‘टाईम’चे गणित

0
356
  •  गौरी भालचंद्र

सर्वांनाच विधात्याने सारखाच वेळ दिलेला आहे. सर्वांना एका दिवसात चोवीस तासच मिळतात, कुणालाही पंचवीस तास नाही मिळत. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो तो यशस्वी होतो.

‘मला वेळच पुरत नाही…’.. हे वाक्य आपण कित्येकदा तरी बर्‍याच लोकांच्या तोंडून ऐकत असतो. वेळ नेहमी सर्वांच्या वाट्याला सारखाच येत असतो. काळ अथवा वेळ आपण निर्माण करु शकत नाही. त्याचा वापर आपण किती बरे काळजीपूर्वक करायला हवा? पण आपण तो मस्तपैकी जमेल तसा वाया घालवत असतो, नाही का?
आमच्या घरी कधी कधी रात्री दहानंतरसुद्धा पाहुणे येतात आणि म्हणतात- ‘आता जेवण बिवण नको! लगेच झोपू या!’ पण माझी आई म्हणते, ‘तुम्ही सकाळी लवकर गाडीत बसलात, असे कसे? जेवण झालंच पाहिजे! तुम्ही फ्रेश व्हा मी अर्ध्या तासात स्वैपाक करते’. त्या पाहुण्यांनाच काय आम्हाला देखील ते अवघड वाटायचे. पण आई एकीकडे कुकरमध्ये वरण-भात-बटाटे लावायची. तो गॅसवर ठेवून दुसरीकडे तवा गॅसवर.. झटपट कणिक भिजवायची. कुकर होईपर्यंत पोळ्या करायची. तो झाला की त्याची वाफ काढून वरण सारखे करुन उकळायला ठेवायची. बटाटे सोलून ते चिरायची. वरण गरम होताच कढईत जिरे मोहरीची फोडणी देऊन बटाट्याची सुकी भाजी पाच मिनिटात करायची. चटणी, लोणचे घरात तयार असायचेच. पाने वाढून ती दुसरीकडे उरलेल्या पोळ्या करुन त्या गरमागरम सर्व्ह करायची! मोजून अर्ध्या तासात झालेला चविष्ट असा तो स्वैपाक ग्रहण करुन पाहुणे तृप्त व्हायचे व आईचे टाईम मॅनेजमेंट पाहुन आम्ही थक्क व्हायचो!
आपल्या आयुष्यात पैसे, यश, नाती यांहूनही सर्वात इम्पॉर्टन्ट गोष्ट कोणती आहे तर ती म्हणजे वेळ… वेळ ही जगातील कोणत्याही मौल्यवान खजान्यापेक्षा किमती आहे.
सर्वांनाच विधात्याने सारखाच वेळ दिलेला आहे. सर्वांना एका दिवसात चोवीस तासच मिळतात, कुणालाही पंचवीस तास नाही मिळत. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो तो यशस्वी होतो. कुणीही आजचा वेळ उद्यासाठी वाचवून ठेवू शकत नाही. फक्त त्या वेळेचा तो योग्य प्रकारे उपयोग करू शकतो. लक्षात ठेवा, स्वतःच्या वेळेचा स्वतःपेक्षा कुणीही योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. वेळ ही फार महत्त्वाची गोष्ट प्रत्येकासाठी आहे.

ठरवलेली कामे वेळच्यावेळी पूर्ण करण्यासाठी त्या कामांची यादी करून ती सतत डोळ्यांसमोर ठेवणे फायद्याचे ठरते. रोजच्या दिनक्रमात जेवणापूर्वी, जेवणानंतर, संध्याकाळी अशी रोजच्या रोज क्रमवारी करून त्याप्रमाणे कामं पार पाडावी लागतात.. पहाटे उठण्यासाठी लावलेला गजर बंद करून आणखी थोडा वेळ झोपण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पुष्कळदा सर्व प्रकारच्या कामांमध्येही हेच घडतं. आताच काय घाई आहे, करू नंतर सावकाश… ही सर्वसाधारणपणे आढळणारी वृत्ती.. या वृत्तीला प्रयत्नपूर्वक आळा घालून प्रत्येक काम वेळच्या वेळी करण्याची मनाला शिस्त लावावी लागते. एक वेळ उद्याचे काम आज केले नाही तरी चालू शकते, पण आजचे काम आजच आणि आत्ताचे काम आत्ताच करावे लागते. माणूस शक्तिशाली असतो पण वेळ ही सर्वांपेक्षा शक्तिशाली आहे.

वेळच पाळायची नसेल तर मनगटावर, घरात, कार्यालयात किंवा अगदी मोबाईलमध्ये तरी घड्याळ हवे कशाला! एक सांगू .. वेळेचं महत्त्व हे तुम्ही ओळखलंच पाहिजे.
आज पूर्ण करण्याची कामांची यादी, या आठवड्यात करण्याची यादी, महिन्यात करण्याची… अशाप्रकारे सर्व उरलेली कामे कधी पूर्ण करायचीत याचे नियोजन करावे.. सणवार, उत्सव यांसारखे दिवस, सुट्‌ट्यांचा काळ, परीक्षा.. यावेळेस आपल्या वेळापत्रकात बदल होतच असतो. तो गृहीत धरूनच आपण वेळेचे नियोजन करायचे असते.

वेळच मिळत नही, ही लटकी सबब बहुतेक जण सांगतात. पण वेळेचे योग्य नियोजन केले, कामाचे वेळापत्रक बनवले आणि त्यानुसार काम केले तर यश हे मिळतेच… काही वेळा काय होतं लहानमोठी कामं तशीच ठेवून ती रविवारवर ढकलली जातात… पण तरीही रविवारी त्या कामांना हात लावला जात नाही नि ती साठत जातात अजून अजून ..
रविवार म्हणजे आरामाचा वार अशी व्याख्या झालेली असताना कामांचा ढीगही समोर असतो नि मग तो तसाच वाढत राहतो. म्हणून आपण वेळेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे असं वाटतं. कोणत्या गोष्टींत आपला वेळ वाया जातो, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच आपण वेळेच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवू शकतो