ट्रकच्या धडकेने फोंड्यात विद्यार्थिनी ठार

0
96

शापूर, फोंडा येथील कदंबा बसस्थानकाजवळ काल दुपारी १२.४० वा. सुमारास ट्रक व स्कूटर यांच्यात झालेल्या अपघातात मुक्ता नवीन पटेल (१५, ढवळी-फोंडा) या युवतीचा मृत्यू झाला. तर युवतीची काकी भावना सुरेश पटेल (३८, ढवळी) ही जखमी झाली. मुक्ता पटेल ही फोंड्यातील आल्मेदा हायस्कूलची दहावीची विद्यार्थीनी होती. गुरुवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने काकी समवेत फर्मागुडी येथील खाजगी डॉक्टरकडून परत घरी जात असताना अपघातात तिचा बळी गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०५ ई ३१७३ क्रमाकांची स्कूटर फर्मागुडीहून फोंड्याच्या दिशेने जात होती. शापूर येथे ऐकरी मार्गावर पोचताच त्याच बाजूने जाणार्‍या जीए ०१ टी ०२९४ क्रमांकाच्या ट्रकची धडक बसल्याने स्कूटरवरील दोघीही रस्त्यावर पडल्या. यात मागे बसलेली मुक्ता पटेल गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळात नेताना तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक घेऊन पळ काढणार्‍या चालकाला फोंडा पोलिसांनी अटक केली. अपघात प्रकरणी ट्रकचालक अमित साब सय्यद (५०, गदग-कर्नाटक) याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नवीन देसाई यांनी निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा केला.

 

धावत्या बसमधून पडून
सांगेत बसमालक ठार


दांडो – सांगे येथे धावत्या बसमधून दारावर उभे असलेले बसमालक (कंडक्टर) नारायण रायकर (६५, शिरवई, केपे) यांचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. बसचा अचानक दरवाजा उघडला गेल्याने दुपारी १ वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए-०२-झेड्-५५८६ क्रमांकाची बस सांगे बस स्थानकावरून रिवणला जाण्यासाठी निघाली होती. दांडो जंक्शनवर दोन प्रवाशांना उतरवून पुढे छोट्याशा पुलावर समोरील वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात अचानक बसचा दरवाजा उघडला. त्यामुळे दारावरील नारायण रायकर खाली पडले. त्यांचे डोके पुलावरील जलवाहिनीला आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना सांगे आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नारायण रायकर सेवानिवृत्त शिक्षक होते.