टीम इंडिया जाणार श्रीलंका दौर्‍यावर

0
140

>> केंद्र सरकारची संमती आवश्यक

>> खेळाडूंची सुरक्षादेखील प्राथमिकता

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑगस्टमध्ये श्रीलंका दौरा करण्यास सहमती दर्शविली असून दोन्ही सरकारांच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय अपेक्षित आहे, असे वृत्त श्रीलंकेतील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या ‘द आयलंड’ने दिले आहे.

न्यूझीलंड दौर्‍यावरून परतल्यानंतर टीम इंडियाने कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिकाही कोरोना विषाणूंमुळे स्थगित करण्यात आली. आणि आता ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ नियोजनानुसार श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहे. आणि याचा अर्थ क्रिकेटप्रेमींना लवकरच आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानावर परत पाहता येणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया जून महिन्यात श्रीलंका दौर्‍यावर प्रत्येकी ३ वनडे आणि ३ टी-ट्वेंटी सामने खेळणार होती, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

श्रीलंकेतील कोरोना आटोक्यात असल्यामुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाने यापूर्वी भारतीय मंडळाला द्विपक्षीय मालिकेसाठी संघ पाठवण्याची विनंती केली होती. आयपीएल स्पर्धादेखील आपल्या देशात भरवण्याची श्रीलंकेची इच्छा होती. भारत व श्रीलंका सरकारच्या संमतीनंतर ‘एसएलसी’ मालिकेचे वेळापत्रक व इतर तपशीलांवर काम करेल. सामाजिक दूर अंतराची निकष सुनिश्चित करताना काही प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी स्टँडमध्ये परवानगी देण्याची मंडळाची इच्छा आहे. आम्हाला ३० ते ४० टक्के जागा भरण्याची इच्छा आहे. प्रेक्षक एक मीटर अंतर ठेवून खेळ पाहू शकतात. तथापि, अंतिम निर्णय आरोग्य अधिकारी घेणार आहेत, असे एसएलसीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, श्रीलंका यंदा आशिया चषकाचे आयोजन करण्याचीही अपेक्षा आहे. स्पर्धा मुळात पाकिस्तानमध्ये होणार होती, पण भारतीय संघ तिथे खेळू शकणार नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आता पाकिस्तान मंडळ तटस्थ ठिकाण शोधण्याच्या प्रक्रियेत आहे. श्रीलंका क्रिकेटचे (एसएलसी) प्रमुख शम्मी सिल्वा म्हणाले की, एसएलसी स्पर्धेचे आयोजन करीत असल्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाला हरकत नसावी.

बीसीसीआयची सावध भूमिका
दौर्‍याला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. देशातील व देशाबाहेरील परिस्थिती कितीप्रमाणात सुधारते यावर सर्व अवलंबून आहे, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. आमची तयारी असली तरी खेळाडूंची सुरक्षितता सर्वप्रथम असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. त्यामुळे बीसीसीआयने ‘द आयलंड’ मधील वृत्ताचे पूर्णपणे खंडन केलेले नसल्याचे दिसते.