टीम इंडियाचा दारुण पराभव

0
100

>> ऑस्ट्रेलियाच्या फिंच-वॉर्नरची २५८ धावांची अविभक्त विक्रमी सलामी

ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांनी भारतीय भूमीवरील वनडे क्रिकेटमधील सर्वांत मोठी २५८ धावांची सलामी भागीदारी रचताना टीम इंडियाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० गड्यांनी पराभव केला. भारताने विजयासाठी ठेवलेले २५६ धावांचे तुटपुंजे आव्हान सहज पेलताना कांगारूंनी ७४ चंेंडू व १० गडी राखून भारताचा पराभव केला.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यासाठी नवदीप सैनीच्या वेगाकडे दुर्लक्ष करत शार्दुल ठाकूरच्या वैैविध्यतेला पसंती दिली. तसेच रोहित, धवन व राहुल या तिघांना खेळविल्याने केदार जाधवला बाहेर बसवून केवळ पाच स्पेशलिस्ट गोलंदाजांसह टीम इंडिया उतरली. ऑस्ट्रेलियाने जोश हेझलवूडच्या जागी केन रिचर्डसनची ‘वनडे’ फॉर्मवर संघात वर्णी लावली. रोहित व धवनने भारताच्या डावाची सुुरुवात केली. रोहित मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. विराटने लोकेश राहुलला तिसर्‍या स्थानावर पाठवत स्वतः चौथा क्रमांक निवडला. राहुलने धवनसह भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतु, विराटला चौथा क्रमांक भावला नाही. श्रेयस अय्यरही विशेष योगदान देण्यात अपयशी ठरल्याने टीम इंडियाची २ बाद १४० वरून ५ बाद १६४ अशी घसरगुंडी उडाली. यानंतर तळातील फलंदाजांनी थोड्याफार धावा जमवल्याने भारताला २५० धावांचा टप्पा ओलांडता आला.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सुरुवातीपासून वेगवान खेळ दाखवला. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना लय गवसली नाही. वॉर्नरने आपले १८वे तर फिंचने १६वे वनडे शतक झळकावले. या द्वयीने भारतीय गोलंदाजांच्या चिंधड्या उडवताना ३७.४ षटकांत संघाला विजयी केले. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना १७ रोजी राजकोट येथे होणार आहे.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. वॉर्नर गो. स्टार्क १०, शिखर धवन झे. एगार गो. कमिन्स ७४ (९१ चेंडू, ९ चौकार, १ षटकार), लोकेश राहुल झे. स्मिथ गो. एगार ४७ (६१ चेंडू, ४ चौकार), विराट कोहली झे. व गो. झंपा १६, श्रेयस अय्यर झे. केरी गो. स्टार्क ४, ऋषभ पंत झे. टर्नर गो. कमिन्स २८, रवींद्र जडेजा झे. केरी गो. रिचर्डसन २५, शार्दुल ठाकूर त्रि. गो. स्टार्क १३, मोहम्मद शमी झे. केरी गो. रिचर्डसन १०, कुलदीप यादव धावबाद १७, जसप्रीत बुमराह नाबाद ०, अवांतर ११, एकूण ४९.१ षटकांत सर्वबाद २५५
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क १०-०-५६-३, पॅट कमिन्स १०-१-४४-२, केन रिचर्डसन ९.१-०-४३-२, ऍडम झंपा १०-०-५३-१, ऍश्टन एगार १०-१-५६-१
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर नाबाद १२८ (११२ चेंडू, १७ चौकार, ३ षटकार), ऍरोन फिंच नाबाद ११० (११४ चेंडू, १३ चौकार, २ षटकार), अवांतर २०,एकूण ३७.४ षटकांत बिनबाद २५८
गोलंदाजी ः मोहम्मद शमी ७.४-०-५८-०, जसप्रीत बुमराह ७-०-५०-०, शार्दुल ठाकूर ५-०-४३-०, कुलदीप यादव १०-०-५५-०, रवींद्र जडेजा ८-०-४१-०

मायदेशात केवळ दुसर्‍यांदा
मायदेशात १० गड्यांनी पराभूत होण्याची टीम इंडियाची ही दुसरीच वेळ आहे. २००५ साली ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला याच प्रकाराच्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. विदेशी भूमीवर न्यूझीलंड (मेलबर्न, १० जानेवारी १९८१), वेस्ट इंडीज (ब्रिजटाऊन, ३ मे १९९७) व द. आफ्रिका (शारजा, २२ मार्च २०००) यांच्याविरुद्ध भारताने दहा गड्यांनी पराभव स्वीकारले आहेत.