टीम इंडिया विजयपथावर

0
61

तिसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेची दुसर्‍या डावात ३ बाद ३१ अशी दयनीय स्थिती झाली आहे. भारताने विजयासाठी ४१० धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर लंकेचा दुसरा डाव कोलमडला आहे. कसोटी अनिर्णित राखण्यासाठी त्यांना आजचा संपूर्ण दिवस खेळून काढावा लागणार आहे. तर सामना जिंकून श्रीलंकेविरुद्धची मालिका २-० अशी खिशात घालण्यासाठी टीम इंडियाला आज शेवटच्या दिवशी ७ गडी बाद करावे लागतील.

भारताच्या पहिल्या डावातील ५३६ धावांना उत्तर देताना श्रीलंकेचा पहिला डाव काल ३७३ धावांवर संपला. यानंतर भारताने वेगाने धावा जमवत दुसरा डाव ५ बाद २४६ धावांवर घोषित केला. भारताने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शामीने समरविक्रमाला वैयक्तिक ५ धावांवर बाऊन्सरद्वारे बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर दिवसातील अखेरचे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. रवींद्र जडेजाने टाकलेल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर सलामीवीर करुणारत्ने १३ धावा करून साहाकरवी झेलबाद झाला. यावेळी त्यांची २ बाद ३१ अशी स्थिती झाली होती. षटकाच्या चौथ्या चेंडूवर नाईट वॉचमन म्हणून आलेल्या लकमलचा शून्यावर त्रिफळा उडाल्याने मॅथ्यूजला दोन चेंडूंचा सामना करण्यासाठी मैदानात उतरावे लागले.

कोहलीचा अजून एक विक्रम
दुसर्‍या डावात कोहलीने अर्धशतकीय खेळी केली. चौथ्या दिवशी कोहलीने ५८ चेंडूत ५० धावांची खेळी करत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ६०० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. कोहलीने तीन कसोटींत १५२च्या सरासरीने व ८२.२१च्या स्ट्राईकरेटने ६१० धावांची लयलूट केली आहे.

धावफलक
भारत पहिला डाव ः ७ बाद ५३६ घोषित.
श्रीलंका पहिला डाव (९ बाद ३५६ वरून) ः चंदीमल झे. धवन गो. ईशांत १६४, लंदाकन नाबाद ०, अवांतर १६, एकूण १३५.३ षटकांत सर्वबाद ३७३ गोलंदाजी ः शामी २६-६-८५-२, ईशांत २९.३-७-९८-३, जडेजा ४५-१३-८६-२, अश्‍विन ३५-८-९०-३ भारत दुसरा डाव ः विजय झे. डिकवेला गो. लकमल ९, धवन यष्टिचीत डिकवेला गो. संदाकन ६७, रहाणे झे. संदाकन गो. परेरा १०, पुजारा झे. मॅथ्यूज गो. डीसिल्वा ४९, कोहली झे. लकमल गो. गमागे ५०, रोहित नाबाद ५०, जडेजा नाबाद ४, अवांतर ७, एकूण ५२.२ षटकांत ५ बाद २४६ घोषित. गोलंदाजी ः लकमल १४-३-६०-१, गमागे १२.२-१-४८-१, दिलरुवान ११-०-५४-१, डीसिल्वा ५-०-३१-१, संदाकन १०-०-५०-१ श्रीलंका दुसरा डाव ः करुणारत्ने झे. साहा गो. जडेजा १३, समरविक्रमा झे. रहाणे गो. शामी ५, डीसिल्वा नाबाद १३, लकमल त्रि. गो. जडेजा ०, मॅथ्यूज नाबाद ०, अवांतर ०, एकूण १६ षटकांत ३ बाद ३१. गोलंदाजी ः ईशांत ३-०-६-०, शामी ३-१-८-१, अश्‍विन ५-२-१२-०, जडेजा ५-२-५-२.

कुशल परेरा, असेला गुणरत्नेचे पुनरागमन

भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघात यष्टिरक्षक फलंदाज कुशल परेरा व अष्टपैलू असेला गुणरत्ने यांचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे कुशल सहा महिन्यांपासून तर गुणरत्ने चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर आघाडी फळीतील फलंदाज कुशल मेंडीस याला एकदिवसीय संघातही स्थान नाकारण्यात आले आहे.
श्रीलंका संघ ः थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, दनुष्का गुणथिलका, लाहिरु थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला, चतुरंग डीसिल्वा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, सदीरा समरविक्रमा, धनंजय डीसिल्वा, दुष्मंथ चमीरा, सचिथ पथिराना व कुशल परेरा.