टी-२० मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

0
98

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० लढतींच्या मालिकेतील दुसरा सामना आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात न्यूझीलंडवर मात करीत पाच वर्षातील आपल्या तिसर्‍या टी -२० मालिका विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार आहे. तर न्यूझीलंड संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. टीम इंडियाने दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात ५३ धावांनी विजय मिळवित मालिकेत १-० अशी आघाडी मिळविलेली आहे.

दिल्लीतील पहिल्या लढतीत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी जबरदस्त कामगिरी केली होती. तशाच कामगिरीची अपेक्षा कर्णधार विराट कोहली व संघ व्यवस्थापनाला असेल. पहिल्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांडेला तिसर्‍या स्थानी बढती देण्यात आली होती. परंतु तो अपयशी ठरला. आता या सामन्यात त्याला पुन्हा तिसर्‍या स्थानी बढती मिळते, काय विराट कोहली आपल्या मूळ स्थाानवर फलंदाजीस येतोय ते पहावे लागेल. धोनीही उपयुक्त फलंदाजी करीत आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरला पदार्पणाची संधी मिळाली होती. परंतु त्याला फलंदाजी मिळाली नव्हती. आता दुसर्‍या लढतीतही त्याला संधी मिळणार हे निश्‍चित आहे.

गोलंदाजीच्या विभागात हाणामारीच्या षट्‌कांत भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी शानदार गोलंदाजी केली. अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांनी प्रभावी स्पेल टाकला होता. त्यांना तसाच प्रभावी मारा आजच्या सामन्यातही करावा लागेल. पहिल्या सामन्यात आशिष नेहरा तिसरा द्रुतगती गोलंदाज होता.
या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असल्याने त्याच्या जागी मध्यमगती गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी मिळतेय कि कोहली आणखी एक फलंदाज खेळवतोय ते पहावे लागेल.
सध्या बहरात असलेल्या टीम इंडियाची अष्टपैलू कामगिरी पाहता केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील कीविजच्या संघाला ही लढतही सोपी जाणार नाही हे निश्‍चित आहे. न्यूझीलंडला या सामन्याद्वारे मालिकेत पुनरागमन करायाचे असेल तर त्यांना धवन, रोहित आणि कोहली यांना धावा बनविण्यापासून रोखावे लागेल. गेल्या सामन्यात धवन व रोहितने १५८ धावांची शतकी भागिदारी केली होती.

कर्णधार केन विल्यमसन आणि रोस टेलर यांना उपयुक्त योगदान देण्याची गरज आहे. कोलिन दी गँ्रडहोम व मार्टिन गप्टिल यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष्य असेल. न्यूझीलंडकडे चांगली द्रुतगती गोलंदाज आहेत. ट्रेंट बौल्ट आणि टिम साऊथी यांना प्रभावी मारा करावा लागेल. त्यासाठी लाईन व लेंथवर लक्ष द्यावे लागेल. मिशेल सँटरनरही ठरू शकला नाही. न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षणही कालच्या सामन्यात सुमार दर्जाचे झाले. त्यांनी काही झेल सोडले. तर दुसर्‍या बाजूने भारतीय खेळाडूंनी शानदार क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे आजच्या सामन्यातही भारताचीची बाजू वरचढ असेल.

संभाव्य संघ पुढील प्रमाणे ः भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉड ऍसल, ट्रेंट बौल्ट, टॉम ब्रूस, कोलिन दी गँ्रडहोम, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, ऍडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी.