टॉप-अप कर्जे

0
154
–  शशांक गुळगुळे
दुसर्‍या कर्जासाठी चांगला पर्याय म्हणजे ‘टॉप-अप लोन!’ हे कर्ज वैयक्तिक, व्यवसायासाठी, घर तसेच वाहन खरेदीसाठी, तसेच योग्य ‘सिक्युरिटी’ असेल तर अन्य कारणांसाठीही मिळू शकते. सणांकरिता मोठी खरेदी करण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठीही हे कर्ज मिळू शकते.
हल्ली कर्ज मिळणे तितकेसे कठीण राहिलेले नाही. तुमची जर कागदपत्रे व्यवस्थित असतील तर काही दिवसांत तुम्हाला कर्ज संमत होऊ शकते. जर तुम्ही अगोदर एखादे कर्ज घेतले आहे व तुम्हाला परत पैशांची गरज निर्माण झाली आहे तर अशावेळी घेतल्या जाणार्‍या कर्जाला ‘टॉप-अप लोन’ म्हणतात. तुमचे अगोदरचे कर्ज बँकेकडून घेतलेले असो किंवा बिगर बँकिंग वित्तीय संस्थेकडून घेतलेले असो, दुसर्‍या कर्जासाठी चांगला पर्याय म्हणजे ‘टॉप-अप लोन!’ हे कर्ज वैयक्तिक, व्यवसायासाठी, घर तसेच वाहन खरेदीसाठी तसेच योग्य ‘सिक्युरिटी’ असेल तर अन्य कारणांसाठीही मिळू शकते. सध्या सणांचे दिवस आहेत. सणांकरिता मोठी खरेदी करण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठीही हे कर्ज मिळू शकते.
या कर्जासाठी फार कमी म्हणजे आवश्यक तेवढेच ‘डॉक्युमेन्ट्‌स’ द्यावे लागतात व व्याजाचा दर पहिल्या कर्जाइतकाच असतो. वैयक्तिक व गृहकर्जासाठी मुख्यत्वे टॉप-अप कर्ज घेतले जाते. आर्थिक निकड, शिक्षण, लग्न, प्रवास, वैद्यकीय खर्च, घरदुरुस्ती, घर नूतनीकरण इत्यादी कारणांसाठी वैयक्तिक ‘टॉप-अप लोन’ घेतले जाते. हे लवकर संमत होते व व्याजदरही वाजवी असतो. सणासुदीचे दिवस सुरू झाले असल्यामुळे सध्या टॉप-अप कर्जांना मागणी वाढली आहे. गृहकर्जासाठी टॉप-अप लोन फार लोकप्रिय आहे. हे कर्ज संमत होण्यासाठी तुमची अगोदरच्या कर्जाची परतफेड नियमित हवी व कर्जबुडव्यांच्या यादीत तुमचे नाव असता कामा नये. वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड व वाहन कर्ज यांच्या व्याजदरापेक्षा टॉप-अप लोनचा व्याजदर कमी असतो. ही कर्जे दीर्घ मुदतीसाठीही मिळतात. ही कर्जे संमत करण्यासाठी प्रक्रिया सोपी आहे. घरदुरुस्ती, घरबांधणी, घराचा विस्तार किंवा पाल्याचे शिक्षण यासाठी हे कर्ज घेतल्यास सध्याच्या आयकर कायद्याच्या प्रचलित नियमांनुसार आयकरात सवलतही मिळते.
जलद प्रक्रिया
‘टॉप-अप लोन’ संमत होण्याची प्रक्रिया जलद असते. कारण कर्ज देणार्‍या यंत्रणेकडे कर्ज मागणार्‍यांची सर्व माहिती उपलब्ध असते, तसेच सदर कर्जदार कर्जफेड कशी करतो याचीही माहिती उपलब्ध असते. त्यामुळे टॉप-अप लोन संमत होण्यास दिरंगाई होत नाही. बहुतेक कर्ज देणार्‍या यंत्रणांचे टॉप-अप लोनबाबतचे नियम ठरलेलेच असतात.
सध्याचे काही बँकांचे ‘टॉप-अप लोन’चे व्याजाचे दर-
बँकेचे नाव व्याजदर (टक्केवारीत)
एचडीएफसी ८.५-९.२
ऍक्सिस बँक ८.५-१२.१
बँक ऑफ बडोदा ९.० – ९.३५
युनियन बँक ऑफ इंडिया ९.७ – ९.९५
युको बँक ९.९५
युनायटेड बँक ऑफ इंडिया ११.६
इंडियन ओव्हरसिज बँक १२
व्याजाचा दर हा कर्जाच्या जोखिमीवर ठरविला जातो. टॉप-अप लोन घरासाठी घ्यायचे असल्यास प्रॉपर्टीचे पुनर्मूल्यांकन केले जाते व तारण नियमांतही बदल केला जातो.
वैयक्तिक टॉप-अप कर्जे घराच्या टॉप-अप कर्जांपेक्षा पटकन संमत होतात. यात ‘कोलॅटरल सिक्युरिटी’ घेतली जात नाही. डॉक्युमेन्ट्‌सही कमी सादर करावे लागतात. ही कर्जे साधारणपणे एक ते दोन दिवसांत संमत होतात. गृह टॉप-अप लोनच्या कर्जाचे वितरण होण्यास किमान आठवड्याचा अवधी लागतो. कारण यात प्रॉपर्टीचे पुनर्मूल्यांकन करून घ्यावे लागते. कर्ज देणार्‍या यंत्रणेकडे कर्जदाराच्या उत्पन्नाचा पुरावा, घराचा पत्ता तसेच त्याची ‘केवायसी’चीही पूर्तता झालेली असते, त्यामुळे टॉप-अप लोन संमत होण्यात वेळ वाचतो. तसेच कर्जाची परतफेड नियमानुसार असेल तर कर्ज संमत व वितरण पटकन होते.
गृहकर्जाच्या बाबतीत नेहमीच्या कर्जदरापेक्षा ०.५ ते १ टक्का व्याज टॉप-अप लोनवर जास्त आकारले जाते. घरासाठी टॉप-अप लोन संमत करताना कर्ज मागणार्‍याचे उत्पन्न, पैसे/कर्ज परतफेड करण्याची क्षमता या बाबी विचारात घेतल्या जातात. मूळ जितक्या रकमेचे कर्ज संमेत झाले असेल त्या रकमेहून अधिक रकमेचे टॉप-अप लोन कधीही संमत केले जात नाही. ते मूळ रकमेहून नेहमी कमीच असते.
अगोदरचे कर्ज वापरल्यानंतर पुन्हा निधीची निर्माण झालेली गरज भागविण्यासाठी टॉप-अप कर्जे संमत केली जातात. ही कर्जे शक्यतो बुडित होत नाहीत. कारण कर्ज देणार्‍या यंत्रणेकडे ग्राहकाची परिपूर्ण माहिती असते. साधारणपणे मूळ गृहकर्जाच्या ७० ते ८० टक्के रक्कम टॉप-अप लोन म्हणून संमत होऊ शकते.
कर्ज परतफेडीचा कालावधी
ही कर्जे साधारणपणे २० वर्षांच्या कालावधीसाठी दिली जातात. घरांच्या टॉप-अप कर्जांसाठी हा कालावधी आहे. वैयक्तिक कर्जांसाठी परतफेडीचा कालावधी कमी असतो. कधीकधी कर्ज देणार्‍या यंत्रणा मूळ कर्ज व टॉप-अप कर्ज एकाच वेळी फिटतील अशी कर्जफेडीची रचना करतात. कर्ज परतफेडीचा कालावधी ठरविण्याचा नियम बँकेनुसार वेगवेगळा आहे. कालावधी ठरविताना कर्जदाराचे उत्पन्न विचारात घेण्यात येते. जर उत्पन्न कमी असेल तर जास्त कालावधी दिला जातो, म्हणजे त्याला कर्जाचा मासिक हप्ता कमी बसेल. कर्जफेडीचा कालावधी जास्त असल्यास कर्जफेडीचा मासिक हप्ता कमी पडतो, तर कालावधी कमी असल्यास कर्जफेडीची मासिक रक्कम जास्त असते. अर्जदाराचे वयही विचारात घेतले जाते. साधारणपणे कर्जदार निवृत्त व्हायच्या आत पूर्ण कर्जफेड होईल अशा रीतीने कर्जफेडीचा कालावधी ठरविला जातो. तसेच जशी वर्षे जातात तशी घर-प्रॉपर्टी जुनी होते, त्यामुळे कर्ज देणार्‍या यंत्रणेला ठीकठाक अवस्थेत असलेली प्रॉपर्टीच कर्ज देण्यासाठी योग्य वाटते. त्यामुळे प्रॉपर्टी ठीकठाक असेपर्यंत कर्ज परत यावे असे कर्ज देणार्‍या यंत्रणेला वाटते व त्यामुळे कर्जाच्या परतफेडीचा कालावधी ठरविताना हा मुद्याही लक्षात घेतला जातो.
टॉप-अप लोन संमत करताना सदर कर्जदाराने अगोदरच्या कर्जाचे हप्ते पूर्ण व वेळेवर भरले आहेत का? याला विशेष महत्त्व देण्यात येते. जर कर्जदाराची परतफेड नियमित असेल तर जास्त रकमेचे कर्ज संमत होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर असते. कर्जदाराचे उत्पन्न व अंगावर असलेले कर्ज यांचे काय प्रमाण आहे हा मुद्दाही विचारात घेतला जातो. उत्पन्न कमी असेल व त्याच्यावर मोठा कर्जाचा डोंगर असेल तर अशांना दिलेली कर्जे अडचणी निर्माण करू शकतात. जर उत्पन्नाच्या ४० ते ५० टक्के रक्कम कर्जफेडीवर जात असेल तर अशांचे टॉप-अप लोनचे कर्ज शक्यतो संमत होत नाहीत. पण अतिरिक्त कर्ज हवे असल्यास बाहेरून कुठूनही जास्त व्याजदराने घेण्यापेक्षा बँकेकडून टॉप-अप लोन घेणे कधीची चांगले.