणि ट्रम्प यांच्या वैयक्तिक प्रभावात थोडी भर पडण्याखेरीज या भेटीतून हाती काही लागणार नाही.