ट्रम्प यांची माघार

0
109

काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खुमखुमी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर जिरल्याचे स्पष्ट झाले. उभय नेते जेव्हा संयुक्तपणे पत्रकारांना सामोरे गेले, तेव्हा दोघांनीही काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असून ते तो सोडवू शकतील अशी भूमिका घेतली. भारताचे हे मोठे यश आहे असे म्हणावे लागेल, कारण ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा आपला हेका सोडला नसता तर तो प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पाकिस्तानचा सध्या जो आटापिटा चालला आहे, त्याला यश मिळाल्यासारखेच झाले असते. परंतु ते घडत नसल्याचे पाहून अस्वस्थ झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान आता भारतावर अण्वस्त्र हल्ल्याची भाषा करीत आपल्या देशवासीयांच्या व्यथेवर फुंकर घालण्याचा आटापिटा करीत असल्याचे दिसते. फ्रान्समधील जी ७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरसारखा अत्यंत संवेदनशील बनलेला मुद्दा भारताने व्यवस्थित हाताळल्याची खात्री ट्रम्प यांची ताजी भूमिका देते आहे. भारत आणि पाकिस्तान हे फाळणीपूर्वी एकच राष्ट्र होते, त्यामुळे आपसातील सर्व प्रश्न आम्ही मिळून सोडवू. त्यासाठी कोण्या तिसर्‍या देशाला ‘त्रास देण्याची’ जरूरी आम्हाला वाटत नाही असे पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या तोंडावर सांगितले, ते म्हणजे तर कडू घोट साखरेच्या पाकात घोळवून देण्यासारखेच होते. मुत्सद्देगिरीमध्ये प्रत्येक शब्दाला कसे महत्त्व असते हे सर्वविदित आहे. तिसर्‍या पक्षाची लुडबूड आम्हाला नको आहे असेच वास्तविक मोदींना म्हणायचे होते, परंतु ते ट्रम्प यांच्या तोंडावर सांगत असताना तिसर्‍या देशाला त्रास देण्याची जरूरी आम्हाला वाटत नाही अशा मऊसूत शब्दांत मोदींनी तो प्रश्न फिरवला आणि ट्रम्प हात चोळत राहिले. ‘१९४७ पूर्वी आम्ही एकच देश होतो’ या वाक्याने तर तिसर्‍या पक्षाच्या लुडबुडीची गरज नाही हेच अधोरेखित झाले. काश्मीरमधील परिस्थिती शांत असल्याचे मोदींनी आपल्याला सांगितल्याचेही ट्रम्प म्हणाले. तेथील परिस्थितीबाबत त्यांना चिंता व्यक्त करता आली असती, परंतु मोदींच्या सांगण्यावर ते गप्प राहिले, याचाच अर्थ भारताच्या म्हणण्याशी त्यांनी सहमतीच दर्शविलेली आहे. अर्थात, ट्रम्प हे एक लहरी गृहस्थ आहेत. त्यांची भूमिका ही नेहमीच अमेरिकेचे हित लक्षात घेऊन बनत आणि बदलत असते. त्यामुळे त्यांची आजची ही भूमिका पुढेही कायम राहील याची शाश्‍वती नाही. शिवाय भारतासंबंधी मऊसुत भूमिका घेण्यामागे पाकिस्तानचा पाठीराखा असलेल्या चीनला शह देण्याचा प्रयत्नही आहेच. अमेरिकेला भारताचे प्रेम उतू चालले आहे असे नव्हे, परंतु चीनशी चाललेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेशी मैत्र जपणे त्यांना आवश्यक वाटते आहे. ट्रम्प यांनी मध्यस्थीतून माघार घेतल्याचे जवळजवळ स्पष्ट झाल्याने आता पाकिस्तान खवळणे स्वाभाविक आहे. त्यातच आखातातील इस्लामी राजवटींनी काश्मीरबाबत त्रयस्थ भूमिका घेणे आणि उलट मोदींना संयुक्त अरब अमिरातीने आपला सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविणे हे म्हणजे पाकिस्तानच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे झालेले आहे. इस्लामी देशांनी साथ न देणे हा पाकिस्तानचा मोठा राजनैतिक पराभव आहे. भारताचा प्रभाव जगामध्ये वाढत चालला असल्याची ही निशाणी आहे. पाकिस्तानसारख्या बुडत्या अर्थव्यवस्थेच्या गरजू देशाशी संबंध वृद्धिंगत करण्यापेक्षा भारतासारख्या उभरत्या, गतिमान अर्थव्यवस्थेच्या देशाशी मैत्री करणे लाभदायक आहे हे या देशांना उमगलेले आहे. त्यामुळे काश्मीरसंदर्भात त्रयस्थ भूमिका घेणे त्यांनी सोईस्कर मानले आहे. जागतिक परिस्थिती पाहिली तर पाकिस्तान काश्मीर प्रश्नावर पूर्ण एकाकी आहे. चीनसारखा एखादा अपवाद सोडला तर कोणीही पाकिस्तानच्या सुरांत आक्रमकपणे सूर मिसळलेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा विषय नेण्याचा कितीही आटापिटा पाकिस्तानने जरी चालवला तरी त्यातून काही निष्पन्न होणारे नाही हे स्वतः इम्रान खान यांनाही कळून चुकलेले आहे. फक्त आपल्या देशवासीयांच्या व्यथेवर फुंकर मारण्यासाठी अण्वस्त्रांची आक्रमक भाषा ते बोलत आहेत. आधीच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानला युद्ध परवडणार आहे का? परंतु स्वतःचे दारूण अपयश झाकण्यासाठी भारतविरोधाची आग धुमसत ठेवण्यापलीकडे इम्रान खान यांच्यापाशी अन्य पर्याय नाही. काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करणे हे भारत सरकारपुढील सध्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एक होऊन काश्मीर पूर्वपदावर यावे यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने राहुल गांधी यांना हे भान अजूनही आलेले नाही आणि मोदी सरकारला हिणवण्याच्या नादात पाकिस्तानच्या सुरांत सूर मिळवून ते बोलत आहेत. मुळात ३७० हटवतानाच पुढील सर्व परिणामांचा पूर्ण विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. काश्मीरसंदर्भात अमेरिकेसह अन्य देश देखील सौम्य भूमिका घेत असताना आपलीच मंडळी अकांडतांडव करीत आहेत याला काय म्हणायचे?