टीम इंडिया झेप घेणार ?

0
132

– प्रशांत वेरेकर
कुणी तरी म्हटलं आहे की, ‘क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनटीज’! अर्थात क्रिकेट हा अनिश्‍चिततांचा एक वैभवशाली खेळआहे. आता या म्हणण्याकडे आपले लक्ष का वेधू पाहतोय हे सुज्ञ क्रिकेटप्रेमी वाचकांच्या लक्षात आले असेलच. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना आणि काही दिवसांपूर्वी ज्या देशात ही स्पर्धा होत आहे त्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघ सपशेल अपयशी ठरलाय. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया-न्युझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार्‍या या मोठ्या स्पर्धेतही टीम इंडियाचे काही खरे नाही (किंवा खैर नाही) असेच क्रिकेटप्रेमींना वाटू लागल्यास नवल वाटायला नको.परंतु क्रिकेटप्रेमींनी निराशावादी होण्याची कारण नाही असे सांगावेसे वाटते. कारण विश्‍वचषक म्हणजे काही दोन देशांदरम्यानची किंवा तीन देशांदरम्यानची दुरंगी किंवा तिरंगी मालिका नव्हे. त्याहून अधिक देशांमध्ये होणारी ही भव्य दिव्य आणि विभिन्न प्रकारच्या खेळपट्‌ट्या असलेली एक विलक्षण आगळी वेगळी स्पर्धा आहे. म्हणूनच या आधीच्या मालिकांमध्ये भारतीय संघ एकही विजय मिळवू शकला नसला तरी वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली अपयशी ठरेल असा तर्क काढण्याचे कारण नाही.
विद्यमान जगज्जेते पदाचा दबाव
विश्‍वचषक विजेता संघ म्हणून भारतीय संघावर एक दबाव आहेच. मात्र, आधीच स्पर्धा आयोजक असलेल्या देशात दोन्ही प्रकारच्या मालिकांमध्ये अपयशी ठरल्यामुळे जगज्जेतेपद राखण्यातही भारतीय संघ अपयशी ठरेल असे अनुमान काढणे अयोग्यच म्हणावे लागेल. आता यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड या संघांना घरच्या मैदानावरील खेळपट्‌ट्या, हवामान आणि प्रेक्षकांचा मिळणारा पाठिंबा याचा लाभ मिळणार हे साहजिकच आहे. त्याचबरोबर एक गोष्ट ही आहे की, या स्पर्धेतील अन्य देशांना येथील खेळपट्‌ट्या, मैदान व वातावरण यांच्याशी जुळवून घेण्यात भारतापेक्षा कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे याचा लाभ ही भारताला मिळणार असल्याने टीम इंडियासाठी ती जमेची बाब ठरणार आहे.
क्रिकेट विश्‍वातील दिग्गजांचा टीम इंडियावर विश्‍वास
भारतीय संघ सध्या खराब फार्ममध्ये असला तरी स्पर्धा सुरू झाल्यानंतर झेप घेऊ शकतो. त्यामुळे धोनीच्या धुरंधर नेतृत्वाकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना कमी लेखण्याची चूक करणे कोणालाही परवडणार नाही, अशा प्रतिक्रिया दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात सहा वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये खेळलेल्या व १९९३ च्या स्पर्धेत मालिकावीर ठरलेला विक्रमादित्य सचिन तेंडूलकर याच्यासह भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल, सौरव गांगुली, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जेफ मार्श, भारताचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ, माजी कर्णधार महम्मद अजरुद्दिन, गोलंदाज झहीर खान यांच्यासह विद्यमान ऑस्ट्रेलिया संघातील युवा व प्रतिभाशाली द्रुतगती गोलंदाज हेजलवूड याचाही समावेश आहे.
आव्हानांबाबत टीम इंडिया अनुभवी- तेंडूलकर
टीम इंडियाच्या यंदाच्या वर्ल्डकप मोहिमेवर विक्रमादित्य तेंडूलकरचे भाष्य धोनीच्या कुशल नेतृत्वासाठी स्फूर्तीदायक तसेच आशावादी असेच आहे. सचिन म्हणतोय विश्‍वचषक स्पर्धा हे एक मोठे आव्हान असते. परंतु आमच्या संघाला आव्हानांचा सामना करण्याचा अनुभव आहे. मला पूर्ण विश्‍वास आहे की, भारतीय संघ मैदानावर काही तरी स्पेशल अशी कामगिरी करेल आणि आम्हा सर्व भारतीयांनी सुखद धक्का देर्ईल.
विश्‍वचषकाच्या स्वत:च्या स्वप्नपूर्तीकडेही सचिनने यावेळी लक्ष वेधले. अनेक वेळा आपण या स्वप्नपूर्तीच्या जवळ पोचलो. मात्र ते प्रत्यक्ष साकारण्यासाठी आपल्याला तब्बल २२ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली असे २०११ च्या विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेला सचिन म्हणाला. भारतीय संघाने आशा सोडू नये,असा सल्लाही सचिनने दिला आहे.
भारतासाठी योग्य वेळेचा प्रश्‍न : हेजलवूड
विद्यमान विजेत्या भारतीय संघाबाबत ऑस्ट्रेलियाचा युवा जलदगती गोलंदाज हेजलवूड याने केलेले वक्तव्य आश्‍वासक असेच आहे. भारतीय संघात काही विरळच असे खेळाडू आहेत की, त्यांच्या नावावर असेच विलक्षण विक्रमही नोंद आहेत. त्यामुळे मला वाटते की, त्यापैकी काही खेळाडूंची फलदांजी योग्य वेळी बहरात आली तर भारतीय संघासाठी योग्य होईल. आणि असे झाले तर भारतीय संघ हा सर्वांसाठी धोकादायक बनेल यात शंका नाही. अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा पराभव केल्यानंतर रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
रोहित, विराट यांच्या फॉर्मवर बरेच अवलंबून : झहीर
या विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाची सलामीची लढत होणार आहे ती प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानशी. या पूर्वीच्या विश्‍वचषक स्पर्धांतील सामन्यात भारत हा पाकिस्तानकडून पराभूत झाला नसला तरी यावेळी भारताच्या सर्व आशा या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या यशावरच अवलंबून आहेत. असे मत भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केले आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि संघाच्या स्थितीनुसार विराट तिसर्‍या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजीस आले आणि त्यांनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली तर भारतीय संघास पराभूत करणे इतर संघांना कठीण असल्याचे झहीर याने सांगितले. या स्पर्धेत भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील खराब कामगिरीचा कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे संघाबाबत काळजी करण्याची गरज नाही. तसेच या कामगिरीचाही संघावर कोणताही परिणाम होणार नाही. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठेल याची मला आशा आहे, असे झहीर म्हणाला.
पाकिस्तानचा भारताला धोका नाही : अझरुद्दिन
या पूर्वीच्या तीन विश्‍वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर विजय नोंदवताना भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या महम्मद अझरुद्दिने यावेळी भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून कोणताही धोका नसल्याचे सांगितले. यावेळचा भारतीय संघ हा चांगला असून प्रत्येक खेळाडूने आपल्या लौकिकास साजेसा खेळ केल्यास भारतीय संघास पाकिस्तान कडून कोणताही धोका नसल्याचे अझरुद्दिने स्पष्ट केले. या विश्‍वचषक स्पर्धेत भारताची सलामीची लढत ऍडलेडवर रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी होत आहे. मात्र, ही लढत भारतासाठी कठीण जाणार असल्याचेही शेवटी अझरुद्दिने स्पष्ट केले. भारताला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. सातत्यपूर्ण कामगिरीवरच भारतीय संघाचे यश अवलंबून आहे.
भारत उपांत्य फेरी गाठणार : गांगुली
ग्रेग चॅपेल, झहीर खान यांच्या प्रमाणेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही भारतीय संघाच्या सध्याच्या खराब कामगिरीचा विश्‍वचषक स्पर्धेतील कामगिरीवर कोणताही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.काही दिवसात भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करून टीकाकारांची तोंडे बंद करतील, असा विश्‍वासही गांगुलीने व्यक्त केला.
आता या दिग्गजांच्या आशावादी व आश्‍वासक अशा मतप्रदर्शन काही वास्तव गोष्टींकडे लक्ष वेधणे क्रमप्राप्त ठरते. यासंदर्भात विचार करताना टीम इंडियासाठी सर्वात डोकेदुखी ठरु शकते, ती गोलंदाजी संदर्भात. कारण या संघातील गोलंदाजीचा एक हुकमी पत्ता ईशांत शर्मा संघाबाहेर पडला आहे. अर्थातच आता चिंता करण्यासाठी वेळही नाही. उमेश यादव व महंमद शामी यांनी गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात गोलंदाजीचा भार वाहिला आहे. त्यामुळे विश्‍वचषक पूर्वी त्यांना दिलेली विश्रांती हा योग्य निर्णय आहे. या स्पर्धेसाठी तीन जलदगती गोलंदाज अंतिम अकराजणात असणे आवश्यक असल्याने ईशांत शर्माची जागा कोण घेणार हे महत्त्वाचे आहे. त्यातच जलदगती गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारच्या फिटनेसवरही प्रश्‍नचिन्ह आहे. अशा वेळी मोहित शर्माचा विचार होऊ शकतो.
फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास दुबळ्या संघाविरुद्ध का होईना भारताने एका सराव सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला. त्यात रोहित शर्माला चांगला सूर गवसला. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नेतृत्व आणि त्याची फलंदाजी जगज्जेतेपद राखण्यासाठी या दोन्ही गोष्टी योग्य वेळी कामास आल्या पाहिजेत.
या व्यतिरिक्त काही गोष्टी भारताला पोषक आहेत. कारण गेले दोन महिने टीम इंडिया ऑस्ट्रेलियात आहे. तेथील हवामान व खेळपट्‌ट्यांचा फायदा आपल्या खेळाडूंना झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाचा समावेश भारताच्या गटात नाही. त्यामुळे ताज्या अपयशाच्या दबावापासून टीम इंडिया विश्‍वचषक स्पर्धेत उतरणार आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी जुळून आल्या तर निदान उपांत्य फेरी गाठणे भारताला जड जाणार नाही. घोडा मैदान जवळ आहे तेव्हा टीम इंडियाला विश्‍वचषक स्पर्धेसाठी आपण मन:पूर्वक शुभेच्छा देऊया.