ट्रम्प – पुतीन भेटीच फलित काय?

0
105
  • शैलेंद्र देवळाणकर

अमेरिका आणि रशिया या जागातिक स्तरावरील बलाढ्य सत्ता. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर रशियाची शकले झाली तरी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून अमेरिका ज्या पद्धतीने जागतिक राजकारणातून अंग काढून घेत चालली आहे, त्यामुळे रशियाचे महत्त्व वाढत चालले आहे. ब्लादीमिर पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील ऐतिहासिक शिखर परिषद या पार्श्‍वभूमीवर घडून आली आहे. ही परिषद रशियाचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारी आहे.

दि. १६ जुलै २०१८ हा दिवस जागतिक राजकारणाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला आहे, याचे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेली शिखर परिषद. ब्रसेल्समधील नाटोच्या बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियन पंतप्रधान ब्लादिमीर पुतीन यांची ऐतिहासिक शिखर परिषद ङ्गिनलंडची राजधानी हेलसिंकीमध्ये घडून आली. ही भेट ऐतिहासिक आहेच; शिवाय व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी प्रवेश केल्यानंतरची पहिली औपचारिक बैठक आहे. २०१६ या वर्षात झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत रशियाच्या १२ गुप्तचर अधिकार्‍यांचा समावेश असल्याची गोष्ट नुकतीच उघड झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट घडून आली.

ट्रम्प व्यापारी, उच्च व्यावसायिक दृष्टीकोनातून अमेरिकेचे जागतिक स्थान बदलण्याच्या प्रयत्नात आहेत आणि शीतयुद्ध काळापासून असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत उद्दिष्टे बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन रशियाला पूर्वीची शान, गौरव परत मिळवून देण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. मात्र अमेरिकेचे परराष्ट्र धोरण बनवणार्‍यांमध्ये एकवाक्यता नाही. विशेषतः रशियासोबतचे धोरण नेमके कसे असावे याबाबत अमेरिकेत एकमत नाही हे या पार्श्‍वभूमीवर लक्षात ठेवले पाहिजे. गेल्या एका दशकापासून रशिया हा अमेरिकेच्या हितसंबंधांच्या दृष्टीने धोका असल्याचे एकमत अमेरिकेत दिसून येत आहे. ते बदलण्यासाठी अमेरिकेला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. मागील काळात क्रिमिया रशियाला जोडून घेण्याच्या रशियाच्या प्रयत्नांमुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते.

गेल्या तीन ते चार वर्षांत इतर देशांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करणे, सायबर हॅकिंग करणे, सार्वभौम राष्ट्रांच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये नाक खुपसणे, असे प्रकार रशियाकडून मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत रशियाने ढवळाढवळ केल्याच्या प्रकरणाची बरीच चर्चा जागतिक पातळीवर घडून आली. त्याचबरोबर सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांना पाठिंबा देऊन अमेरिकेचे सीरियातील नियोजन हाणून पाडण्यात रशियाचा हात होता. त्याशिवाय मध्य आशियामध्ये इराणच्या भूमिकेला पाठिंबा देऊन रशियाने अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांमध्ये इंधन तेलाचे प्रश्‍न निर्माण केले. अमेरिकेची संसदही ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे संशयी दृष्टीनेच पाहाते. या सर्व पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाशी संबंध प्रस्थापित करू इच्छित आहेत. रशियाबरोबर ताणल्या गेलेल्या संबंधांना पुनर्जिवित करण्याचा त्यांचा प्रयत्न कोणत्या वळणावर जातो हे येणार्‍या काळात पाहावे लागणार आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या हेतूविषयी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळेच युरोपातील पारंपरिक आघाड्यांना असुरक्षितता वाटत आहे. याशिवाय ट्रम्प यांच्या काही हालचाली मित्र देशांसाठी चिंतेच्या ठरत आहेत.

* ट्रम्प यांनी युरोपातून अमेरिकेचे सैन्य परत बोलावण्याचे संकेत दिले आहेत.
* युरोपच्या आघाडीबरोबर संयुक्त लष्करी कवायती थांबवल्या आहेत.
* ब्रसेल्स येथे नुकत्याच झालेल्या नाटोच्या बैठकीत युरोपियन युनियनने त्यांच्या संरक्षण सिद्धतेवर जास्त निधी खर्च करावा असा आग्रह ट्रम्प यांनी धरला आहे.
* नाटोमधून अमेरिका बाहेर पडेल असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
* क्रिमिआ रशियाशी जोडून घेणे आणि युक्रेनमधील सैन्याचा हस्तक्षेप याविषयी अमेरिका माहिती घेतल्याचे संकेत त्यांनी दिली आहेत.

६. जी- ८ देशांच्या समूहात रशियाला पुन्हा प्रवेश देण्याबाबत ट्रम्प आग्रही आहेत.
७. विविध प्रसंगी ट्रम्प यांनी ब्लादीमीर पुतीन यांना महान नेते म्हणून गौरवले आहे.
ट्रम्प यांच्या या सर्व हालचालींमुळे युरोपीय देशांना नाकारले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे, त्यामुळे या देशांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. पूर्वी रशियाचा प्रतिस्पर्धी किंवा काऊंटरवेट म्हणून इतर युरोपिय राष्ट्रे अमेरिकेकडे पाहात होती. रशियाच्या प्रादेशिक विस्तारवादी धोऱणाला लगाम लावू शकणारी प्रति ताकद म्हणून नाटोच्या ङ्गौजांकडे ही राष्ट्रे पाहात होती. मात्र सध्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना ट्रम्प यांनी आपल्या विसंगत आणि धडाकेबाज धोरणांमुळे गोंधळात टाकले आहे.
ट्रम्प – पुतीन शिखर परिषदेमध्ये रशियावर अनेक जागतिक समस्यांबाबत दबाव आणण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न राहिला. सीरियाचा प्रश्‍न, मध्यपूर्व आशिया खंडातील अनिश्‍चितता, आण्विक गैरप्रकार – विशेषतः स्टार्टवर चर्चा, काऊंटर टेररिझम, इराण आणि उत्तर कोरियाचा प्रश्‍न याविषयी पुतिनशी ट्रम्प यांची चर्चा झाली.
रशियाच्या बाजूने या शिखर परिषदेचा विचार करता पुतीन यांनी अमेरिकेविरोधातील लढाई आधीच जिंकलेली आहे, कारण ट्रम्प यांनी अमेरिका करत असलेल्या जागतिक नेतृत्वामधून घेतलेली माघार, नाटोमधून माघार घेण्याचे सूतोवाच, अमेरिकेच्या निकटवर्तीय देशांशी सुरु केलेले व्यापारयुद्ध, मानवाधिकार परिषदेमधून घेतलेली माघार या सर्व निर्णयांमुळे रशियाच्या पदरी अनेक गोष्टी आपसूकच पडल्या आहेत. त्यामुळे एका अर्थी ही शिखर परिषद जागतिक पातळीवर रशियाचे महत्त्व वृद्धींगत करणारीच ठरली आहे. कोणतीही जागतिक समस्या सुटण्यासाठी गरजेचा किंवा महत्त्वपूर्ण असणारा देश म्हणून रशियाची अपरिहार्यता त्यात अधोरेखित झाली आहे.

२०१४ पासून अमेरिका आणि युरोप यांनी रशियाला हेतुपुरस्सर एकटे पाडले होते. मात्र त्याचा ङ्गारसा ङ्गायदा झाला नाही. उलट आज जागतिक पातळीवर रशियाचा प्रभाव सातत्याने वाढतच चालला आहे. रशियातील लोकांनी ब्लादीमिर पुतीन यांना चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिले आहे. पुतिन यांनी रशियाला गतवैभव परत मिळवून देण्याचा चंग बांधला आहे. अमेरिकेच्या अँटी बॅलेस्टिक मिसाईल सिस्टिमला धक्का देऊ शकणार्‍या क्षेपणास्त्राची चाचणी रशियाने नुकतीच केली आहे. मध्य पूर्व आशियात रशियाचा प्रभाव निश्‍चितच वाढला आहे. या सर्व घटनांची नोंद वॉशिंग्टनला घ्यावी लागली. त्यामुळेच विविध जागतिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी ठप्प झालेला संवाद पुन्हा सुरु करण्यासाठी अमेरिकेला पाऊल उचलावे लागले. असे असले तरी या शिखर परिषदेतून काही ठोस परिणाम हाती येण्याची शक्यता कमी आहे. अर्थात क्रिमिया रशियाला जोडण्याच्या बदल्यात सीरिया आणि मध्य पूर्वेतून इराणचा प्रभाव कमी करण्याचे वचन पुतीन यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न भपकेबाज ट्रम्प करू शकतात. या सर्व घडामोडी, शिखर परिषदा भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. दोन बलाढ्य शक्ती एकमेकांशी हातमिळवणी करताहेत ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे, कारण या दोन राष्ट्रांच्या शत्रुत्वाचे परिणाम पूर्वी भारताला भोगावे लागले होते. त्यामुळे शिखर परिषदेच्या माध्यमातून जर दोन्ही राष्ट्राध्यक्षांदरम्यान आणि राष्ट्रांदरम्यान मनोमिलन होत असेल तर ते भारताच्या पथ्यावर पडणारे असेेल.