टॅक्सीसेवा सुरू करण्याचा कदंब महामंडळाचा विचार

0
83

कदंब महामंडळ टॅक्सीसेवा (कॅबी) सुरू करण्याच्या विचारात असून याविषयी प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

कदंब महामंडळ प्रवासी वाहतूक सेवा पुरविण्याचे काम करीत आहे. टॅक्सीसुद्धा प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जात आहे. महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत टॅक्सीसेवा सुरू करण्यावर विचारविनिमय करण्यात आला आहे, असेही अध्यक्ष आल्मेदा यांनी सांगितले.

इंधन कार्यक्षमता आणि सुरक्षित वाहन चालविण्यासाठी कदंब महामंडळाच्या ९०० चालकांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासंबंधीच्या एका सामंजस्य करारावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी काल करण्यात आली. प्रशिक्षित वाहन चालकांमुळे इंधनाची बचत होऊन प्रवाशांना सुरक्षित व कार्यक्षम सेवा देण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यावेळी बोलताना म्हणाले.
पेट्रोलियम संवर्धन संशोधन असोसिएशन या संस्थेतर्फे कदंब महामंडळाच्या वाहन चालकांना खास तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात इंधन कार्यक्षमता आणि सुरक्षित वाहन चालविण्याबाबत विस्तृत माहिती देण्यात येईल. सहा महिन्यांच्या काळात कदंबच्या सर्व चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कदंब महामंडळाच्या चालकांना प्रशिक्षण दिल्यानंतर खासगी वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यावर विचार केला जाऊ शकतो, असे आल्मेदा यांनी सांगितले. यावेळी असोसिएशनचे आलोक त्रिपाठी, कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक नेटो व इतरांची उपस्थिती होती.

३० जानेवारीपासून इलेक्ट्रॉनिक बस
कदंब महामंडळाला खासगी कंपनीने उपलब्ध केलेल्या इलेक्ट्रॉनिक बसगाडीचा वापर ३० जानेवारीपासून केला जाणार आहे. एका खासगी कंपनीने कदंब महामंडळाला तीन ग्रीन बसगाड्या प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यास दिल्या आहेत. त्यातील दोन बसगाड्या सेवेत असून इलेक्ट्रॉनिक बसगाडी गेल्या पाच महिन्यांपासून वापराविना कदंबच्या पर्वरी डेपोमध्ये पडून आहे. ही बसगाडी सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे आल्मेदा यांनी सांगितले.