ट्रम्प यांच्या आदेशावरुन इराणच्या गार्डस् प्रमुख सुलेमानीची हत्या

0
164

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन काल शुक्रवारी अमेरिकेने इराकच्या बगदाद शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्यारेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा जनरल कासिम सुलेमानी हा ठार झाला. पेंटागॉनने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून अमेरिकेच्या या आक्रमक कारवाईमुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या कारवाईचा बदला घेतला जाईल असा इशारा इराणने दिला आहे.

मेजर जनरल कासिम सुलेमानी हा इराणच्या सर्वोच्च अशा इस्लामिक रेव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याला इराणच्या सुरक्षा व्यवस्थेचा शिल्पकार मानले जात होते. शुक्रवारी अमेरिकेने बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ला करुन सुलेमानी याला ठार केले. त्याच्याबरोबरच या हल्ल्यात इराकच्या हाशेद -अल-शाब्बी या निमलष्करी दलाचा उपप्रमुखही ठार झाला. ६२ वर्षीय सुलेमानी ठार झाल्याची घोषणा पेंटागॉनतर्फे करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे या घोषणेत म्हटले आहे.

अमेरिकेवर सूड उगवण्याचा
इराणी अध्यक्षांचा इशारा
दरम्यान इराणचे अध्यक्ष हासन रुहानी यांनी म्हटले आहे की इराण व आखातातील स्वतंत्र देश गुन्हेगारी अमेरिकेवर सूड उगवतील. सुलेमानीच्या हौतात्म्यामुळे इराण व अन्य सहकारी देशांच्या इस्लामिक मुल्यांच्या रक्षणासाठीच्या दृढनिश्‍चयात वाढ झाली आहे. तसेच अमेरिेकेविरोधात दोन हात करण्याचे बळ वाढले आहे. आपल्या विरोधातील अधिकार्‍यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या लष्कराने बचाव म्हणून ही कारवाई केल्याचा दावा पेंेटागॉनने केला आहे.

भारत, चीनकडून संयमाचे आवाहन
अमेरिकेने इराणच्या शक्तीशाली सुलेमानी याला हवाई हल्ल्यात ठार मारल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने संबंधितांनी संयम पाळावा असे आवाहन केले आहे. स्थिती आणखी चिघळू देऊ नये असे भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयातर्फे जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. चीननेही संयम पाळण्याचे आवाहन विशेष करुन अमेरिकेला केले आहे.