टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव

0
106

>> भारताच्या पराभवामुळे पाकिस्तान संकटात

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारताच्या अपराजित घोडदौडीला काल यजमान इंग्लंडने लगाम घातला. टीम इंडियाचा ३१ धावांनी पराभव करत त्यांनी स्पर्धेतील आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ५ बाद ३०६ पर्यंतच पोहोचता आले.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. नऊ चेंडूंचा सामना केल्यानंतर भोपळाही न फोडता राहुलने तंबूची वाट धरली. ख्रिस वोक्सच्या धारदार गोलंदाजीसमोर भारताचा निभाव लागला नाही. त्याने सलग तीन षटके निर्धाव टाकून भारताला जेरीस आणले. कोहली व रोहित यांनी दुसर्‍या गड्यासाठी १३८ धावांची भागीदारी केली. प्लंकेटने कोहलीचा महत्त्वाचा बळी घेत ही जोडी फोडली. कोहलीने आपले ५४वे वनडे अर्धशतक ठोकले. रोहित १०२ धावांसाठी १०९ चेंडू खेळला. शतकानंतर त्याच्याकडून जबाबदार खेळाची अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. नवोदित पंतने काही आकर्षक फटके खेळले. परंतु, वाढत असलेल्या आवश्यक धावगतीशी मेळ साधणे त्याला व पंड्याला कठीण गेले. धोनीने प्रेक्षकांचे मनोरंजन करेपर्यंत सामना हातातून निसटला होता.

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याचा निर्णय इंग्लंडच्या फलंदाजांनी सार्थ ठरविला. जॉनी बॅअरस्टोव आणि जेसन रॉय यांनी पहिल्या गड्यासाठी १६० धावांची भागीदारी करत विशाल धावसंख्येचा मजबूत पाया रचला. कुलदीप यादव याने जेसन रॉय याला ६६ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. रॉय याचे हे सोळावे अर्धशतक ठरले. बॅअरस्टोव याने यानंतर माजी कर्णधार ज्यो रूटच्या साथीने इंग्लंडची धावसंख्या २०० पार नेली. जॉनी बॅअरस्टोवने १०९ चेंडूत १११ धावा करताना आपले आठवे वनडे शतक ठोकले. त्यानंतर बेन स्टोक्सने संघाची धुरा आपल्या हाती घेत धुवाधार फलंदाजी करत ४७ षटकांतच संघाची धावसंख्या ३०० पार नेली. वैयक्तिक ७९ धावांवर जसप्रीत बुमराहने बेन स्टोक्स बाद केले. टोक्स याने १९वे वनडे अर्धशतक पूर्ण करत केवळ ५४ चेंडूचा सामना केला. भारताकडून मोहम्मद शमी याने १० षटकांत ६९ धावा देत सर्वाधिक ५ गडी बाद केले. भारताने या सामन्यासाठी आपल्या संघात एक बदल करताना अष्टपैलू विजय शंकरला बाहेर बसवून ऋषभ पंतला संधी दिली. दुसरीकडे इंग्लंड संघात सलामीवीर जेसन रॉय व लियाम प्लंकेट यांचे पुनरागमन झाले. यामुळे जेम्स व्हिन्स व मोईन अली यांना बाहेर बसावे लागले.

धावफलक
इंग्लंड ः जेसन रॉय झे. जडेजा गो. कुलदीप ६६, जॉनी बॅअरस्टोव झे. पंत गो. शमी १११, ज्यो रुट झे. पंड्या गो. शमी ४४, ऑईन मॉर्गन झे. जाधव गो. शमी १, बेन स्टोक्स झे. जडेजा गो. बुमराह ७९, जोस बटलर झे. व गो. शमी २०, ख्रिस वोक्स झे. रोहित गो. शमी ७, लियाम प्लंकेट नाबाद १, जोफ्रा आर्चर नाबाद ०, अवांतर ८, एकूण ५० षटकांत ७ बाद ३३७
गोलंदाजी ः मोहम्मद शमी १०-१-६९-५, जसप्रीत बुमराह १०-१-४४-१, युजवेंद्र चहल १०-०-८८-०, हार्दिक पंड्या १०-०-६०-०, कुलदीप यादव १०-०-७२-१
भारत ः लोकेश राहुल झे. व गो. वोक्स ०, रोहित शर्मा झे. बटलर गो. वोक्स १०२, विराट कोहली झे. व्हिन्स गो. प्लंकेट ६६, ऋषभ पंत झे. वोक्स गो. प्लंकेट ३२, हार्दिक पंड्या झे. व्हिन्स गो. प्लंकेट ४५, महेंद्रसिंग धोनी नाबाद ४२, केदार जाधव नाबाद १२, अवांतर ७, एकूण ५० षटकांत ५ बाद ३०६
गोलंदाजी ः ख्रिस वोक्स १०-३-५८-२, जोफ्रा आर्चर १०-०-४५-०, लियाम प्लंकेट १०-०-५५-३, मार्क वूड १०-०-७३-०, आदिल रशीद ६-०-४०-०, बेन स्टोक्स ४-०-३४-०

शमीचा सलग तिसरा ‘चौकार’
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने विश्‍वचषक स्पर्धेत सलग तिसर्‍या लढतीत चार किंवा जास्त बळी घेण्याची कामगिरी केली. यापूर्वी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने २००३च्या विश्‍वचषकात सलग तीन लढतीत चार बळी घेतले होते. शमीने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. शमीने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची काल नोंद करताना १० षटकांत ६९ धावा मोजून ५ बळी घेतले. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीने हॅट्‌ट्रिक बनवण्याचा विक्रमही केला आहे. या सामन्यातही त्याने चार बळी घेतले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही त्याने चार बळी घेतले होते.

कोहलीचे सलग पाचवे अर्धशतक
क्रिकेट विश्‍वचषकामध्ये सलग पाच अर्धशतके ठोकणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठऱला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव स्मिथने अशी कामगिरी नोंदवली आहे. स्मिथने २०१५ च्या विश्‍वचषकात या कामगिरीची नोंद केली होती. वनडेमध्ये २००० चौकारांचा टप्पाही विराटने काल गाठला. भारताकडून द्रविड, तेंडुलकर, गांगुली, सेहवाग यांना २ हजार किंवा जास्त चौकार ठोकता आले आहेत.