ट्रम्पचा दणका

0
135

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फैलावर घेतले आणि त्याची परिणती म्हणून काल अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणार असलेली २५५ दशलक्ष डॉलरची मदत रोखण्यात आली. अमेरिकेच्या या पवित्र्यामुळे गडबडून गेलेल्या पाकिस्तानच्या मदतीला लगोलग चीन उभा राहिला आणि पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कशी ‘बलिदाने’ दिली आहेत, त्याची गाथा चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने वाचली. या सार्‍या घडामोडीचे भारताच्या दृष्टीने अतोनात महत्त्व आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विरोधात घेतलेली भूमिका ही काही भारताची कणव येऊन घेतलेली नाही. अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या मोहिमेविरुद्ध लढणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे छुपे समर्थन मिळत असल्याची आता अमेरिकेची खात्री पटली आहे आणि त्यातूनच ही मदत रोखणारे पाऊल ट्रम्प यांनी उचलले आहे. पाकिस्तान आजवर आपल्या देशाला फसवत आले. गेल्या पंधरा वर्षांत ३३ अब्ज डॉलरची मदत मूर्खासारखी पाकिस्तानला दिली गेली असे सांगत ट्रम्प यांनी यापुढे अशी खिरापत वाटली जाणार नसल्याचे ठणकावले असले, तरी त्यांचा एकूण लहरी कारभार पाहता त्यांची ही भूमिका कायम तशीच राहील याची काहीही शाश्‍वती नाही. गेल्या ऑगस्टमध्येही ट्रम्प यांना पाकिस्तानचा असाच संताप आला होता, परंतु नंतर पाकचे गोडवे गाण्यासही त्यांनी कमी केले नव्हते. अमेरिकेने पाकिस्तानची नस आवळण्यामागील आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्याची चीनशी चाललेची चुंबाचुंबी. चीनने पाकिस्तानमध्ये तब्बल पन्नास अब्ज डॉलरची गुंतवणूक चालवली आहे. चीनच्या विस्तारवादाला पाकिस्तान सर्वतोपरी समर्थन देत असल्याने ट्रम्प यांना ते सहन झालेले नाही. चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाची आणि त्यातून चीनच्या युरोप आणि दक्षिण आशियामधील वाढत्या प्रभावाची अमेरिकेला चिंता आहे. म्हणूनच तर अलीकडेच जाहीर केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात ट्रम्प यांनी चीन आणि रशिया यांना शत्रूराष्ट्रे घोषित करून टाकले आहे. त्यामुळे पहिला घाव त्यांनी चीनच्या आसर्‍याला गेलेल्या पाकिस्तानवर घातला आहे. मात्र, यामुळे भारताने हुरळून जाण्याचे काही कारण नाही वा या घटनाक्रमाचे श्रेय भारताच्या नव्या विदेश नीतीला वा अमेरिकीशी वाढलेल्या जवळिकीलाही फारसे घेता येणार नाही. ट्रम्प यांची ही भूमिका त्यांच्या अमेरिकी हिताला प्राधान्य देण्याच्या धोरणाचाच एक भाग आहे. हक्कानी नेटवर्कला ते दहशतवादी मानतात, परंतु काश्मीरमध्ये घातपात घडवणार्‍या लष्कर ए तोयबाला आपल्या राष्ट्रीय संरक्षण अधिकारिणीच्या दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळणारे हेच ट्रम्प आहेत. हाफीज सईदसारख्या सतत भारताविरुद्ध खुलेआम डरकाळ्या फोडणार्‍या दहशतवादी म्होरक्याविरुद्ध लादेनप्रमाणे धडक कारवाई करण्याची तयारी अमेरिका दर्शविणार आहे का? अमेरिकेने पाकिस्तानची मदत रोखली असली तरी तेवढे पाऊल पुरेसे नाही. खरोखरच पाकिस्तानचा गळा आवळायचा असेल तर ट्रम्प यांनी पाकिस्तानवर इराणप्रमाणे जबर आर्थिक निर्बंध जारी केले पाहिजेत, तरच या कारवाईला खरा अर्थ येईल. पाकिस्तान ट्रम्प यांच्या नव्या पवित्र्याने खचितच धास्तावलेला आहे, परंतु आपण आजवर अमेरिकेला दहशतवादाविरुद्धच्या लढाईत कशी मदत करीत आलो त्याचा पाढा वाचायला पाकिस्तानी नेत्यांनी सुरूवात केली आहे. अमेरिकेला आजवर पाकिस्तानने मोफत जमीन आणि हवाई दळणवळण करू दिले, लष्करी तळ वापरू दिले, गुप्तचरविषयक माहिती पुरवली, त्यामुळेच अल कायदाला सोळा वर्षे वेसण घालणे अमेरिकेला शक्य झाले असा टोला पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी काल लगावला आहे. अमेरिकेने मदत रोखल्यानंतर लगोलग चीन पुढे सरसावला, कारण अमेरिकेच्या माघारीतून निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याची चीनला ही सुवर्णसंधी गवसलेली आहे. चीन पाकिस्तानमध्ये करीत असलेल्या अब्जावधींच्या गुंतवणुकीच्या तुलनेत अमेरिकेने थांबवलेली काही दशलक्षांची मदत काहीच नाही. जी मदत थांबवली गेली आहे, तीही कायमस्वरूपी थांबवण्यात आल्याचे दिसत नाही, कारण गेल्या ऑगस्टमध्ये याच ट्रम्पनी ‘आम्ही पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध कारवाईस भाग पाडू आणि ते तो करणार असेल तरच व्यापार आणि गुंतवणूक वाढवू’ असे म्हटले होते. म्हणजे पाकिस्तानला चीनशी चाललेल्या चुंबाचुंबीबाबत जरब बसवणे हाच या कारवाईचा खरा उद्देश आहे. पाकिस्तान ही दहशतवादाची ‘मदरशीप’ असल्याच्या भारताच्या भूमिकेत ट्रम्प यांनी अजूनही पुरता सूर मिळवलेला दिसत नाही. तसे असते तर भारतात उत्पात माजवणार्‍या दहशतवाद्यांविरुद्ध ट्रम्प यांनी स्पष्ट भूमिका घेतली असती.