टोपी पुराण

0
1216

‘टोपी’ म्हटल्यावर आठवते ती लहानपणी ऐकलेली ‘उंदीर आणि राजाची गोष्ट?’ गोंड्याची टोपी घालून एक उंदीर जेव्हा राजवाड्यासमोर दंगा करू लागला तेव्हा राजाला राग आला आणि त्याने उंदराची टोपी काढून घ्यायला लावली. मग उंदराने आणखीनच आरडाओरडा करायला सुरुवात केली, ‘राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली…’ शेवटी राजाला उंदराची टोपी परत करावी लागली. वय थोडं वाढल्यावर टोपीचं गाणं आठवतं ना! ‘ह्यो ह्यो ह्यो पावणा बरा दिसतोय- टोपीवाला पावणा बरा दिसतो… मजला खुणावितोय…’ असो! आता बालपणात आणि तरुणपणात रमत बसू नका… टोपीबद्दल थोडी आणखी माहितीही मिळवू! या टोपीवरून काही वाक्प्रचार रूढ झाले आहेत. जसे पक्षबदलूंना ‘टोपी बदलू’ म्हणतात किंवा एखाद्याला फसवणे म्हणजे ‘टोपी घालणे’ म्हणतात.
आता थोडंसं या टोपीच्या खाली दडलंय काय ते बघू. अहो, टोपीखाली काय दडलं असणार…? डोकंच की! डोकं म्हणजे शरीराचा सर्वात वरचा म्हणजे टॉपवर असलेला भाग; आणि तो वाचवण्यासाठी उपयोगात आणतात तो ‘टोप.’ आता ‘टोप’ या शब्दाची हळूहळू ‘टोपी’ झाली असणार असा बादरायणी संबंध मी जोडून टाकलाय.
या टोप्यांची अनेक नावं, अनेक प्रकार, अनेक आकार आणि अनेक रंग आहेत. डोक्याच्या संरक्षणासाठी म्हणून आपण जे जे वापरतो ते सर्व ‘टोपी’ या सदरात मोडायला हरकत नाही. टोप्यांचे अनेक रंग असतात. काही टोप्या पांढर्‍या तर काही टोप्या काळ्या असतात. काही टोप्या खाकी तर काही टोप्या लाल किंवा केशरी रंगाच्या असतात. काही टोप्या शेवाळी रंगाच्या असून त्यावर वेलबुट्टी असते. काही टोप्या जरीच्या असतात किंवा त्यावर जरीकाम केलेले असते. काही टोप्यांचे प्रकार विशेष मानाचे असतात. आता त्या टोप्या कोण वापरतो आणि कोणत्या कारणासाठी वापरतो यावर ते अवलंबून असते.
हिंदू धर्मात काय किंवा कोणत्याही धर्मात, देवाच्या पाया पडताना डोक्यावर टोपी असणं महत्त्वाचं असतं. म्हणजे डोक्यावर काहीतरी घालणं महत्त्वाचं आहे. काही धार्मिक विधी करताना किंवा सणासुदीच्या दिवसांत डोक्यावर टोपीसम काहीतरी घालण्याची पद्धत असते. मात्र दुःखद घटनेच्या वेळी डोक्यावरील टोपी काढली जाते. एखादा ऍक्सिडंट होतो तेथे पोलीस येतात. त्या अपघातात जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर पोलीस लगेच डोक्यावरील टोपी काढतात. आर्मीतील शहीद झालेल्या प्रत्येक व्यक्तीला डोक्यावरील कॅप काढून मानवंदना दिली जाते. या टोप्यांचे जसे वेगवेगळे आकार व रंग असतात तशी त्यांची वेगवेगळी नावंही असतात. जसं की फेटा, पगडी, हेल्मेट, मुकुट, जिरेटोप, हॅट, कॅप, टोपडं, गलोतं, मुंडासं इ. इ.
पांढरा रंग स्वच्छतेचं आणि निर्मळतेचं प्रतीक मानलं जातं. शिवाय पांढरा रंग शुभही असतो. १९४७ साली जेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला तेव्हा स्वच्छ-सुंदर-निर्मळ भारताचं स्वप्न लोकांनी बघितलं होतं. त्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला. सुराज्य भारतासाठी चळवळ सुरू केली तेव्हा त्या पक्षाचे लोक पांढर्‍या टोप्या घालू लागले. बघा ना पूर्वीचे पंतप्रधान पांढरीच टोपी वापरायचे. आता सुराज्य, निर्मळ भारताचे स्वप्नच विरून गेल्यामुळे या सार्‍या लोकांनी टोप्या घालणंच बंद केलं. आता या टोपीला ‘गांधी टोपी’ का म्हणतात कोण जाणे? कारण गांधीजींनी डोक्यावर टोपी घातल्याचं कधी ऐकिवात नाही. लग्नाच्या वेळी वधू आणि वरपक्षाच्या लोकांची गळाभेट होते तेव्हा बहुतेक वेळा पांढरी टोपी घालतात. मुंबईचे प्रसिद्ध डबेवाले बहुतेक पांढर्‍याच टोप्या वापरताना दिसतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक काळ्या टोप्या वापरतात. काही पक्षाचे लोक लाल किंवा केशरी टोप्या वापरतात. पोस्टमन किंवा कंडक्टरच्या टोप्या खाकी असायच्या. आता हे लोक टोपीच वापरत नाहीत. आर्मीतील फौजी किंवा कमांडोज किंवा बॉर्डर सिक्युरिटी जवान शेवाळी रंगाच्या व त्यावर पानाफुलांचे डिझाईन असलेल्या कॅप्स वापरतात. झाडाझुडपांत लपून बसल्यावर शत्रूच्या सैनिकांना कळू नये म्हणून त्यांच्या कॅपचा रंग तसा असतो. एअर फोर्स किंवा नेव्हीच्या जवानांच्या डोक्यावर पांढर्‍या टोप्या (कॅप) असतात. जरीची किंवा जरीची वेलबुट्टी असलेली टोपी घालणारा एकतर ‘मुंज मुलगा’ असतो नाहीतर ‘नवरा मुलगा’ असतो.
साधारणपणे टोप्या (सर्वसामान्य लोक वापरतात त्या) लांबट आकाराच्या होडीसारख्या असतात. त्याची दोन्ही टोके डोक्यावर पुढे-मागे ठेवून ती घातली जाते. पण अजूनही खेडेगावातून स्व. दादा कोंडके जशी आडवी टोपी घालायचे तशी घालणारे दिसतात. कॅप या सदरात मोडणारी टोपी डोक्याच्या मध्यभागावर गोल व कपाळावर फ्लॅप (म्हणजे वाढीव पट्टी) असते. त्यामुळे डोक्याचं रक्षण होतंच, पण डोळ्यांचंही रक्षण होतं. हॅट या सदरात मोडणार्‍या टोप्या मध्यभागी गोल व चारही बाजूंना वाढीव पट्टी असते. ब्रिटिशांच्या जमान्यात अशा हॅट्‌स वापरायची पद्धत होती. आता ब्रिटिश गेले आणि जाताना आपल्या हॅट्‌सही घेऊन गेले. आता क्वचित कधीतरी रेल्वे गार्डस् किंवा तिकिट चेकरच्या डोक्यावर अशा हॅट्‌स बघायला मिळतात.
कर्नाटकात गेलात तर तिथल्या पोलिसांच्या डोक्यावर रंगीत आणि सिलेंड्रीकल टोप्या बघायला मिळतात. तारांकित हॉटेल्समधल्या शेफच्या डोक्यावर सिलेंड्रीकल पण पांढर्‍या टोप्या दिसतात. आमच्या लहानपणी एक माणूस पहाटेच्या प्रहरी वेगवेगळ्या चालीत अभंग म्हणायचा. एका विशिष्ट लयीत पाय नाचवत गावात फेरफटका मारायचा. त्याला ‘वासुदेव’ म्हणत. त्याची टोपी खालच्या बाजूला गोल व वरच्या बाजूला निमुळती टोकदार असायची. त्या टोपीला मोरपीसही लावलेले असायचे. लहान बाळाच्या टोपीला टोपडं किंवा गलोतं म्हणतात. हे टोपडं कापडीच असतं व त्याला छान झालर लावलेली असते. शिवाय हनुवटीखाली बांधण्यासाठी दोन बंद असतात. त्यामुळे ती टोपी डोक्यावर घट्ट बसते. तिच्या अशा आकारामुळे बाळाचे कानही सुरक्षित राहतात. कधीकधी ही टोपी विणलेली असते आणि तिला गोंडाही असतो.
सकाळी फिरायला जाणारे लोक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक बघितलेत का कधी? त्यांची टोपी पाहिलीत? त्या टोपीला कानटोपी म्हणतात. अशा टोपीमुळे कान, डोळे तर सुरक्षित राहतातच, पण नाकात जाणार्‍या धुळीपासूनही संरक्षण मिळते. हेल्मेट या टोपीच्या प्रकारात अपघात झालाच तर डोकं, कान, डोळे, जबडा सर्वच सुरक्षित राहातं. विशेषतः दुचाकीवरून प्रवास करताना अशा टोपीची गरजच नव्हे; सक्तीचेच आहे! त्यामुळे जीवावरचं निदान हातापायावर तरी निभावतं.
पूर्वीच्या काळचा पगडी, फेटा हा त्यातलाच प्रकार. या प्रकारात संरक्षणापेक्षाही मान महत्त्वाचा असतो. पगडी ऊटसूठ कोणीही वापरत नसतं. पगडी वापरणं हे मानाचं, विद्वत्तेचं, कर्तबगारीचं लक्षण मानलं जात असे. लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, रानडे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या डोक्यावर ही मानाची पगडी शोभून दिसायची. हे सर्व लोक विद्वान तर होतेच, पण देशासाठी, समाजासाठी त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय अशीच होती. पण त्यांच्याइतकीच अद्वितीय कामगिरी महिलांसाठी करणारे अण्णासाहेब कर्वे काळीच टोपी वापरत. कदाचित त्या काळच्या स्त्रीवर्गाबद्दल अत्यंत कर्मठ व अत्यंत दुष्ट चालीरीतींचा तो निषेध तर नसेल ना! फेटा हासुद्धा पगडीप्रमाणेच मानाचा समजला जातो. विशेषतः कुस्ती जिंकलेल्या पहिलवानाच्या डोक्यावर हा मानाचा फेटा बांधला जातो. अजूनही गावाकडे पाटील, सरपंच किंवा एखाद्या जमावाचा मुखिया हे लोक फेटा बांधतात.
मुकुट हा टोपीप्रकार राजाच्या डोक्याची शान. आता राजेपद नाहीच तर मुकुट कुठला? जिरेटोप पूर्वीच्या काळी योद्धे वापरत. तेव्हा तलवारीने युद्धे व्हायची. त्यामुळे जिरेटोप हा महत्त्वाचा. पण आता युद्ध होतात ती बंदुका आणि त्याच्याही पुढे जाऊन बॉम्बच्या सहाय्यानं. मग डोक्यावर काहीही घाला, वाचायची शक्यताच नाही.
टुरिस्ट कंपन्या आपल्याबरोबर आलेल्या पर्यटकांना विशिष्ट रंगाच्या टोप्या देतात. त्यात दोन गोष्टी साध्य होतात. पर्यटकांना उन्हाचा त्रास होत नाही आणि लांबूनही आपल्या गटातले पर्यटक ओळखू येतात. चुकामूक होत नाही.
असो. बस् झालं हे टोपीपुराण. कोणीतरी म्हटलंच आहे, ‘नावात काय आहे?’ आपल्याला काय… टोपीचं नाव काहीही असो, मतलब आपलं डोकं वाचण्याशी. ते सुरक्षित राहिलं म्हणजे झालं!
बाकी टोपीवाला पावणा मात्र दिसतो बरा; पण तुम्हाला तो कधी टोपी घालेल सांगता यायचं नाही बरं. म्हणून म्हणते, टोपीवाल्यापासून जरा लांबच रहा. त्यानं जर आपल्याला टोपी घातली तर डोकं वाचेल, पण खिसा नाही वाचायचा…!