टीम इंडियाचा दारुण पराभव

0
108

>> भारत-दक्षिण आफ्रिका टी-ट्वेंटी मालिका बरोबरीत

दक्षिण आफ्रिकेने तिसर्‍या व शेवटच्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंंडियाचा ९ गडी व १९ चेंडू राखून पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. भारताने विजयासाठी ठेवलेले १३५ धावांचे माफक लक्ष्य पाहुण्यांनी केवळ १६.५ षटकांत १ गडी गमावून गाठले.
भारताने या सामन्यासाठी संघात बदल केला नाही तर पाहुण्यांनी ऍन्रिक नॉर्तेच्या जागी ब्युरन हेंड्रिक्सला संघात घेतले. ब्युरनने आपल्या ४ षटकांत केवळ १४ धावांत २ बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावताना निवड सार्थ ठरवली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताने रोहित शर्मा (९) याला लवकर गमावले. कर्णधार कोहली व धवन यांनी यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, रबाडाला मैदानाबाहेर भिरकावण्याच्या प्रयत्नात कोहली सीमारेषेवर झेलबाद झाला. धवनने काही आक्रमक फटके खेळत २५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३६ धावांची खेळी केली. यष्टिरक्षक ऋषभ पंतने चाचपडल्यानंतर तंबूची वाट धरली. २० चेंडूंत त्याला केवळ १९ धावा जमवता आल्या. हार्दिक पंड्या (१४) व रवींद्र जडेजा (१९) यांनी थोडाफार प्रतिकार केला. उर्वरित फलंदाजांनी नांगी टाकली. भारताने २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या. द. आफ्रिकेकडून रबाडाने ३ तर हेंड्रिक्स, फॉर्च्युन यांनी प्रत्येकी २ तर शम्सीने १ गडी बाद केले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक व रीझा हेंड्रिक्स यांनी संघाला ७६ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. क्विंटन डी कॉक (नाबाद ७९, ५२ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार) व तेंबा बवुमा (नाबाद २७, २३ चेंडू, २ चौकार, १ षटकार) यांनी संघाचा विजय साकार केला.

संक्षिप्त धावफलक
भारत ः २० षटकांत ९ बाद १३४ (धवन ३६, पंत १९, हार्दिक १४, जडेजा १९, रबाडा ३९-३, फॉर्च्युन १९-२, हेंड्रिक्स १४-२, शम्सी २३-१) पराभूत वि. द. आफ्रिका ः १ बाद १४० (रिझा २८, डी कॉक ७९, पंड्या २३-१)