टॅक्सी मालकांचा संप तूर्त मागे

0
105

>> प्रश्‍न सोडविण्याचे उपसभापतींचे लेखी आश्‍वासन

>> स्पीड गव्हर्नरप्रश्‍नी हस्तक्षेप याचिकेची हमी

विधानसभेचे उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी टॅक्सी मालकांचे सर्व प्रश्‍न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर राज्यातील पर्यटक टॅक्सी मालकांनी तीन दिवसांचा संप तात्पुरता स्थगित केला आहे. आश्वसनाची पूर्ती न झाल्यास २५ जानेवारीपासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा टॅक्सी मालकांनी दिला आहे. दरम्यान, स्पीड गव्हर्नरप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्यात स्पीड गव्हर्नर योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याने ते बसविण्यासाठी टॅक्सी मालकांना मुदतवाढ दिली जाणार आहे. जीटीडीसीकडून विमानतळावरील टॅक्सी काउंटर सेवा हाताळणी केली जाणार असून काळ्या पिवळ्या टॅक्सींची संख्या वाढविली जाणार आहे. पर्यटकांच्या तक्रारींसाठी खास ऍप विकसित केला जाणार आहे. पर्यटक टॅक्सी सेवेसाठी खास ऍप विकसित करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. राज्यात पर्यटक टॅक्सी मालकांच्या तीन दिवसांच्या संपामुळे पर्यटकांना अनंत त्रास सहन करावे लागलेे. सरकारी यंत्रणेकडून पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेली वाहतूक सेवा अपुरी पडत होती. त्यामुळे टॅक्सी मालकांनी संप मागे घेतल्याने सरकारी यंत्रणांनी सुस्कारा सोडला आहे. राज्यातील पर्यटक टॅक्सी मालकांनी काल रविवारी येथील आझाद मैदानावर सलग तिसर्‍या दिवशी एकत्र जमून निदर्शने केली.

कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी भेट घेऊन पर्यटक टॅक्सी प्रश्‍नी लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. या शिष्टमंडळात आमदार आन्तोनियो फर्नांडिस, आमदार नीळकंठ हर्ळणकर, आमदार विल्फ्रेड डिसा, सरचिटणीस गोम्स व इतरांचा समावेश होता. त्यानंतर कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी टॅक्सी मालकांची भेट घेऊन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली.

उपसभापतींची यशस्वी शिष्टाई
उपसभापती मायकल लोबो यांच्या साहाय्याने टॅक्सी मालक संघटनेच्या एकवीस पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी भेट घेऊन टॅक्सी मालकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नर आवश्यक नाही. त्यामुळे स्पीड गव्हर्नर सक्ती केली जाऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची मागणी केली. तसेच वाहतूक खात्याकडे प्रलंबित फिटनेस अर्ज त्वरित निकालात काढण्याची मागणी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे केली. संप मागे घेतल्यानंतर पर्यटक टॅक्सी मालकांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिले.

लोबोंचे लेखी आश्‍वासन
त्यानंतर आझाद मैदानावर बोलताना उपसभापती लोबो यांनी टॅक्सी मालकांना संप मागे घेण्याची विनंती केली. पर्यटकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी टॅक्सी मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर विश्‍वास नसल्याने उपसभापती लोबो यांनी लेखी स्वरूपात आश्‍वासन देण्याची मागणी टॅक्सी मालकांनी केली. अखेर उपसभापती लोबो यांनी टॅक्सी मालकांचे सर्व प्रश्‍न सोडविण्याचे लेखी आश्‍वासन दिले. उपसभापती लोबो यांच्या लेखी आश्‍वासनानंतर तीन दिवसांचा संप मागे घेण्यात येत आहे. स्पीड गव्हर्नर अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याची मागणी करण्यात आली. पर्यटक टॅक्सी मालकांच्या वाहतूक खात्याकडे प्रलंबित असलेल्या फिटनेस सर्टीफीकेट येत्या २४ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती टॅक्सी मालक संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोस्कर यांनी दिली.

वाहतूकमंत्री, काब्राल यांना इशारा
पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी ओला, उबेरच्या धर्तीवर पर्यटक टॅक्सी सेवा सुरूच करून दाखवावी, ही सेवा ‘फोल’ करून दाखविली जाईल. तसेच वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी किती पर्यटक टॅक्सी मालकांच्या विम्याची रक्कम भरली त्याची विस्तृत माहिती द्यावी, वाहतूक मंत्र्याकडे आणखीन अर्ज पाठविले जातील, असे आव्हान संघटनेचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर यांनी दिले. वाहतूक खात्याकडून फिटनेस सर्टीफीकेट मिळाल्यानंतर टॅक्सी मालकांची सतावणूक झाल्यास सहन करून घेतली जाणार नाही, असा इशारा कोरगावकर यांनी दिला.