टॅक्सी ऍपचे स्वागत

0
107

गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांची वर्षानुवर्षांची मनमानी आणि मुजोरी मोडीत काढू शकणारे मोबाईल ऍप कार्यरत करून गोवा पर्यटन विकास महामंडळाने एक चांगले व स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. गोव्यातील टॅक्सी व्यवसायाला शिस्त लावण्यात हे ऍप महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही. काही विपक्षी व काही स्वपक्षीय राजकारण्यांच्या असलेल्या विरोधाची फिकीर न करता गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी खंबीरपणे हे पाऊल उचलले याबद्दल ते निश्‍चितच अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील टॅक्सी व्यवसायातील मक्तेदारी संपुष्टात काढून स्पर्धात्मकतेचे नवे युग सुरू करण्याच्या दृष्टीने हे ऍप महत्त्वाचे ठरू शकते. त्यासाठी जनतेने त्याला सक्रिय पाठबळ देणे आवश्यक आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आज ऍप आधारित टॅक्सीसेवा प्रभावीपणे चालतात आणि त्यांनी ग्राहकांना सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा एक नवा अनुभव मिळवून दिलेला आहे. पेपरपासून ऑडियो – व्हिडियो व वायफायपर्यंतच्या सुविधांचा राजेशाही थाट आणि स्वस्त दर यामुळे अल्पावधीत शहराशहरांतून या ऍप आधारित सेवा लोकप्रिय ठरल्या आहेत. गोव्यामध्ये मध्यंतरी एका खासगी कंपनीने अशी सेवा सुरू करायचा प्रयत्न केला, तेव्हा स्थानिक टॅक्सीवाल्यांनी राजकारण्यांच्या मदतीने राडा करून तो हाणून पाडला होता. यावेळी सरकारच्याच पुढाकाराने हा श्रीगणेशा करण्यात आलेला आहे. तो हाणून पाडण्याचेही नक्कीच प्रयत्न होतील. काल दाबोळी विमानतळाबाहेर झालेल्या निदर्शनांनी त्याची चुणूक दाखवलीच आहे. ही सेवा बंद पडावी, तोट्यात जावी यासाठी खटपटी – लटपटी केल्या जातील, परंतु ती पूर्णतः व्यावसायिकरीत्या व कार्यक्षमतेने राबवण्याची जबाबदारीही आता सरकारची आहे. हा प्रयोग फसला तर पुन्हा ग्राहकांच्या हितार्थ असा उपक्रम राज्यात आकार घेऊ शकणार नाही हे विसरून चालणार नाही. गुगल प्ले स्टोअर व ऍपल ऍप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलेले ‘गोवा माईल्स’ हे ऍप अत्यंत आकर्षक स्वरुपाचे व पूर्ण व्यावसायिक धाटणीचे आहे. त्याच्या आधारे मिळणारी टॅक्सीसेवाही तेवढीच प्रभावी असायला हवी. तसे घडले तरच तिला उदंड प्रतिसाद लाभेल. आज तीनशे टॅक्सीचालक या ऍपशी संलग्न आहेत आणि आणखी तीन हजार टॅक्सीचालकांनी त्यात सहभागी होण्याचा उत्साह दाखविलेला आहे. त्यांना पुढील टप्प्यांत सामावून घेतले जाणार आहे. या योजनेत सामील होणार्‍या टॅक्सीचालकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सरकारने त्यांच्या संरक्षणाचीही खबरदारी घ्यायला हवी. खरे म्हणजे अशा प्रकारची टॅक्सीसेवा चालवणे हे काही सरकारचे काम नव्हे, परंतु येथे आजवर जे चालत आले, त्यामुळे सरकारला हे करणे भाग पाडले आहे हे लक्षात घ्यावे लागेल. मनमानी दर आकारणी, अरेरावी, विमानतळावरील प्रिपेड टॅक्सीला विरोध, कदंबच्या शटल सेवेला विरोध, हॉटेलचे प्रवासी आणायला बाहेरची टॅक्सी किंवा खासगी वाहन आल्यास विरोध, डिजिटल मीटरला विरोध, स्पीड गव्हर्नरला विरोध अशा सततच्या नकारात्मक वृत्तीमुळेच राज्यातील टॅक्सीवाल्यांनी ही कुर्‍हाड स्वतःच स्वतःच्या पायावर मारून घेतलेली आहे. देशात प्रथमच हा प्रयोग गोव्यात होतो आहे. तो पुरेशा व्यावसायिक पद्धतीनेच राबवला गेला तरच यशस्वी ठरेल, अन्यथा पांढरा हत्ती होऊन बसेल. मध्यंतरी पर्यटन खात्याने महिला चालकांची टॅक्सीसेवा सुरू केली होती. सुरवातीला गाजावाजा झाला, परंतु पुढे तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. पर्यटन खात्याची टॅक्सीसेवा सुरू आहे, परंतु तिचे भाडे पणजीपासून आकारले जात असल्याने ती महागडी ठरते. ‘गोवा माईल्स’ च्या बाबतीत असे होणार नाही, कारण जेथून जेथवर जायचे असेल तेवढेच भाडे व तेही सरकारमान्य दराने आकारले जाणार आहे. प्रवाशांना थोडा हाताळणी खर्च सोसावा लागेल, परंतु टॅक्सीचालकांकडून आकारले जाणारे मनमानी भाडे व अरेरावी यापासून त्यांची मुक्तता होईल. सरकार टॅक्सीवाल्यांना नवी टॅक्सी खरेदी करण्यासाठी अनुदान देते, त्यांचा विमा भरते, डिजिटल मीटरसाठी अनुदान देते, तरी मीटर सक्ती मात्र करू शकत नाही. त्यातून राज्यात टॅक्सी लॉबी किती प्रभावी आहे याचेच दर्शन घडत होते. या पार्श्वभूमीवर ही ऍप आधारित सेवा सुरू होणे हा महत्त्वाचा बदल आहे. या सेवेत गोमंतकीय टॅक्सीचालकांचे हित जपण्याची जबाबदारीही सरकारने घ्यायला हवी, कारण अशा सेवेच्या आडून परप्रांतीय टॅक्सीचालकांचे लोंढे गोव्यात घुसू लागले तर गोव्याची मुंबई व्हायला वेळ लागणार नाही. केवळ सेवा सुरू केल्याने सरकारची जबाबदारी संपत नाही. तिचा लाभ गोमंतकीय टॅक्सीचालकांना मिळेल, त्यांचा रोजगार वाढेल, त्यात पूर्ण पारदर्शकता असेल, वशिलेबाजीला थारा नसेल हे सगळे पाहण्याचीही गरज आहे. या सेवेची कार्यवाही व्यावसायिकरीत्या व कार्यक्षमतेने झाली तर गोवा माईल्स निश्‍चित यशोशिखरे गाठील आणि स्थानिक जनतेचा व येथे येणार्‍या लक्षावधी पर्यटकांचा दुवा घेईल.