टीम इंडियाने २८ धावांत गमावले ३ गडी

0
112
Indian bowler Bhuvneshwar Kumar (L) celebrates the dismissal of South African batsman Hashim Amla (R) during Day One of the First Test cricket match between South Africa and India at Newlands cricket ground on January 5, 2018 in Cape Town. / AFP PHOTO / GIANLUIGI GUERCIA

>> गोलंदाजांनी कमावले; फलंदाजांनी गमावले

>> दक्षिण आफ्रिका सर्वबाद २८६

भुवनेश्‍वर कुमार व सहकार्‍यांच्या अचूक गोलंदाजीवर पाणी फेरण्याचे काम टीम इंडियाच्या आघाडी फळीने काल केले. गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २८६ धावांत संपवल्यानंतर दिवसातील ११ षटके खेळून काढताना टीम इंडियाला तीन गडी गमवावे लागले. भारताचे धवन, विजय व विराट हे आघाडीचे तीन गडी माघारी परतले असून केवळ २८ धावा फलकावर लागल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यातील या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झालेली असताना फलंदाजांनी आपल्या अवसानघातकी फटक्यांनी यजमानांना वर्चस्व प्रस्थापित करण्यास हातभार लावला.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भुवनेश्‍वर कुमारने नव्या चेंडूचा योग्य वापर करत यजमानांचे तीन गडी झटपट बाद केले. भुवीने स्विंग गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवत असताना दुसर्‍या टोकाने शामीला मात्र आपल्या पहिल्या स्पेलमध्ये टप्पा राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे तीन गडी परतल्यानंतरही डीव्हिलियर्स व ड्युप्लेसिस यांनी चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. तीन बळींचे घबाड मिळाल्यानंतर भुवीलादेखील धावा रोखण्यासाठी संघर्ष करावा लागला. पदार्पणवीर बुमराहने काही अप्रतिम चेंडू टाकून फलंदाजांच्या मनात संभ्रम निर्माण केला. परंतु, त्याची वेळोवेळी दिशा भरकटल्याने दबाव टाकण्यात तो देखील असमर्थ ठरला. द. आफ्रिकेकडून डीव्हिलियर्सने सर्वाधिक ६५ धावांचे योगदान दिले. ७३.१ षटकांत ३.९०च्या सरासरीने २८६ धावा करून यजमानांचा संघ आटोपला. भारताकडून भुवनेश्‍वर कुमारने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना धवन व विजय यांनी सुरुवातीची चार षटके व्यवस्थित खेळून काढली. डावातील पाचव्या षटकात फिलेंडरने विजयला बाद केले. पुढच्याच षटकात स्टेनने धवनचा काटा काढला. यानंतर मॉर्कलने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली (५) याला बाद करून पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावे केला.
द. आफ्रिकेने चार स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज व एका फिरकीपटूसह उतरताना मॉरिस व फेलुकवायो या अष्टपैलूंना संधी नाकारली.

धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार झे. साहा गो. भुवनेश्‍वर ०, ऐडन मारक्रम पायचीत गो. भुवनेश्‍वर ५, हाशिम आमला झे. साहा गो. कुमार ३, एबी डीव्हिलियर्स त्रि. गो. बुमराह ६५, फाफ ड्युप्लेसिस झे. साहा गो. पंड्या ६२, क्विंटन डी कॉक झे. साहा गो. भुवनेश्‍वर ४३, व्हर्नोन फिलेंडर त्रि. गो. शामी २३, केशव महाराज धावबाद ३५, कगिसो रबाडा झे. साहा गो. अश्‍विन २६, डेल स्टेन नाबाद १६, मॉर्ने मॉर्कल पायचीत गो. अश्‍विन २, अवांतर ६, एकूण ७३.१ षटकांत सर्वबाद २८६
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार १९-४-८७-४, मोहम्मद शामी १६-६-४७-१, जसप्रीत बुमराह १९-१-७३-१, हार्दिक पंड्या १२-१-५३-१, रविचंद्रन अश्‍विन ७.१-१-२१-२
भारत पहिला डाव ः मुरली विजय झे. एल्गार गो. फिलेंडर १, शिखर धवन झे. व गो. स्टेन १६, विराट कोहली झे. डी कॉक गो. मॉर्कल ५, रोहित शर्मा नाबाद ०, अवांतर १, एकूण ११ षटकांत ३ बाद २८
गोलंदाजी ः व्हर्नोन फिलेंडर ४-१-१३-१, डेल स्टेन ४-१-१३-१, मॉर्ने मॉर्कल २-२-०-१, कगिसो रबाडा १-०-१-०

सुटलेला झेल
पडला महागात
शिखर धवन याने स्लिपमध्ये भुवनेश्‍वर कुमारच्या गोलंदाजीवर द. आफ्रिकेचा तळाचा फलंदाज केशव महाराज याचा सोपा झेल सोडला. यावेळी महाराज याने खातेदेखील खोलले नव्हते. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या केवळ २०२ धावा फलकावर लागल्या होत्या. या जीवदानाचा पुरेपूर लाभ उठवत महाराज याने ३५ धावांची उपयुक्त खेळी केली. झेल सोडल्यानंतर त्याने व्हर्नोन फिलेंडरसह सातव्या गड्यासाठी १९ धावांची भागीदारी केली. तसेच कगिसो रबाडा (२६) याच्यासह आठव्या गड्यासाठी (२६) ३६ धावांची भागीदारी रचली.

उपकर्णधारालाच दिला डच्चू
उपखंडाबाहेरील भारताचा सर्वांत यशस्वी फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणे याला बाहेर बसवून विराट कोहलीने अचंबित करणारा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या उपखंडातील काही मोजक्या कसोटी सामन्यांतील यशाच्या बळावर त्याला रहाणेवर पसंती देण्यात आली. तसेच इशांत शर्मा व उमेश यादव यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज राखीव यादीत असताना जसप्रीत बुमराहला पदार्पणाची संधी देऊन दुसरा ‘जुगार’ खेळला.