टीम इंडियाची विजयी सलामी

0
78
>> दक्षिण आफ्रिकेची पराभवाची हॅट्ट्रिक
>> रोहितचे नाबाद शतक
>> चहलही चकमला
लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या जादुई फिरकी मार्‍यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी आणि १५ चेंडू बाकी राखून मात करीत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग तिसरा पराभव ठरला. १२२ धावांची नाबाद शतकी खेळी केलेल्या रोहितची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
दक्षिण आफ्रिकेला ९ बाद २२७ धावांवर रोखल्यानंतर टीम इंडियाने विजयी लक्ष्य ४७.३ षट्‌कांत २३० धावा करीत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला प्रारंभीच जोरदार झटका बसला. डावखुरा सलामीवीर शिखर धवन (८) रबाडाच्या चेंडूवर यष्ट्यांमागे झेल देऊन परतला. कर्णधार विराट कोहलीही (१८) झेलबाद होऊन परतला. परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या लोकेश राहुलच्या साथीत रोहितने भारताचा डाव सावरताना तिसर्‍या विकेटसाठी ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. २६ धावा जोडलेला राहुल रबाडाचा बळी ठरला. अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी आणि रोहितने ४थ्या विकेटसाठी ७४ धावा जोडत भारताला विजयपथावर नेले. धोनी ३४ धावा जोडून तंबूत परतला. ख्रिस मॉरिसने स्वतःच्याच चेंडूवर त्याला टिपले. शेवटी हार्दिक पंड्याच्या (नाबाद १५) साथीत रोहितने संघाचा विजय साकारला. रोहित १३ चौकार व २ षट्‌कारांसह १४४ चेंडूंत नाबाद १२२ धावांची शतकी योगदान दिले.
आफ्रिकेतर्फे रबाडाने २ तर मॉरिस व फेहलुक्वायो यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकन कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरविताना त्यांना ९ बाद २२९ धावांवर रोखले. भारताचे प्रमुख दु्रतगती अस्त्र जसप्रीत बुमराहने प्रारंभीच दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवित त्यांना बॅकफूटवर नेले. हाशिम आमला (६) तिसर्‍या स्लिपमध्ये रोहित शर्माकडे झेल देऊन बाद झाला. तर डावखुरा क्विंटन डी कॉक (१०) बुमराहचा एक बाहेरचा चेेंडू खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन परतला. तिसर्‍या स्लिपमध्ये विराटने त्याचा सुरेख झेल टिपला. त्यानंतर रासी वॅन डेर दुसेन आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु यजुवेंद्र चहलच्या जादुई फिरकीपुढे या दोघांच्या दांड्या उडाल्या. २०व्या षट्‌कांत चहलने पहिल्याच चेंडूवर दुसेनला (२२) त्रिफळाचीत केले. तर अखेरच्या चेंडूवर कर्णधार फाफ ड्युप्लेसिसच्या (३८) यष्ट्या उधळल्या. जेपी ड्युमिनीला (३) कुलदीप यादवने पायचितच्या जाळ्यात अडकविले. अँडिले फेहलुक्वायोला (३४) धोनीने चहलच्या गोलंदाजीवर यष्टिचीत केले. डेव्हिड मिलर (३१) चहलचा चौथा बळी ठरला. परंतु त्यानंतर ख्रिस मॉरिस (४२) आणि कगिसो रबाडा (नाबाद ३१) यांनी काहीशी फटकेबाजी केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला भारतासमोर २२८ धावांचे लक्ष्य ठेवता आले. भारतातर्फे चहलच्या ४ बळींव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ तर कुलदीप यादवने १ विकेट मिळविली.
धावफलक, ः
दक्षिण आफ्रिका ः
हाशिम आमला झे. रोहित शर्मा गो. जसप्रीत बुमराह  ६,  क्विंटन डी कॉक झे. विराट कोहली गो. जसप्रीत बुमराह १०, फाफ डू प्लेसिस त्रिफळाचित युजवेंद्र चहल ३८, रासी वॅन डेर दुसेन त्रिफळाचित गो. युजवेंद्र चहल २२, डेव्हिड मिलर झे. व गो. युजवेंद्र चहल ३१, जीन पॉल ड्युमिनी पायचित गो. कुलदीप यादव ३,  अँडिले फेहलुक्वायो यष्टिचित महेंद्रसिंह धोनी गो. युजवेंद्र चहल ३४, ख्रिस मॉरिस झे. विराट कोहली गो. भुवनेश्वर कुमार ४२, कागिसो रबाडा नाबाद ३१, इम्रान ताहीर झे. केदार जाधव गो. भुवनेश्वर कुमार  ०.
अवांतर ः १०. एककूण ५० षट्‌कांत ९ बाद २२७ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-११ (हाशिम आमला ३.२), २-२४ (क्विंटन डी कॉक ५.५), ३-७८ (रासी वॅन डेर दुसेन १९.१), ४-८० (फाफ डू प्लेसिस २०), ५-८९ (जीन पॉल ड्युमिनी २३), ६-१३५ (डेव्हिड मिलर ३५.३), ७-१५८ (अँडिले फेहलुक्वायो ३९.३), ८-२२४ (ख्रिस मॉरिस ४९.२), ९-२२७ (इम्रान ताहीर ५०)
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार १०/०/४४/२, जसप्रीत बुमराह १०/१ /३५/२, हार्दिक पंड्या ६/०/३१/०, कुलदीप यादव १०/०/४६/१, युजवेंद्र चहल १०/०/५१/४, केदार जाधव ४/०/१६/०.
भारत ः शिखर धवन झे. क्विंटन डी कॉक गो. कगिसो रबाडा ८, रोहित शर्मा नाबाद १२२, विराट कोहली झे. क्विंटन डी कॉक गो. अँडिले फेहलुक्वायो १८, लोकेश राहुल झे. फाफ डुप्लेसिस गो. कगिसो रबाडा २६, महेंद्र सिंह धोनी झे. व गो. ख्रिस मॉरिस ३४, हार्दिक पंड्या नाबाद १५.
अवांतर ः ७. एकूण ४७.३ षट्‌कांत ४ बाद २३० धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-१३ (शिखर धवन ५.१), २-५४ (विराट कोहली १५.३), ३-१३९ (लोकेश राहुल ३१.३), ४-२१३ (महेंद्र सिंह धोनी ४६.१)
गोलंदाजी ः इम्रान ताहीर १०/०/५८/०, कागिसो रबाडा १०/१ /३९/ २, ख्रिस मॉरिस १०/३/३६/१, अँडिले फेहलुक्वायो ८.३/०/४०/१, तबरेझ शम्सी ९/०/५४/०.